प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

इंग्लिश वसाहती - अमेरिकेंत वसाहती स्थापन करण्याच्या बाबतींत इंग्रजांनीं फ्रेंचांचें अनुकरण केलें. राणी एलिझाबेथ इंग्लंडच्या तक्तावर असतांना इंग्लंड व स्पेन या दोन प्रमुख राष्ट्रांमध्यें वैमनस्याचें बी रूजलें. त्याबरोबर स्पेनचा बादशाहा पांचवा चालस यांशीं जो इंग्रजांनीं व्यापार विषयक तह केला, त्या अन्वयें आपणांस स्पेनच्या वसाहतींशीं व्यापार करण्याचा हक्क पूर्वींच मिळाला आहे असें इंग्रज लोक म्हणूं लागले. स्पॅनिश लोकांनीं अर्थातच हें नाकबूल केलें व रोमच्या धर्मगुरूनें आंखून दिलेल्या रेषेपलीकडील मुलुखांत यूरोपांत केलेल्या तहांचें अस्तित्व आपणांस मान्य नाहीं असें मत जाहीर केलें.

हा तंटा जरी चालू होता तरी इंग्रजांनीं १५७८ पर्यंत अमेरिकेत वसाहत करण्याच्या प्रयत्नांस खराखुरा आरंभ केला नाहीं. याच वर्षीं सर हंफ्र गिलबर्ट नामक खलाशानें अमेरिकंतील प्रदेशाचा शोध करून वसाहत करण्याचा परवाना बादशाहाकडून मिळविला. याच कामांत त्याचा अंत झाल्यानें ते त्याच्या बंधूनें आपल्या हातीं घेतलें. या थोर पुरूषानचें नांव सर वॉल्टर रॅले होय. या गृहस्थानें व्हर्जिनिया नांवाची वसाहत स्थापन करण्यासाठी एकसारखे पुष्कळ प्रयत्न केले पण यासहि यश आले नाहीं. १६०७ सालीं व्हर्जिनियांत पहिली कायमची वसाहत स्थापन झाली. व्हर्जिनियाच्या प्रदेशाची मालकी त्या नांवाच्या कंपनीस मिळाली होती.

१६२० सालीं दुस-या कायमच्या वसाहतीची स्थापना प्लिमथ येथें झाली. या वसाहतीचा पाया इंग्लंडांतील राजधर्माचीं मतें मान्य नसलेल्या लोकांनीं घातला. या दोन केंद्रस्थानापासून निरनिराळ्या १३ वसाहती उत्पन्न झाल्या. या वसाहतीस इंग्रजींत मळे (प्लँटेशन्स) असें म्हणत.

या तेरा वसाहतींपासून पुढें अमेरिकेंतील संयुक्त संस्थानें निर्माण झालीं. या वसाहतींचे उत्तरेकडील व दक्षिणेकडील वसाहती असे दोन विभाग करीत असत.

दक्षिणेकडील वसाहतवाल्यांचा कल विशेष कोणत्याहि धर्मपंथाकडे नव्हता. ते नीग्रो गुलामांच्या मजुरीनें शेती करीत. उत्तरेचे वसाहतवाले प्युरिटन पंथाचे होते व ते स्वतःशेती करीत असत. याशिवाय ते चांगले खलाशी व व्यापारी होते. उत्तरेकडील व दक्षिणेकडील वसाहतींच्या मधील प्रदेशांत विल्यम पेननें वसाहत केली होती. त्यांत क्वेकर पंथाचे लोक होते.

इंग्लिश वसाहतीचे हितसंबंध, रितीभाती व धार्मिक पंथ जरी भिन्न होते तरी त्या स्वतःच्या राजकीय हक्कांचें संरक्षण करण्यासाठीं फार दक्ष असत. मायदेशांत छळ झाल्यामुळें पुष्कळ फ्रेंच, जर्मन वगैरे लोक स्वदेशत्याग करून इंग्लिश वसाहतींत येऊन राहिले होते. त्या लोकांनां इंग्रजांनीं आपल्यांत घेतले. इंग्रज वसाहतींची भरभराट उत्तरोत्तर फार होत गेली. त्यांचा व्यापार, शेती, लोकसंख्या झपाट्यानें वाढत चालली. स्पॅनिश लोकांच्या हातीं इतके दिवस जो व्यापारसंबंधीं मक्ता होता तो त्यांनीं लवकरच हिरावून घेतला. त्यांनीं वेस्ट इंडिज बेटांवर स्वा-या केल्या व ''बुक्यानीर'' म्हणून जे प्रसिद्ध लुटारू अमेरिकेंत होऊन गेले त्यांत इंग्लिश वसाहतवाल्यांचा बराचसा भरणा होता.

इंग्रज व फ्रेंच वसाहती, त्यांच्याशीं मायदेशाचें असलेलें राजकीय धोरण व त्यांच्या भरभराटीसाठीं झालेले प्रयत्न ह्यांची तुलना केली असतां, ती बरीच बोधप्रद होण्यासारखी आहे. फ्रेंच वसाहतवाल्यांस सरकारी बंधनें फार. सरकारी हुकूम अगदीं झेलून धरणारे, त्यांच्या मुठींत असणारे अगदीं शेलके राजनिष्ठ अशा लोकांस मात्र फ्रेंच अमेरिकेंत जाण्यास परवानगी होती. ज्यांच्या अंगीं स्वतःच्या पायावर उभें राहण्याची धमक होती, जे धाडस, प्रसंगावधान व कर्तृत्व या गुणांनीं प्रसिद्धीस आले होते, अशा लोकांवर धर्मसंबंधीं मतभिन्नत्वामुळें फ्रेंच सरकारचा रोष झाला होता म्हणून त्यांस अमेरिकेंत जाण्यास मज्जाव करण्यांत आला होता. सरकारी अधिकारी वर्गाच्या वर्चस्वामुळें लोक अगदीं पराधीन बनून गेले होते.

इंग्लिश वसाहतवाल्यांकडे पहावें तों कांहीं व्यापारविषयक बंधनें सोडून, त्यांनां पूर्ण स्वातंत्र्य मिळालें होतें. तेथें कोणासहि जाण्यास आडकाठी नव्हती. त्यांनां शेतीची चांगली माहिती असल्यानें त्यांची संपत्ति वाढत गेली. त्यांनीं आपण होऊन राज्यकारभाराकरितां मायदेशावरहुकूम संस्था स्थापिल्या. या सर्व सोयींमुळें तेथे धाडसी, जोमदार व कर्तृत्वान् लोकांचा भरणा झाला होता. इंग्लंड देशास वसाहतीपासून फार फायदा होत असे. इंग्लिश वसाहतींचा व्यापार मुख्यत्वेंकरून इंग्लंड देशाशीं चाल असे. वसाहतवाले स्वदेशास धान्य व इतर कच्चा माल पुरवीत व यांत्रिक सहाय्यानें तयार झालेला माल यूरोपांतून अमेरिकेंत येत असे.