प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

प्रवासाचीं साधनें.- एस्किमो लोक उत्तरेकडील हिममय प्रदेशांत रहात असत. त्यांनीं बर्फावरून प्रवास करण्याकरितां बिनचाकाच्या, कुत्र्यांनीं ओढण्याजोग्या हलक्या गाड्या केल्या होत्या. ह्या गाड्यांतून ते फार दूरवर प्रवास करीत असत व आहेत. पेरू देशांत ओझीं वाहण्याकरितां लामांचा उपयोग करीत. वरील लोकांशिवाय बाकी सर्व जातीचे इंडियन लोक पायीं प्रवास करीत व ओझीं पाठीवरून नेत. इंडियन लोकांनीं जलमार्गानें प्रवास करण्यासाठीं होड्या तयार केल्या होत्या. असल्या होड्या एस्किमो लोक वहात आलेल्या लाकडांच्या ओंड्याच्या करीत. उत्तरेकडील प्रदेशांत या होड्या बर्च नांवाच्या झाडाच्या सालीच्या करीत. होड्या करण्याच्या कामीं इंडियन लोकांनीं बरीच कुशलता दाखविली होती. ही डोडी एका माणसास सहज उचलतां येत असून, तिचे तुकडे करून दूरवर नेतां येत असे. ह्या होड्या वल्ह्यांनीं, काठ्यांनीं अथवा अवजारांनीं चालवीत असत. त्यांच्या सहाय्यानें इंडियन लोक हजारों मैल जलमार्गानें प्रवास करून जात.