प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
विरकोच.- सर्व वस्तूंचा आद्य स्त्रष्टा म्हणून इंका विरकोचाला पूजीत. पण त्यांनां त्याच्याविषयीं फारशी माहिती नसल्यानें ते त्याला एकसारखे आरडून ओरडून विचारीत असत कीं, तूं कोण आहेस, कोठें आहेस हें आम्हाला सांग. त्यांचीं जीं कांहीं स्तोत्रें उपलब्ध आहेत त्यांपैकीं एकाचा अनुवाद खालीलप्रमाणें करतां येईल.
''सर्व विश्वाधिपति विरकोचा ! तूं सध्यां पुरूष आहेस कां स्त्री आहेत? हे अग्नीशा, श्रेष्ठजनका ? तूं कोठें आहेस हें कळण्याला कांहीं दृष्टांत होईल कां ? तूं जवळ नाहीं; तर कोठें आहेस ? वरती आहेस कीं खालती आहेस किंवा आपल्या राजसिंहासन दंडाच्या आसमंतांत आहेस ? तूं वरती स्वर्गांत ऐस कीं खालीं समुद्रांत ऐस, कोठें कां असेनास, पण माझें ऐक.''