प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

मेक्सिकोची प्राचीन संस्कृति.- मेक्सिको हें नांव मेक्सिका अथवा अझटेका या नांवाच्या लोकांवरून पडलें आहे. सोळाव्या शतकांत स्पॅनिश लोकांनीं तेथें प्रवेश केला. त्यावेळीं त्यांनां तेथें एक सुधारलेलें राष्ट्र आढळलें. या राष्ट्राचें सैन्य, न्यायकोर्टें, तसेंच इतर राज्यकारभाराचीं खातीं आणि सुधारलेली शेतकी व अनेक प्रकारच्या शिल्पकला, चांगल्या स्थितींत होत्या. स्पॅनिश लोकांनां विशेष आश्चर्याची गोष्ट आढळली ती अतिशय मोठाल्या दगडी इमारती ही होय. या इमारतींचें नक्षीकाम यूरोपांतील तत्कालीन शिल्पकारांनीं तोंडांत बोट घालावें असें होतें. त्यामुळें मेक्सिकोंतील प्राचीन राष्ट्राची माहिती मिळविण्याचा अनेक संशोधकांनीं प्रयत्न केला आहे. मेक्सिकोंतील मूळच्या अझटेक व इतर भाषांचा यूरोपांतील किंवा अमेरिकेच्या इतर भागांतील भाषांशीं मुळीच संबंध नाहीं. यावरून मेक्सिकोंतले लोक फार फार काळापूर्वी जेव्हां अमेरिका व आशिया हीं खंडे एकमेकाला जोडलेलीं होतीं तेव्हांपासूनच तेथें रहात असले पाहिजेत, असें अगदीं अलीकडील संशोधकांचे मत झालें आहे. तथापि मेक्सिकन लोकांची संस्कृति फार प्राचीन नसून ती अलीकडे आशियांतील व अमेरिकेंतील इतर राष्ट्रांबरोबरच्या परिचयामुळें तयार झाली आहे असें दिसतें. उदाहरणार्थ राशींची नांवें, महिन्यांची नांवें व साठ वर्षांचें युग मोजण्याची पद्धति ही मेक्सिकन लोकांनीं मोंगल, तिबेटी व चिनी लोकांतील उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रेगन (कल्पित सपक्ष सर्प), सर्प, घोडा, बोकड, माकड, कोंबडा, कुत्रा, डुक्कर या बारा प्राण्यांच्या नांवावरून घेतलीं आहे. हिंदु लोकांतील चार युगांची कल्पना मेक्सिकन लोकांत आढळते. तसेंच ब्राह्मण व बौद्ध धर्मांतील नऊ लोक व नरक या कल्पनाहि मेक्सिकन लोकांच्या धर्मकल्पनांत आहेत. मेक्सिकन राष्ट्राच्या इतिहासाची माहिती १२ व्या १३ व्या शतकापासून मिळते. व त्या पूर्वींच्या कांहीं शतकांची त्रोटक दंतकथात्मक माहितीहि उपलब्ध आहे. सहाव्या शतकांत टोलटेक नांवाचे लोक मेक्सिकोंत येऊन राहिले. या लोकांच्या राजधानीचें शहर टोलन म्हणजेच हल्लींचें टुलन किंवा टुला हें शहर होय. या लोकांनींच मेक्सिकोंत मका व कापूस हे पदार्थ प्रथमतः आणिले. सोन्यारूप्याचें काम करण्यांत आणि इमारती बांधण्यांत हे लोक कुशल होते. या टोलटेक लोकांचें राष्ट्र ११ व्या शतकांत अवर्षण, दुष्काळ व रोगाच्या सांथी यामुळें नष्ट झालें. यानंतर मेक्सिकोंत अझटेंक लोकांनीं वसाहत केली. या लोकांचा टेनॉक या नांवाचा एक पुढारी होता. नांवावरून टेनॉकटिटलन या नांवाचें राजधानीचें शहर १३२५ मध्यें स्थापण्यांत आलें. या अझटेक लोकांच्या शेजारच्या आकोलहूवा व टेपानेक या लोकांबरोबर बनेक वर्षें लढाया होऊन अखेर तिघांची १४३० च्या सुमारास दोस्ती झाली व एक राष्ट्र बनलें. अझटेक राष्ट्रानें आपली संस्कृति ब-याच उच्च दर्जाप्रत नेली. तिचें थोडक्यांत स्वरूप येणेंप्रमाणे:-

रा ज्य का र भा र.- अझटेक राजांच्या हातांत अनियंत्रित सत्ता असे. राजा मृत झाल्यानंतर त्याच्या भावाला किंवा पुतण्याला, जो वयानें सर्वांत वडील असेल त्याला राज्यपद मिळत असे. या नियमाचें कारण राज्यकारभार पोक्त व अनुभवी माणसाच्या हातांत असावा हें दिसतें. या राजांचे राजवाडे भव्य व सुंदर असत. मेक्सिको येथील मुख्य राजवाड्यांत तीन चौक व शेकडों खोल्या होत्या. राजवाड्याभोंवती विस्तृत बागा असून त्यांत अनेक जातींचीं फुलझाडें आणि पशु पक्षी ठेवलेले होते. राजघराण्याशिवाय देशांत सरदार, शेतकरी, गुलाम हे तीन मुख्य वर्ग असत.

न्या य प द्ध ति.- वरिष्ठ न्यायकचेरी राजवाड्यांत असे आणि मुख्य मुख्य शहरीं न्यायाधीश नेमलेले असत. त्यांनीं दिलेले फौजदारी दाव्याचे निकाल फिरविण्याचा अधिकार खुद्द राजासहि नसे. कायदे व दाव्यांची हकीकत चित्रलिपींत लिहून ठेवलेली असे. फौजदारी कायद्यांतील शिक्षा फार कडक असत. किरकोळ चोरीला सुद्धां शिक्षा म्हणून चोराला चोरी केलेल्या इसमाचा गुलाम होऊन रहावें लागत असे. धान्याच्या पिकाचीं २० कणसें चोरणाराला मृत्यूची शिक्षा असे. बाजारांत चोरी करणाराला मार देऊन ठार करीत असत. तरूण मनुष्य दारू प्याल्यास त्याला काठ्यांनीं मारून ठार करीत.

युद्ध.- अझटेक राष्ट्र मोठें युद्धप्रिय होतें. कसलेल्या लढवय्याला मोठा मान व मोठाल्या हुद्याच्या जागा मिळत. खुद्द राजपुरुषाला युद्धांत स्वतःकैदी पकडून आणल्याशिवाय राज्याभिषेक होत नसे. सरदारांच्या मुलांनां युद्धकलेचें शिक्षण नियमानें देण्यांत येत असे. वरच्या दर्जाचे सैनिक शिरस्त्राणें व चिलखतें वापरीत असत. त्यांचीं मुख्य हत्यारें धनुष्यबाण व भाले हीं होतीं. ते शत्रूवर चालून जाण्यापूर्वीं त्याला मांडलिकत्व कबूल करण्याबद्दल वकिलामार्फत निरोप पाठवीत असत. तटबंदी किल्ले बांधण्याचीहि त्यांनां चांगली माहिती होती.

पा र मा र्थि क क ल्प ना.- अझटेक लोक युद्धदेवतेलाच सर्व देवांमध्यें श्रेष्ठ समजत असत. सूर्य व चंद्र या प्रमुख देवता होत्या. त्याशिवाय दुय्यम दर्जाच्या अनेक देवता होत्या. त्यांत दरबारी चैनबाज लोकांची निराळी देवता. मद्यपी लोकांची निराळी देवता, सुवर्णकारांची निराळी देवता वगैरे अनेकांच्या निरनिराळ्या देवता असत. येथील देवालयांचा नमुना प्राचीन बाबिलोनियाच्या देवालयांसारखा असून आकारानेंहि तीं तशींच असत. ती पिरॅमिडच्या आकाराची चौकोनी किंवा लांबट पायावर बांधलेलीं असत. युद्धदेवतेच्या देवालयांत मनुष्यांचे बळी देत असत. अशा बळी दिलेल्या हजारों इसमांच्या शिरांचा ढीग देवालयाच्या शेजारीच पडलेला असत असे. मेक्सिकन लोकांमध्यें पुरोहित ऊर्फ देवाच्या सेवकांचा स्वतंत्र वर्ग असे. देवतेच्या धार्मिक विधीमध्यें प्रार्थना करणें, बळी देणं, मिरवणूक काढणें, नाचणें, उपास करणें वगैरे गोष्टी असत. मनुष्याच्या बलीशिवाय मका वगैरे पदार्थांचें बलिदान देत असत.

ले ख न प द्ध ति व शि क्ष ण.- येथें प्रथम चित्रलिपि प्रचारांत होती. या लिपीच्या सहाय्यानें मेक्सिकन पुरोहितवर्ग धार्मिक विधी, पौराणिक कथा, प्रसिद्ध ऐतिहासिक गोष्टी व दरसालचें पंचांग या गोष्टी लिहून ठेवीत असे. अशा लेखांचे कांहीं नमुने किंगज्वरो येथें पहावयास मिळतात.

मेक्सिकन लोकांचें शिक्षण- विशेषतः उच्च वर्गांतील मुलांचें शिक्षण-धर्मोपदेशकांकडून होत असे. शिक्षणाकरितां बांधलेल्या मोठ्या इमारती देवळांनां जोडलेल्या असत व तेथें मुलगे व मुली अगदीं लहान वयापासून शिक्षणाकरितां जमत असत. कांहीं वर्षें प्राथमिक शिक्षण झाल्यावर सैनिक होण्यास योग्य असलेल्या मुलांनां युद्धकलेचें शिक्षण देण्यांत येत असे. निरनिराळ्या उद्योगधंद्यांचें शिक्षण घेणा-या मुलांनां त्यांचे वडील आपापल्या घरीं शिक्षण देत असत. सरदारांच्या मुलांनां इतिहास, ज्योतिष, कायदे व धर्मतत्त्वें यांचे शिक्षण मोठ्या परिश्रमपूर्वक देण्यांत येत असे.

शे त की व खा द्य प दा र्थ.- येथील मुख्य धान्य मका हें असून त्याची पेरणी जमीन भाजून त्यांत करीत असत. मेक्सिकन लोकांनां शेतीला पाणी देण्याकरितां कालवे बांधण्याचंहि ज्ञान होतें. कोको आणि चाकोलेट हे पदार्थ यूरोपियन लोकांनां मेक्सिकन लोकांपासून माहित झाले. टोमाटो व मिरची हे पदार्थहि मूळ मेक्सिकोमधून आले. मेक्सिकन लोक मातीचीं भांडीं घडविण्यात मोठे कुशल असत. मेक्सिकन लोकांचीं वस्त्रें जुन्या काळात कोरफड व ताडाच्या जातीच्या झाडांच्या धाग्यांचीं विणलेलीं असत. नंतर कापसाची लागवड मोठ्या प्रमाणांत होऊं लागली व कापसापासून रंगीत व तलम कापड करण्यांत हे लोक तरबेज बनले. सोनें, रुपें, तांबें, कथील वगैरेचें धातुकामहि मेक्सिकन लोक चांगले करीत असत. लोखंड ही धातु त्यांनां माहीत नव्हती.

या हकिकतीवरून मेक्सिकन लोक यूरोपियन लोकांचा सहवास लागण्यापूर्वीं बरेच सुधारलेले होते हें स्पष्ट दिसते.