प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
मयतसंस्कृति - हल्लींचे ग्वाटेमाला प्रजासत्ताक राज्य, होंडुरस प्रजासत्ताक राज्य आणि चिआपास व टाबाम्को हीं मेक्सिकन संस्थानें, यांच्या नजीकचे प्रदेश आणि युकॅटन द्वीपकल्प एवढ्या मुलुखांत आतांप्रमाणें प्राचीन काळींहि अनेक निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या रहात असत. यांच्या भाषा एकाच मयभाषावंशांतील असून, त्यांच्यांतील प्रमुख जे यूकॅटनमधील लोक, त्यांच्या नांवावरून या वंशाला ''मय'' असें नांव पडलें. मेक्सिको व मध्यअमेरिका यामधील प्रमुख संस्कृत-राष्ट्रांमध्यें या लोकांचें स्थान मेक्सिकन लोकांच्या खालोखाल लागेल यांत शंका नाहीं. पण दुर्दैंवानें या लोकांचें संस्कृतिवैशिष्ट्य, यांचा इतिहास व त्यांच्या रोजच्या राहाणींतील गोष्टी यां संबंधीं मेक्सिकन लोकांपेक्षां फारच कमी माहितीं उपलब्ध आहे. मध्य अमेरिकेंत या प्रमुख प्राचीन स्मारकें आहेत, तीं या वंशांतील लोकांनींच तयार केलेली आहेत. ते मोठे ज्योतिर्विद व गणिती असून त्यांनीं शुक्र व इतर ग्रह यांच्या परिभ्रमणाचा काळ अजमावला होता व दशलक्षापेक्षां मोठ्या संख्या योजणें व लिहिणें त्यांनां पूर्ण अवगत होतें. चित्रलिपीची त्यांची पद्धत मेक्सिकन लोकांपेक्षां जास्त चांगली सुधारलेली दिसते. माणसें व पशु यांच्या सजीव प्रतिमा पुनरुद्धृत करण्यांत त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. एकंदरींत त्यांची संस्कृति व उपासनासंप्रदाय मेक्सिकन लोकांवरहुकूम होता हें उघड आहे.
धार्मिक आचारांत मेक्सिकन लोकांसारखे ते रक्तपात करणारे नव्हते; कारण त्यांच्यांत परमेध फारच अल्प प्रमाणांत असत व पुष्कळ वेळां तर मनुष्याऐवजीं कुत्रें मारुन काम भागवीत. प्रार्थनाविधी, बलिदान, उपवास आणि देहदंड या बाबतींत ते मेक्सिकन लोकांसारखे वागत; कान व जीभ यांनां भोंकें पाडून त्यांतून दोरा ओवीत. अग्निदेवतेला जिवंत प्राणी बळी देत व कोठें कोठे तर धगधगीत निखा-यावरून उघड्या पायांनीं चालत जाण्याचा देहदंड ते भोगण्यास तयार होत.
वीस दिवसांचा एक महिना असे वर्षाचे अठरा महिने यांच्यांत असत. वर्षारंभीं धार्मिक संस्कारांकरितां लागणारी सर्व भांडीं व जिनसा नवीन तयार करून ते एकामागून एक संस्काराला आरंभ करीत. पर्जन्यदेवतांकरितां एक मोठा यज्ञ करण्यांत येई; त्या वेळीं जवळपास सापडणारे सर्व प्राणी जमा करून आणीत व त्यांनां मारून त्याचीं हृदयें अग्नींत टाकीत. वाघ, सिंह, चित्ते यांसारखे न सापडणारे भयंकर प्राणी, खरे न आणितां, त्यांच्या हृदयासारख्या राळेच्या आकृती तयार करून त्या अग्न्यर्पण करीत. दर महिन्याला कांहींना कांहीं सण असेच. मंथ व अरणीपासून अग्निमंथन करून काढीत. हा विधि आपल्या इकडील अग्न्या. धानाप्रमाणें असे. पशु मारणारा ॠत्विज यांच्यांत मोठा माणूस समजत नसत. उपाध्यायांनां ''अह-किन्'' दिवसांचे अधिपती, म्हणजे दिनमानावरून भाकितें करणारे म्हणत. तेच मय लोकांचे शिक्षक व पुढारी असत.