प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

रशियनांचा प्रवेश.- पुढें सोळाव्या शतकाच्या अखेरास रशियन लोक सैबिरियांत आले तेव्हां त्यांनां तेथील अवनत स्थिति आढळली. पण त्यापूर्वीं सोळाव्या शतकाच्या आरंभीं तुर्कस्तानांतून तातार लोक सैबिरियांत घुसून त्यांनीं उरल पर्वताच्या पूर्वेस वसलेल्या टोळ्यांचा पराभव केला; व तुर्कस्तानांतून शेतकरी, चांभार, व्यापारी, मुल्ला वगैरे लोक आणवून त्यांनीं लहान लहान राज्ये स्थापलीं. खान एडिगेर याच्या अमलाखालीं तीं सर्वं संयुक्त बनलीं. रशियन लोक उरल पर्वतानजीक वसाहत करूं लागले तेव्हां त्याचा तातार लोकांशीं खटका उडाला. पण त्यांत अखेर खान एडिगेरच्या वकीलांनीं मास्कोला जाऊन एक हजार रूबल वार्षिक खंडणी देण्याचें कबूल केंलें. नोव्हगोरोरियन लोक ११ व्या शतकापासूनच सैबीरियांत घुसूं लागले होते. परंतु लोकसत्ताक राज्य मोडून ईशान्येकडील अमलाखालचा मुलुख ताब्यांतून गेला तेव्हां रशियन लोकांची उरलपर्वतापलीकडील प्रगति कांहीं काळ बंद झाली. पुढें स्टेनकारेझिन (१६६७-१६७१) या धाडसी वीराचा पराभव झाल्यावर मास्को येथील जुलुमी सत्तेखालीं मान वांकविण्यास तयार नसलेल्या पुष्कळ लोकांनीं पर्ममध्यें स्ट्रोगॅनोव्हनें स्थापलेल्या वसाहतींत प्रयाण केलें. परंतु या आगंतुकांनां स्थान देण्याची स्ट्रोगॅनोव्हची इच्छा नसल्यामुळें त्यानें त्यानां उरल पर्वतापलीकडे सैबीरियांत जाण्यास सांगून धान्य व हत्यारांची मदतहि केली. तेव्हा १६३६ लोकांची टोळी येर्माकच्या नेतृत्वाखालीं १५८० मध्ये सैबीरियांत शिरली. त्यापैकीं ५०० लोकांनीं खान कुचुम याच्या इस्केर (तोबोलस्कनजीक) नांवाच्या निवासस्थानाला वेढा दिला तेव्हां कुचुम पळून गेला व सेबीरिया येर्माकच्या हातीं पडला. तो मुलुख ४ थ्या इव्हॅनला देऊन त्याची मर्जी येर्माकनें पुन्हां संपादन केली. १५८४ मध्यें येर्माक इर्टीश नदींत बुडून मरण पावला व कोसॅक लोक सेबीरिया सोडून गेले. परंतू पुढें दरसाल धाडसी रशियन लोक या भागात येऊं लागले व त्यांनां मास्को येथून मदत मिळत असे. दक्षिणेकडील लोकांशीं झगड्याचा प्रसंग न यावा म्हणून उत्तरेच्या बाजूनेंच पूर्वेकडे सरकत सरकत सुमारें ऐशी वर्षांत या रशियन लोकांनीं अमूर नदी व पासिफिक महासागर गांठला. मध्यंतरीं मास्कोच्या सरकारनें या भागांत किल्ले बांधले व त्यांभोवतीं शेतकरी लोकांच्या वसाहती करवून किल्यांतील. शिबंदीला धान्य मिळेल अशी व्यवस्था केली. इतक्या थोडक्या अवधींत सर्व सैबीरिया रशियनांच्या हातीं पडला याचें कारण त्यांनां तातार किंवा तुर्क यांपैकीं कोणीहि जोराचा अडथळा केला नाहीं. १६०७-१६१० मध्ये तेगुसी लोकांनीं स्वातंत्र्यरक्षणाकरितां रशियन लोकांशीं निकराचा सामना केला. पण १६२३ मध्यें त्यांचा रशियन लोकांनीं पूर्ण मोड केला. १६२८ मध्यें रशियन लोक लेना नदीपर्यंत पोहोंचले, व १६३७ मध्यें त्यांनीं याकुटस्कचा किल्ला बांधला. नंतर दोन वर्षांनीं ते ओखोटस्क समुद्रापर्यंत जाऊन पोहोंचले. बुरायत लोकांनीं रशियनांना थोडा अडथळा केला, परंतु १६३१-१६४१ या काळांत कोसॅकांनीं त्याच्या मुलुखांत कित्येक किल्ले बांधले. पुढें चिनी लोकांनीं विरोध केल्यामुळें मात्र कोसॅक लोकांनां ते किल्ले सोडुन द्यावे लागले. १८५२ मध्यें एका रशियन लष्करी टोळीनें अमर नदीच्या प्रदेशांचें संशोधन केले; आणि १८५७ मध्यें रशियन कोसॅक व शेतकरी लोकांनीं हा प्रदेश वसाहत करुन व्यापून टाकिला. व या कृत्याला चीननें १८६० च्या तहान संमति दिली.

सैबीरियाचें शास्त्रीय दृष्ट्या संशोधन १७३३ पासून सुरू झालें. या संशोधनात ग्मेलिन, मुल्लर, फिशर, गोगीं वगैरे संशोधकांनीं भाग घेतला. पालास यानें कित्येक रशियन विद्यार्थ्यांच्या मदतीनें वनस्पति, प्राणी व मानव रहिवाशी यांचें संपूर्ण संशोधन करण्यास सुरूवात केली व मॅक, ग्लेहन, रॅद्द, श्रेंक वगैरे संशोधकांनीं तें कार्य तडीस नेलें. याप्रमाणें सैबेरिया प्रांतांत यूरोपीयांचा प्रवेश झाला. सैबेरियाचा राजकीय इतिहास रशियाच्या इतिहासांत अंतर्भूत होतो.