प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

पाषाण शिल्प.- इंडियन लोक खाणींतून दगड टिकाव व पहारींनीं काढीत असत. मऊ दगड कठिण दगडाच्या हातोड्यांनीं फोडीत व ते हाडांच्या हत्यारांनीं साफ करीत असत. शंखजि-यासारखे मऊ दगड कापून त्यांनां पाहिजे त्या आकाराचे बनवीत. या लोकांस दगड कापण्याची व त्यांस भोंक पाडण्याची कला अवगत होती. पाषाणावर नक्षीकाम यांस करितां येत असे. छिनी, हातोडा व नक्षीकामाचीं हत्यारें धातूंचीं केलेलीं नसत. तीं बहुतेक दगडाचीं तयार केलेलीं असत.

धातुकाम.- जरी या लोकांस संमिश्रक द्रव्यें मिसळून भट्टींतून शुद्ध स्थितींत धातु गाळून काढितां येत नसत, तरी पण सानें, रुपें व तांबें वगैरे धातु ब-याच शुद्ध स्थितींत तयार करीत. या धातूंचे पत्रे, तारा, व कांबी यांस करतां येत होत्या.

कुंभारकाम.- कुंभाराचें चाक या लोकांनीं जरी प्रत्यक्ष शोधून काढिलें नव्हतें, तरी त्याजवळ जवळ ते आले होते. व ह्या लोकांनीं निरनिराळ्या त-हेचीं भांडी केलीं आहेत. या कलेची या खंडांत सर्वत्र सारखी वाढ झाली नाहीं. संयुक्तसंस्थानाच्या नेर्ॠत्येकडील भागांतील मूळच्या रहिवाशांनीं या कलेंत चांगलेंच प्राविण्य संपादन केलें होतें. त्याप्रमाणेंच मेक्सिको, मध्यअमेरिका वगैरे भागांत उत्तम भांडीं सापडतात. या विषयावर वाङ्मयहि बरेंच आहे.

विणकाम.- या लोकांस विणकाम करितां येत होतें. त्यासाठीं ते प्राणिजन्य व वनस्पतिजन्य तंतू वापरीत असत. पहिल्या प्रकारचे तंतू केंस, पिसें, कातडीं, आंतडीं वगैरे पदार्थांपासून काढीत. लहान लवचीक फांद्या, साल, पानें, गवत व कापूस या सारख्या वस्तूंचा बराच उपयोग होत असे. यांपासून तयार केलेले पदार्थ निरनिराळ्या प्रकारचे असून त्यांचा उपयोग निरनिराळ्या कामीं होत असे. वल्कलें, ताटी, कुंपणें, कागद, टोपल्या तूणकामाचे पदार्थ, कापड, नक्षीकाम असलेले कपडे व फीत हीं बहुतेक प्रदेशांत बायका हातांनीं करीत असत. यासाठीं लागणारें यांत्रिक सामान व हत्यारें अगदीं साध्या त-हेची असत. आंगावरील वस्त्रें, घरगुती सामान, हजारों लहानसान धंद्यासाठीं लागणारी भांडीं, पूजेसाठीं व समारंभकरितां उपयोगी पडणारीं उपकरणी ही सर्व विणून तयार करीत या वरून ह्या कलेंत या लोकांनीं बरेंच प्राविण्य संपादन केलें असावें असें दिसते.