प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

मनरोतत्व.- १८२३ सालीं संयुक्त संस्थानांचा अध्यक्ष जो मनरो त्यानें इतःपर यूरोपियन राष्ट्रांस वसाहत करण्यास अमेरिकेंत जागा नाहीं व अमेरिकेचा यूरोपाशीं कांहीं एक संबंध नाहीं असें जाहीर केलें. वरील सिद्धांत मनरोच्या नांवानें प्रसिद्ध आहे व त्यास मनसे डॉकट्रीन असें म्हणतात.

कानडा व अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांतील वसाहतवाल्यांस राज्यव्यवस्था व कारभार कसा चालवावा याचें बाळकडू लहानपणापासून मिळालें होतें. म्हणून त्यांनीं लोकसत्ताक राज्यपद्धतीच्या संस्था चांगल्या त-हेनें चालवून त्या भरभराटीस आणिल्या व आपल्या देशाचें पाऊल सुधारणेच्या दृष्टीनें पुढें टाकले.

स्पॅनिश लोकांस अशा प्रकारचें शिक्षण न मिळाल्यानें त्यांच्या हातून लोकसत्ताक संस्थांचे चांगल्या प्रकारे सांगोपन होत नाहीं, म्हणून त्यांचीं राज्यपद्धति सुरळीतपणानें चालत नाहीं.

मेक्सिकोंत तर नेहमी बंडाळी चालू असते, त्यामुळें अमेरिकेंतील दक्षिण संस्थानांत शांतताभंग होण्याचा संभव असतो म्हणून तेथें पाळतीवर सैन्य ठेविलेलें असें.