प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

ललितकला.- ललितकलांची वाढ होण्यासाठीं ज्या मुख्य साधनांची जरूरी असते तीं साधनें अमेरिकन लोकांस अनुकूल होतीं. तीं साधनें म्हटलीं म्हणजे, ज्याच्यावर काम करावयाचें त्या पदार्थांची विपुलता व स्फूर्तिजनक सृष्टिचमत्कार हीं होत. पण त्यांजवळ चांगल्या उपकरणांचा अभाव असल्यानें व त्यांच्या विलक्षण व चमत्कारिक धर्म समजुतीमुळें या कालांची वाढ या समाजांत होऊं शकली नाहीं. त्या लोकांत कुशल कोष्टी, कुंभार, कारागीर, व चितारी होऊन गेले. निरनिराळ्या जातींनीं वेगवेगळ्या कलांत प्राविण्य संपादन केलें होतें. तिने लोक पिसांवर चांगलें नक्षीकाम करीत.

उत्तरेकडील पॅसिफिक महासागरालगतच्या प्रदेशांत रहाणा-या जाती शिंग, स्लेट व सिडर लांकडांवर कातीव काम करण्यांत कुशल होत्या. कॅलीफोर्नियांतील लोकांनां टोपल्या करितां येत असत. प्यूब्ला व पेरु देशांतील लोकांनीं कुंभारकाम करण्यांत अग्रस्थान मिळविलें होतें. अमेझान नदीच्या भागांत राहणा-या लोकांस ठळक व उठून दिसणा-या रंगांची फार आवड होती. मेक्सिको व मध्य अमेरिकेंतील लोक पाषाणशिल्प व वास्तुसौंदर्यशास्त्र या कलांत नांवाजलेले होते. मय लोकांच्या वास्तुकामावरून अमेरिकन लोकांनीं या कलांत किती पाऊल पुढें टाकीलें होतें याची कल्पना सहज करतां येईल. युक्समल व शिचेनिट्झ या गांवीं प्रेक्षणीय भव्य इमारती आहेत. वास्तुकामांत व पाषाण शिल्पांत नाजुकपणा मात्र आढळत नाहीं.