प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

फ्रेंच सत्तेचा –हास.- फ्रेचांनीं सध्याच्या कानडाच मुलुखांत वसाहत केली होती. पण ह्या अफाट प्रदेशांत त्यांचे लोक मात्र मूठभर होते. याखेरीज लुईशियानांत (संयुक्त संस्थानाचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग) त्यांची कांहीं ठाणीं होतीं. मायदेशास या कांहीं वसाहतींच्या रक्षणासाठीं बराच खर्च करावा लागे. हा सर्व खर्च टाळून फायदा होण्यासाठीं, त्यांनीं जास्त जास्त मुलुख ताब्यांत घेण्यास सुरूवात केली. ही युक्ति फ्रेंच लोकांस फार पसंत पडून त्यांनीं ती अमलांत आणिली. कानडा व लुईशियाना या दोन वसाहती ओहीओ नदीवर ठाणीं बसवून जोडाव्या व इंग्लिश वसाहतवाल्यांस अलेघनीझ पर्वत व अतलांतिक महासागर यामधील चिंचोळ्या पट्टींत कोंडावें असा फ्रेंचांनीं बेत केला. व पुढें लवकरच तंट्यास सुरूवात झाली. हें वितुष्ट बरींच वर्षें चाललें होतें. या बखेड्याचा निकाल थोरल्या पिटच्या कारकीर्दींत लागला. इंग्रजांची दर्यावरील सत्ता फार प्रबल होती. त्यामुळें त्यांनीं फ्रेंचांची कुमक सर्व बंद करून, फ्रेंचांची अमेरिकेंतील सर्व ठाणीं घेतली व फ्रेंचांशीं पुढें जो तह झाला त्यांत कानडा, ओहीओ व मेस्सीसिपी या नद्या लगतच्या सर्व मुलुखावरील सर्व हक्क फ्रेंचांनीं सोडून दिले. ग्वायना व वेस्ट इंडिजमधील कांही बेटें हीच काय तीं फ्रेंचांच्या ताब्यांत अखेर उरलीं.