प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
फ्रेंच वसाहती.- १४९४ सालीं रोमच्या पोप या धर्मगुरूनें स्पेन व पोर्तुगाल या दोन राष्ट्रांमधील तंट्याचा निकाल करून सर्व अमेरिका दोघांच्या स्वाधीन केली. त्या वेळीं त्या धर्मगुरूस अमेरिकेच्या विस्ताराविषयीं काहींच कल्पना नव्हती. १६ व्या शतकांत यूरोपात ज्या सामाजिक व धार्मिक चळवळी झाल्या व जी विचारक्रांति झाली त्यामुळें या निवाड्यास इतर राष्ट्रांनीं धाब्यावर बसविलें.
सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धांत फ्रान्स व स्पेन या दोन राष्ट्रांत वितुष्ट आल्यामुळें फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस यानें उत्तर अमेरिकेंत वसाहत करण्याचें मनांत योजिलें व १५२४ व १५४२ सालीं गिओआनी द वराझानो व कार्टिअर या दोन नाविकांनीं जे उत्तर अमेरिकेंतील प्रदेश शोधून काढले त्यांवर फ्रान्स देशाची मालकी आहे असें फ्रान्सिस बादशहानें जाहिर केलें. इतक्यांत या बादशाहाच्या मृत्यूमुळें हें फ्रेंच वसाहतीचें काम इतकेंच राहिलें. याच सुमारास यूरोपांत धार्मिक तत्त्वांच्या मतभेदामुळें जी रणें माजलीं होतीं, त्या योगानें फ्रेंच जनतेचें लक्ष इकडे फारसें गेलें नाही. १५९९ त ही रणें बंद पडतांच फ्रेंचांचा बादशहा चवथा हेनरी यानें अमेरिकेंत वसाहत करण्यास आपल्या प्रजेस उत्तेजन दिलें, व आपला हक्क सध्यांच्या कानडाच्या मुलुखावर शबित करण्याच्या तो तयारीस लागला. या प्रोत्साहनानें पुष्कळ फ्रेंच लोक कानडाच्या भागांत आले पण त्यांनीं तेथें शेती भाती केली नाहीं. त्यांनीं तेथील बायकांशीं लग्नें केलीं व तेथल्या रहिवाशांप्रमाणें शिकारी व जंगली बनले. यामुळें कायमचीं गांवें त्यांस बसवितां आलीं नाहींत व त्यांची लोकसंख्या इकडे तिकडे पांगलेली होती.
या वेळच्या फ्रेंच लोकांच्या डोक्यांत धर्मवेड फार भरलें असल्यामुळें त्यांनीं तेथील मूळच्या लोकांनां ख्रिस्ती करण्यासाठीं आटोकाट प्रयत्न केले. असें करण्यांत तेथील रानटी लोकांचा क्रूरपणा व जोम नाहिंसा करून त्यांनीं धर्मोपदेशकाच्या मुठींत राहावे, हा त्यांचा बाटविण्यांत मूळ उद्देश होता. १४ वा लुई हा एक प्रसिद्ध बादशहा फ्रान्स देशांत होऊन गेला. त्यानें १६६१ त कानडाच्या वसाहतीच्या बाबतींत मन घातलें. व त्यानें फ्रान्स देशांतील पाखंडी लोकांस तेथें जाण्याचा मज्जाव केला. त्यामुळें ज्यांच्या अंगी वसाहत करण्यास लागणारे गुण धाडस, पाणी व प्रसंगावधान होते अशा लोकांस तेथें थारा न मिळाल्यानें कानडांत फक्त एक लहानसा परावलंबी व अधिका-यांच्या मुठींत असलेला असा शेतकरी वर्ग फक्त राहिला. या वसाहतींत फ्रेंच अधिका-यांचें फार स्तोम माजलें होतें व त्याच कारणानें फ्रेंच लोकांस वसाहती राखण्यासाठीं अतोनात पैसा खर्च करावा लागला. वसाहतींची सुधारणा करण्यासाठीं जास्त जास्त मुलूख त्यांनीं आपल्या ताब्यांत घेण्यास सुरूवात केली. या धोरणाचा परिणाम असा झाला कीं, मुलुख मात्र अफाट, वस्ती थोडी व तुरळक, पण वसाहती राखण्यासाठीं मायदेशास खर्च अतोनात पडे.