प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
समाजघटना.- समाजाचा मूळ घटक गोत्र अथवा क्लॅन हें असें व ब-यांच गोत्रांची मिळून एक जात होत असे. जातीचा पुढारी किंवा मुख्य निवडणूक करून नेमीत असत, अथवा तो मान वंशपरंपरा एकाच घराण्यांत असे. प्रत्येक गोत्राचें एक देवक असे व त्याचें नांव त्या गोत्रास ठेवीत असत.
येणेंप्रमाणें उत्तर अमेरिकेंतील इंडियन लोकांच्या संस्कृतीची माहिती मिळते. याखेरीज मेक्सिकोमध्यें एक प्राचीन संस्कृती बरीच प्रगल्भ दशेस पोंचलीं होती व पेरू देशांत इंका नांवाच्या राज्यकर्त्यांची व त्यांचे पूर्वीं तेथें रहात असलेल्या लोकांची संस्कृतीहि बरीच विकास पावलेली असावी अशीं अनुमानें काढण्यास बरीच जागा आहे. तरी त्या दोन संस्कृतीविषयीं थोडीशी माहिती टीपारूपानें पुढें देत आहोंत.