प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

पाषाख.- उत्तरेकडील कांहीं भाग सोडून पुरुषांत पायघोळ व बायकांत आखूड आंगरखा घालण्याचा प्रघात होता. उष्ण प्रदेशांत वहाणा व उत्तरेच्या भागांत उंच बूट (लांब मोकासिन) पायांत घालीत असत. एस्किमो लोकांत मात्र विजार व झगा पुरूष व बायका वापरीत असत. दक्षिणेंत कातड्याचे सैल अंगरखे उपयोगांत आणीत असत. दक्षिणेच्या कांहीं प्रदेशांत शिरस्त्राण अगदीं वापरीत नसत. आंगांवर गोंदण्याची चाल मात्र सार्वत्रिक सुरू होती. हाडें, शिंगे व दगड यांचीं भूषणें करीत असत. समारंभाच्या प्रसंगी सोंगें घेण्याची वहिवाट होती.

घरें व वस्ती.- इंडियन लोक आपलीं घरें, ज्या प्रदेशांत जो पदार्थ घर बांधण्यास सोईस्कर होईल, त्याचीं बांधीत असत. एस्किमोंचीं घरें बर्फा चीं केलेली असत. तिने व सिओ लोकांच्या घरांचा शंकूसारखा असून, तीं चामड्यांचीं अथवा झाडाच्या सालींचीं बनविलेलीं असत. त्लिंकिट लोकांचीं घरें लांकडाच्या फळ्यांचीं असत. प्यूब्लो लोकांच्या घरांतील खोल्या मधमाशाच्या पोंवळ्यांतील घरासारख्या षट्कोनी असून त्यांवरील छप्पर गवताचें असे. अशीं पुष्कळ घरें मिळून एक खेडें होत असे. प्रत्येक खेड्यांत एक सार्वजनिक दिवाणखाना असे.