प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
शिल्पकला.- इंडियन लोक आपल्या गरजा भागविण्याकरितां निरनिराळ्या वस्तू तयार करित असत व आहेत. या वस्तूंचे नमुने अमेरिकेंतील व यूरोपांतील पदार्थसंग्रहालयांत जुळवून व व्यस्थित रीतीनें मांडून ठेविले आहेत. पुराणवस्तुसंशोधकांनीं इंडियन लोकांच्या शिल्पकलांचा विकास लक्षांत घेऊन फार प्राचीन कालापासून तो सद्यःकालापर्यंतच्या अवधीचे ६ भाग कल्पिले आहेत (१) कोलंबसाच्या पूर्वकालीन, (२) कोलंबसाच्या प्रथम कालचे अथवा १५ व्या शतकांतले, (३) जगाशीं संबंध होण्याच्या पूर्वकालीन, (४) जगाशीं संघटनाच्या वेळचे, (५) संघटन झाल्यानंतरचे, (६) सद्यःकालीन.
पहिल्या भागांत अगदीं प्राचीन काळापासून तों कालंबसानें अमेरिकेचा शोध लावीपर्यंतच्या काळाचा समावेश होतो. १५ व्या शतकांतल्या शिल्पकलांचे नमुने यूरोपांतील व अमेरिकेच्या पदार्थसंग्रहालयांत आढळतात. अमेरिकेचा शोध लागल्यापासून तों इंडियन लोकांशीं व्यापारविषयक संबंध येईपर्यंतच्या कालास इंग्रजींत पाश्चात्यसंसर्गपूर्वकालीन काल असें नांव दिलें आहे.
या पुढील कालांत इतर संस्कृतीचा परिणाम इंडियन लोकांच्या शिल्पावर झालेला दिसतो. यामुळें इंडियन लोकांनीं जे फेरफार केले त्यांचीं स्थित्यंतरें विचार करण्यासारखीं आहेत. सध्यां जे पदार्थ इंडियन लोक तयार करितात ते शेवटच्या भागांत मोडतात.