प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
प्राणिविद्या.- इंडियन लोक मांसाहारी होते, ह्याचा मागेंच उल्लेख केला आहे. हा आहार मिळविण्यासाठीं त्यांची समाजघटना कांहीं ठिकाणीं विशिष्ट प्रकारची आपोआप तयार झाली होती. त्यांस प्राण्यांच्या राहणींचें, वसतीचें व त्यांच्या जीवनक्रमाचें चांगलें ज्ञान होतें. त्यांस धरण्यासाठीं व कित्येक प्रसंगीं मारण्यासाठी निरनिराळीं आयुर्धे व उपाय योजावे लागत असत. हीं आयुर्धे करण्यासाठीं व युक्त्या अमलांत आणण्यासाठीं त्यांत बरीच बुद्धि खर्चावी लागे. त्यामुळें त्यांची अवलोकनशक्ति, स्मरणशक्ति व बुद्धि हीं बरींच वाढलीं होतीं. त्यांचे ठिकाणीं साहस शौर्य व चिकाटी वगैरे गुण आले होते. स्वाभाविक सौंदर्य व सृष्टिचमत्कार यांची त्यांस चांगली माहिती होती. यांच्या समाजघटनेचा व प्राणिसृष्टीचा इतका निकट संबंध होता कीं, यांच्या जातिदैवकांस प्राण्यांचीं नावें दिलीं आहेत. ज्योतिष, संख्याशास्त्र, कार्यकारणाची मीमांसा, इतिहास, भाषा व चित्र या सारख्या विषयांत यांचें पाऊल पुढें पडण्यास याच विद्येचा यांस उपयोग झाला असावा, असें तज्ज्ञांचें मत आहे. यांच्या देवतांची उत्पत्ति पशूंपासून होण्याचें हेंहि एक सबळ कारण आहे. दंतकथा, काहण्या, मंत्रतंत्र व धर्मभोळेपणा व यांचे निरनिराळे आचार या सर्वांवर या विद्येचा किंवा ज्ञानाचा ठसा उमटलेला दिसतो. हा ह्यांच्या धर्माचा विचारात्मक किंवा विश्वासात्मक भाग असून दुस-या भागांत आचाराचा समावेश होतो. या दोहोमुळें त्यांच्यांत निरनिराळें पंथ व उपासना अस्तित्वांत आल्या. या विचारांचें प्रतिबिंब यांच्या उपासनेंत समाजघटना, धार्मिक नाटकें (अभिनय), व करमणुकींत पडलेलें आढळतें. यांच्या धर्माचें आकलन होण्यासाठीं खालीं सांगितलेले मुद्दे ध्यानांत ठेविले पाहिजेत. (१) प्रत्येक सृष्टींतील वस्तूंत, चमत्कारांत एकाजीवंत माणसाचे विचार, इच्छा, वगैरे गुणांनीं युक्त असलेली एक स्वतंत्र शक्ति किंवा व्यक्ति असते. (२) या व्यक्तींत निरनिराळे आत्मे किंवा छाया असतात त्यामुळें तीस वाटेल त्या प्राण्याचें रूप धारण करितां येतें. (३) या अदृश्य सृष्टींत मानवसमाजसंस्थेसारखी घटना असते. तिचेच अनुकरण आपण आपल्या मतें करतों. (४) सर्व उपासना अभिनयानें होत असे. कांहीं थोड्या पुढें आलेल्या किंवा उच्च संस्कृति असलेल्या जातींत बली देण्याचा प्रघात होता. धार्मिक आचारविचारांवर स्वाभाविक परिस्थितीचा परिणाम होत असे. तसेच जे लोक शेती करून राहात व जे फक्त पारध करून आपले पोट भरीत, त्यांच्या धार्मिक विचारांत बराच फरक होता. या विचारांचें प्रतिबिंब या लोकांच्या कलाकौशल्याच्या कामांत दिसतें.