प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

यांत्रिक शिल्प.- इंडियन लोकांनीं निरनिराळ्या प्रकारचीं हत्यारें केलीं होतीं. त्यांनां लोखंड काढतां येत नसल्यामुळें त्यांच्यात त्या धातूचीं हत्यारें नव्हतीं. ते आपली हत्यारें बहुतकरून लांकूड, पाषाण व हाडें वगैरे पदार्थांचीं करीत असत. हे लोक हत्याराचा उपयोग तासण्याच्या, भोंक पाडण्याच्या, घट्ट धरण्याच्या, कुटण्याच्या व इतर असल्याच कामीं करीत असत. दगडाच्या चिपा व शार्क सारख्या प्राण्यांचें दांत यांचा त्यांनां फार उपयोग होत असे. त्यांनां मऊ दगडाच्या उपयुक्त वस्तू कापून तयार करतां येत होत्या. त्यांनां धातू गाळितां येत होत्या याविषयीं मात्र विश्वसनीय पुरावा नाहीं. सध्यांच्या इंजिनियर लोकांनां मोठमोठे दगड उचलण्याच्या व ते दूरवर नेण्याच्या ज्या युक्त्या माहीत आहेत त्या त्यांनां ठाऊक होत्या असें दिसत नाहीं. त्यांनीं ज्या मोठ्या इमारती बांधल्या आहेत. त्यांचे मोठे दगड मजूरांच्या मदतीनें नेले असावेत. यासाठीं पुष्कळ माणसें कामाला लाविलीं असावींत. इतकीं माणसें एकत्र करून त्यांनां अन्नपाण्याचा पुरवठा करण्याकरितां राजकीय संस्था ब-याच व्यवस्थित व सुसंघटित स्थितींत आल्या असाव्यात.

कांहीं लोकांस छायायंत्राचा उपयोग माहीत होता. वेळ मोजण्याची साधनें सार्वत्रिक नव्हतीं. हे लोक सावलीवरून कालमानाचें मापन करीत असावेत. या लोकांत मापण्याची मापें किंवा तोलण्यासाठीं वजनें निश्चित नव्हतीं. या लोकांजवळ पैसा क्वचितच असे. देवघेवीच्या कामी टिकाऊ वनस्पतीचा अथवा प्राणिजन्य पदार्थांचा उपयोग करीत असत.