प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

मुख्य जाती, त्यांची उत्पत्ति व प्रसार.- आफ्रिकेत बुशमन, नीग्रो, हेमाइट, सेमाइट व लिबियन अशा पांच मुख्य जाती आहेत हें वर सांगितलेंच आहे. शेवटच्या तीन जातींचा मूळ पुरूष एकच असावा असें मानववंशशास्त्रज्ञांचें मत आहे. बुशमन व नीग्रो हे दोन आफ्रिकेंतील अस्सल मूळचे रहिवाशी असावेत असें अनुमान तज्ज्ञ लोक काढितात.

बुशमन जातीच्या उत्पत्तीचा कांहीच पत्ता लागत नाहीं. हे लोक दक्षिण आफ्रिकेचे मूळचेच रहिवाशी असावेत. नीग्रोचें मूलसथान सरोवराच्या मालिकेच्या पूर्वेस असलेल्या उंचवट्यांच्या प्रदेशांत असण्याचा बराच संभव आहे असे नागवंशशास्त्रज्ञ म्हणतात व तेथूनच हे लोक साहारा वाळवंटाच्या सरहद्दीवरून पश्चिमेकडे व पूर्वेचा उंच प्रदेश ओलांडून दक्षिणेकडे गेले असावेत.

तांबडा समुद्र व हिंदीमहासागर यांमध्यें असलेला जो शिंगासारखा भाग आहे तेथून हेमाइट लोकांचा प्रसार दुसरीकडे झाला असावा. बंटू ही नीग्रोंची पोटजात आहे व बंटू व बुशमन यांचा मिश्रणानें हॉटेनटाट जात झाली आहे.

पूर्वेकडून पश्चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे जी मुख्य जातींचीं प्रयाणें झालीं व त्या योगानें जें जातीचें संकरण झालें त्याचा बराच काल टिकणारा परिणाम सूदनसारख्या सपाट देशांत दिसून आला. तेथें मोंठीं राज्यें उदयास आलीं. उदाहरणार्थ, घाना, मेल्ले, सानघाई व बोर्नु हीं अनुक्रमें ७,११,१४ व १६ व्या शतकाच्या सुमारास मोठ्या भरभराटीस आलीं.

त्याचप्रमाणें पूर्वेतून दक्षिणेंत जीं प्रयाणें झालीं, त्यामुळें जातीच्या संकरानें घोंटाळा माजला व अर्वाचीन -होडेशियांत निरनिराळ्या संस्कृती अस्तित्वांत आल्या त्यांचे अवशेष सध्यां तेथें दृष्टीस पडतात.

कांहीं झुलू लोकांनीं उत्तरेकडे व्हिक्टोरिया नायंझापर्यंत जोरानें चाल केली. तेथें त्यांचा व नीग्रो जातींचा संकर होऊन निरनिराळ्या नव्या जाती उत्पन्न झाल्या. प्राचीन ''किटवारा'' नांवाचें एक राज्य रेवेव्झोरीच्या उंचवट्यांच्या भागांत होतें तें मोडून त्याची निरनिराळीं शकलें झालीं. हीं जी लहान लहान राज्यें झालीं, त्यांतली सत्ता हेमाइट उमरावांचे हातीं होती. तसेंच झंग लोकांचें पूर्वीं एक मोठें राज्य होते. त्याचें झांजीबार हें एक चिरस्मरणीय स्मारक सध्यां आहे. हे झंग लोक हेमाइट व नीग्रो लोकांच्या मिश्रणानें झाले असावेत असा मानववंशशास्त्रज्ञांचा समज आहे.

मादागास्कर ह्या बेटाचा आफ्रिका खंडांतच समावेश होतो. हे सध्यां फ्रेंचांच्या ताब्यांत आहे. ह्या बेटांतील लोकांच्या मुख्य तीन जाती आहेत. त्यांचीं नांवे (१) होव्हा, हे लोक उंचवट्याच्या प्रदेशांत राहतात. हे लोक मॅलेच्या द्वीपकल्पांतून अथवा त्याच्या लगतच्या बेटांतून आले असावेत. यांचा वर्ण पीत आहे. (२) साकालाव्हा हे नीग्रोवंशांतले आहेत. (३) मालागासे ही जात वर सांगितलेल्या दोन जातींच्या मिश्रणानें झाली आहे. व्होहा १९ व्या शतकांत ख्रिस्ती झाले. हे दर्यावार्दी आहेत व याच लोकांनीं नीग्रो लोकांस गुलाम म्हणून कामाकरितां येथें आफ्रिकेंतून आणिलें असावेत असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे.