प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.
इंग्लंड व जर्मनी.- बल्गेरिया स्वतंत्र झाला एवढ्यानें यूरोपीय राष्ट्रांच्या सरहद्दी फारशा बदलल्या नाहींत. तथापि या एकंदर प्रकरणाचा राजकीय व अंतराष्ट्रीयदृष्ट्या फार महत्त्वाचा परिणाम झाला. आपसांतील करारमदारांनीं व अंतर्राष्ट्रीय कयद्याच्या मदतीनें यूरोपांत व सर्व जगावर शांतता नांदविण्याची आशा सुखस्वप्नाप्रमाणें केवळ निरर्थक भासूं लागली. ''देवो दुर्बलधातकः'' किंवा ''ज्याला शस्त्रबल अनुकूल त्याला देव अनुकूल'' या नेपोलियनच्या सुप्रसिद्ध उक्तीचा पगडा यूरोपीय राष्ट्रांवर बसूं लागला. ग्रेटब्रिटनमधील लोकांनीं तर ही गोष्ट फार लवकर ओळखिली. सर्व यूरोपला जो प्रश्न महत्त्वाचा तो जर्मनीनें आपल्या केवळ सैन्यबलाच्या धमकावणीनें स्वतःस फायदेशीर अशा रीतीनें सोडविला व त्यामुळें जर्मनीचा दर्जा व दरारा फार वाढला. ही गोष्ट दृष्टीस पडतांच इंग्लंडमध्यें लष्करी खर्च कमी करण्यासंबंधाची सर्व चळवळ एकदम बंद पडली; इतकेंच नव्हे तर आरमाराच्या वाढीस अनुकूलता मिळूं लागली. इतक्यांत १९०९ मध्यें जर्मनींत आरमाराची वाढ झपाट्यानें सुरू असल्याचे समजलें. तेव्हां तर समुद्रावरील ब्रिटनची सार्वभौम सत्ता अबाधित राखण्याकरितां हरएक उपाय करण्याचा इंग्लंडचा निश्चय झाला.
आरमार वाढविण्यांत जर्मनीचा मूळ उद्देश राजकारणांत इंग्लंडच्याहून अधिक वरचष्मा स्वतःचा असावा हा होता. बल्गेरियन प्रकरण जर्मनीनें केवळ बलाढ्य सैन्याच्या जोरावर रशिया, फ्रान्स वगैरे राष्ट्रांनां गप्प बसवून स्वतःला फायदेशीर अशा रीतीनें मिटविलें. तद्वतच आरमाराच्या जोरावर वेळप्रसंगीं इंग्लंडला नमतें घ्यावयास लावण्याचा जर्मनीचा डाव होता. इंग्लंडबरोबर युद्ध करावें व प्रत्यक्ष इंग्लंडवर स्वारी करावी असा जर्मनीचा आरमार वाढविण्यांत हेतु होता असा पुष्कळांचा समज आहे, पण तो चुकीचा आहे. सैन्य व आरमार दोन्ही बलिष्ठ असल्यानें प्रत्यक्ष युद्धावर पाळी न आणतां यूरोप व इतर खंडांतहि ईजिप्त, दक्षिण, आफ्रिका, मेसापोटेमिया, इराण, हिंदुस्थान वगैरे भागांत इंग्लंडचें वर्चस्व व महत्व कमी करण्याकरितां घोंटाळे उत्पन्न करतां यावे असें जर्मनीचें धोरण होतें. तुर्कस्तानच्या सुलतानाशीं मैत्र जोडण्यांत व झारबरोबर १९०५ मध्यें दोस्तीचा गुप्त तह करण्यांत जर्मन बादशहाचा हात डाव होता. परंतु इंग्लंडनें फ्रान्सशीं व नंतर रशियाशीं मित्रत्वाचें नातें जोडून हा डाव हाणून पाडला. तथापि जर्मनीनें आपलें आरमार वाढविण्याचा क्रम चालूच ठेविला, व त्याबरोबर इंग्लंडबरोबर आरमाराच्या वाढीला मर्यादा घालण्यासंबंधानें व युद्धांत परस्परांविरुद्ध भाग न घेण्यासंबंधानें सालोख्याचें बोलणें सुरू ठेविलें. इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री सर एडवर्ड ग्रे यांनींहि खुल्या दिलानें व जाहीरपणें प्रत्येक प्रश्नाची वाटाघाट करण्याचें धोरण १९०९ पासून स्वीकारलें. परंतु १९१४ मध्यें सुरू झालेल्या जागतिक युद्धाच्या सुमारास जर्मनीनें आपली ही वृत्ति बदलली. १९०९ ते १९१४ हीं वर्षे विशेष महत्वाची होत. इंग्लंड व जर्मनी यांच्या सलोख्यावर सर्व जगाची शांतता अवलंबून आहे हें स्पष्टपणें जाणून इंग्रज मुत्सद्दी या वेळीं वागत होतें. जर्मनीच्या हालचालीवर इंग्लंडनें अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेविलें होतें. आणि परदेशी राजकारणांत आपसांतील पक्षभेद आड येऊं न देतां इंग्रज मुत्सद्यांनीं एकविचारानें सर एडवर्ड ग्रे, मिस्टर आस्क्विथ व लॉर्ड हॉल्डेन या तीन शांत डोक्याच्या मुत्सद्यांच्या हातीं ग्रेट ब्रिटनचें परराष्ट्रीय धोरण ठेविलें. त्यामुळें १९१२ मधील बाल्कन युद्धाचा वणवा फारसा पसरला नाहीं. तथापि २८ जून १९१४ रोजीं आस्ट्रियन आर्च ड्यूक फर्डिनांड याचा आकस्मिक रीतीनें खून होऊन जागतिक युद्धास अखेर सुरूवात झालीच. असो.
यूरोपचा गेल्या दहा वर्षांतील इतिहास पुढें सविस्तर येणार असल्यानें या ठिकाणीं त्याचा संक्षेप केलेला बरा. फक्त प्रमुख उलाढालींचा नामनिर्देश करून यूरोपचा व तदनुंषगिक जगाचा हा आज तागाईत आढावा संपविण्यांत येईल.
१९१२ च्या फेब्रुवारी महिन्यांत चीनमधील सर्वांत प्राचीन असणारी राजसत्ता जाऊन तेथें प्रजासत्ताक राज्य स्थापन झालें; पण अद्यापपर्यंत तेथें बेबंदशाही चालू आहेच. १९१४ सालीं इजिप्त ब्रिटिशांनीं आपल्या संरक्षणाखालीं घेतलें. हें ब्रिटिशांचें कृत्य फ्रान्स, रशिया, बेलजम, सर्व्हिया, ग्रीस, पोर्तुगाल व अमेरिकेंतील संयुक्त संस्थानें यांना मान्य केले. १९११ सालीं इटलीनें ट्रिपोली स्वाहा केला होता. १९१२ च्या सप्टेंबर महिन्यात तुर्कस्थान आणि बल्गेरिया, सर्व्हिया, ग्रीस व माँटेनिग्रो हीं बाल्कन यांच्यामध्यें युद्ध सुरू झालें. हें पहिलें बाल्कन युद्ध १९१३ च्या लंडनच्या तहानें बंद पडलें. या तहान्वयें तुर्कस्थाननें बाल्कन राष्ट्रांनां, मिडिया व एनास यांनां जोडणा-या रेषेच्या पश्चिमेकडील आपला मुलुख दिला. पण या मुलुखाच्या वांटणीत बाल्कन राष्ट्रांमध्यें वितुष्ट येऊन लंडन तहानंतर एक महिन्यानें त्यांचें आपआपसांत युद्ध सुरू झालें (दुसरें बाल्कन यूद्ध). पुढें बुखोरस्टच्या तहानें ते मिटलें. १९१२ सालीं अल्बेनियाला स्वातंत्र मिळालें.