प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

संस्कृति.- येथपर्यंत आफ्रिकेंतील मूळ रहिवाशी, त्यांचें अर्वाचीन वसतिस्थान व त्यांमध्यें मुख्य जातींच्या मिश्रणानें झालेल्या उपजाती, या सर्व गोष्टींचें वर्णन झालें. आतां त्यांच्या संस्कृतीचा विचार करावयाचा आहे. स्वाभाविक अथवा नैसर्गिक परिस्थितीचा संस्कृतीचा अगदीं निकट संबंध असतो. म्हणून संस्कृतीविषयीं लिहितांना ज्या ठळक नैसर्गिक गोष्टींचा परिणाम या खंडांतील लोकांच्या संस्कृतीवर झाला त्याचें थोडें दिग्दर्शन केलें पाहिजे. या दृष्टीनें या खंडाचे मुख्य तीन भाग के आहेत ते असे : (१) उत्तरेकडील माळरानाचा व वाळवंटाचा मोठा प्रदेश, (२) दक्षिणेंतील तशाच प्रकारचा लहानसा भाग, (३) तिसरा भाग कांगो नदीच्या पाणवट्याचा व गिनीच्या आखाताजवळचा भाग मिळून झालेला आहे. यांत मोठ्या नद्या व दाट अरण्ये आहेत. वर सांगितलेल्या पहिल्या दोन प्रदेशांचा संबंध उभ्या उंचवट्याच्या पट्यानें जोडिला आहे. हा उंचवट्याचा भाग सरोवरांच्या मालिकेच्या पूर्वेस आहे. अरण्यांतील अगदीं दाट प्रदेश सोडून, जेथें पाण्याचा पुरवटा चांगला असतो तेथें लोक शेतीचा धंदा करितात ही गोष्ट या मधल्या प्रदेशांत रहाणा-या लोकांस चांगली लागू पडते. येथील दोट अरण्यांतील अतिशय खुजा लोकांशिवाय बाकी बहुतेक लोक शेतीवर आपली उपजीविका करितात. पूर्वेच्या पठारावर रहाणा-या लोकांस शेती करतां येते. बंटू जात शेतीचा धंदा करिते. सपाट गवताळ माळरानांत म्हणजे पहिल्या व दुस-या भागांत गुरेढोरें व मेंढ्याबकरीं पाळून निर्वाह चालवितां येतो. या भागांतील बंटू लोकांस गुरें पाळण्याची फार आवड आहे. पण दक्षिण व मध्यआफ्रिकेंत निद्रारोगकारक माशा असल्यानें येथें गुरें पाळणें जवळ जवळ अशक्य झालें आहे. उत्तरेंत या माशा नसल्यानें गुराढोरांवर उपजीविका करणा-या लोकांचा भरणा फार आहे. वाळवंटातल्या लोकांस नेहमीं फिरतें असावे लागतें. त्यांचीं नांवें तौरेग, तिल्बू, बेदुइन व बुशमन हीं होत.
 
राजकीय परिस्थिति व नैसर्गिक स्थिति ह्या एकमेकांवर अवलंबून असतात. फिरल्या लोकांत समाजाची अथवा लोकसंख्येची फारशी वाढ होणें शक्य नसतें. असल्या लोकांत पितृसत्तात्मक कुटुंब हिं एक समाजाचें घटकावयव असतें. ज्यावेळी शेतीस सुरूवात होते, त्याचवेळीं समाज अस्तित्वांत येतो व लहान लहान समाज, ग्राम संस्था व ग्रामणी अथवा ग्रामाधिपति हे अस्तित्वांत येत असतात. जेथें दळणवळणास नैसर्गिक आडकाठी किंवा अडचणी नसतात त्या मुलखांत मोठीं राज्यें अस्तित्वांत येतात. पण दळणवळणाच्या मार्गांत अडथळे नसल्यानें शत्रूंस स्वा-या सहजगत्या करितां येतात, त्यांमुळें अशा राज्यांचा व तेथल्या संस्कृतीचा नाशहि लवकरच होतो. या सिद्धान्ताचें चांगलें उदाहरण म्हणजे पश्चिम सूदनचा इतिहास होय.

पूर्वेकडून आफ्रिकेंत येण्यास मार्गांत फारच थोडे अडथळे आहेत. त्या योगानें येथील मूळच्या संस्कृतीवर तिकडून आलेल्या लोकांच्या संस्कृतीची छाप पडली आहे. या करितां आपणास जर आफ्रिकेंतील मूळच्या रहिवाश्यांची संस्कृति पहावयाची तर ज्या ठिकाणीं दुस-या संस्कृतीचा प्रवेश होणें शक्य नाहीं, अशा ठिकाणच्या लोकांचा आपण विचार केला पाहिजे. कांगोच्या दाट जंगलांत गीनीच्या आखाताच्या परिकरांत असणा-या लोकांच्या रहाणीकडे पाहिले असतां आपणास नीग्रो संस्कृतीचें ज्ञान होईल. यांचा धंदा शेतीचा असतो. यांचें मुख्य खाण्याचे पदार्थ केळीं व गोराडू सारखी कंदमुळें वगैरे आहेत. यांच्या घराचा आकार लांबट चौकोनी असतो व छपरास आढें असतें. हे लोक नरमांस भक्षक आहेत. यांचे कपडे झाडांच्या सालीचे केलेले असतात. यांची शस्त्रें म्हणजे धनुष्य- दोरी मात्र वेताची असते- व लाकडी ढाल हीं होत. आंगावर गोंदण्याचा या लोकांत प्रघात आहे. यांच्या पारमार्थिक विचारांकडे पाहिले तर या लोकांत सृष्ट पदार्थांची पूजा करण्याची पद्धति अविकसित स्थितींत आढळते. येथील रहिवाशांत व आफ्रिकेच्या दक्षिण व पूर्व भागांत राहणाच्या लोकांत थोडा फरक आहे. वर नमूद केलेल्या प्रदेशांत बंटु लोक राहतात. ते गुरेंढोरें पाळितात. त्यांचे खाण्याचे मुख्यपदार्थ दूध व मका हे होत. यांच्या झोपड्या वर्तुलाकार असून त्यावर लहानसा घुमट असतो. अथवा शंकूच्या आकारासारखें छप्पर असतें. ते धनुष्याशिवाय भाला व चांबड्याची ढाल यांचा उपयोग करितात. मृत पूर्वजांची पूजा करणें हा यांचां धर्म होय.

वरील अंतर पडण्याचें कारण असें आहे कीं, पहिली संस्कृति फार प्राचीन कालची आहे. दुसरी तिच्याहून थोडी अर्वाचीन आहे, व दुस-या संस्कृतीच्या लोकांत समाजसंघटनेची बरीच वाढ झालेली दिसते. कारण मृतपूर्वजांची उपासना समाजसंघटना असल्यावांचून अस्तित्वांत येत नाहीं.

यांच्या उपजातींच्या राहणींत थोडा बहुत फरक असतो. पूर्वेकडील लोकांस तंतुवाद्य वाजवतां येतें व सुरा नेमका फेकण्याची कला त्यांस अवगत असते. नाईल नदीच्या वरच्या भागांतील लोक लोखंडाचे अलंकार वापरतात.

सूदनमध्यें सेमाईट जात राहते. या भागांत अरब लोकांनीं आपली संस्कृति स्थापन केली. हे लोक मुसुलमानांप्रमाणें सुंता करतात. यांचे विशिष्ट प्रकारचें शस्त्र म्हणजे तलवार होय. शिंगासारख्या आफ्रिकेचा पूर्वभाग आहे तेथें हेमाइट व सेमाइट संस्कृतीचीं भेसळ झाली आहे.

तंतुवाद्य, शंकूसारख्या अथवा मधमाशाच्या पोळ्याचा आकार असलेल्या झोंपड्या, सुंता, तलवारीचा उपयोग ही सर्व या लोकांत आढळतात.