प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

राज्यकारभार.- प्रजेचे दहा वर्ग वयमान व शरीरसामर्थ्य यांच्या अनुरोधानें पाडलेले असत. चार प्रांतांवर चार सुभेदार असून, त्यांनीं देशांतील अंतःस्थितीचे आंकडेहि पुरवावयाचे असत. जमीन लोकांच्या मालकीची समजून त्यांतील उत्पन्न इंका [सरकार] हुआका [देवस्थान] व हुआच्चा (लोक) यात विभागलें जाई. प्रत्येक धट्या-कट्या मनुष्याचा म्हणजे ''प्युरिक'' चा पिकामध्यें भाग असे, पण तो पेरणीच्या वेळीं मात्र हरज पाहिजे. राज्यांत लोकसंख्या फार मोठी असून ती एक सारखी वाढत चालली होती.