प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
दक्षिण अमेरिकेंत स्वतंत्र राष्ट्रांचा उदय - यूरोपांत या वेळीं स्वतंत्रतेची लाट पसरली होती. व सर्व यूरोपभर अनियंत्रित बादशाही सत्तेला आळा घालून तिजवर लोकमताचा दाब घालण्याचे प्रयत्न जारीने चालू होते. फ्रान्स देशांत राजदंडाचे केव्हांच तुकडे तुकडे झाले होते. अमेरिकेंतील इंग्लिश वसाहतवाल्यांनीं आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें. या सर्व चळवळीचा परिणाम आपल्या वसाहतीवर काय होणार हें स्पॅनिश सरकारास अवगत होतें. स्पॅनिश लोक व दक्षिण अमेरिकेंतील मूळचे रहिवाशी क्रियोल यांच्या रक्तांची भेसळ होऊन नवीनच प्रजा अस्तित्वांत आली होती. यांपैकीं कांहीं तरूण स्पेन देशांत विद्याभ्यासासाठीं जात व त्यांबरोबर नवीन स्वातंत्र्यांच्या कल्पनेचें वारें दक्षिण अमेरिकेच्या वसाहतींत खेळूं लागलें.
स्पॅनिश अधिकारी वर्गाची मिजास फार माजली होती. वसाहतीचा उपयोग दुभत्या गाईसारखा स्पॅनिश लोकांनीं इतकीं वर्षें केला होता कीं, त्यामुळें वसाहतवाल्यांत एक प्रकारची असंतुष्टता पसरली होती. वेळींच जर सढळ हातानें सवलती दिल्या असत्या तर दक्षिणअमेरिकेंतील वसाहती मायदेशास चिकटून राहत्या. स्पेन देश नेपोलियननें जरी जिंकला तरी वसाहतींनीं आपली राजनिष्ठ ढळूं दिली नाहीं. याचा मोबदला म्हणून त्या वसाहतींस कांहीं अधिकार न मिळतां स्पेनच्या कायदेमंडळानें कांहीं सवलती न देण्याचा आपला हट्ट तसाच चालविला. हें मंडळ स्पेनच्या व्यापा-यांच्या मुठींत होतें म्हणून स्वार्थापलीकडे त्यास दुसरें कांहींच दिसलें नाहीं यांत नवल तें काय ?
ही बातमी वसाहतींत पसरतांच इतकीं वर्षें धुमसत असलेला तीव्र असंतोष भडकला व वसाहतींनीं स्वातंत्र्याचें निशाण उभारलें व स्पेन देशाशीं असलेला संबंध कायमचा तोडून टाकला. स्पॅनिश लोकांनीं फ्रेंचांच्या मदतीनें पुन्हा आपल्या वसाहती जिंकण्याचे प्रयत्न सुरू केले. हें इंग्रजांस समजांच स्पॅनिश सत्ता पुन्हां प्रस्थापित झाल्यास आपल्या व्यापारास अडथळा होईल अशी भिति वाटून त्यांनीं वसाहतीचें स्वातंत्र्य कबूल केलें.