प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

भाषा - इंडियन लोकांच्या भाषांच्या मुख्य २०० जाती आहेत. या दोनशें मुख्य जातींत सुमारें हजार पोट भाषांचा समावेश होतो. ह्या बोलणारांची संख्या कमी जास्त असते. कांहींचा शब्दसंग्रह फार मोठा तर कांहींचा फार कमी आहे. या भाषांचें लेखन करण्यासाठीं ध्वनिलेखनशास्त्रज्ञांस आपल्या लिपींत नवीन वर्णांची भर घालावी लागलीं. या भाषा चिकट्या भाषांच्या वर्गांत मोडतात. इतर भाषांप्रमाणें यांतहि वाक्य हा एक मुख्य घटक आहे. शब्द व शब्दमुच्चय ही वाक्याचीं मुख्य अंगें आहेत.

अमेरिकेंतील भाषांचा अभ्यास भाषाकोविदांनीं ब-याच पूर्णत्वास नेला आहे. म्हणून इंडियन लोकांत लेखनपद्धत कशी अस्तित्वांत आली असावी याविषयींची सुसंगत माहिती सध्यां शास्त्रंज्ञांस देतां येते. अभिनव, उपास्यप्रतिमा, चित्रलिपी, चित्रा ऐवजी त्यांचा प्रमुख अवयव व कल्पनाचिन्हें ही ह्या विकासाचीं निरनिराळीं स्थित्यंतरें होत. वीर पुरुष आपण केलेल्या पराक्रमांची माहिती विस्तृतरीतीनें सांगतां यावी म्हणून ठळक प्रसंगांचीं चित्रें आपल्या वस्त्रांवर रंगवीत असत.

एस्किमो लोक आपल्या दंतकथांची सूचकें हस्तीदंतावर खोदून काढीत असत. त्लिंकिट जातीचे लोक असलीं सूचकें दैवकस्तंभांवर कोरुन ठेवीत असत. मध्यअमेरिकेंतील कांहीं जातींनीं ह्या संक्षिप्त चित्रलिपीचा उपयोग याखेरीज दुस-या कामीं केल्यामुळें त्यांची मजल शब्दाच्या घटकाबद्दल कांहीं विशिष्ट चिन्ह लिहिण्यापर्यंत येऊन पोहोंचली होती.