प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
आस्ट्रेलियाचें भौगोलिक संशोधन करणारे यूरोपीय प्रवाशी.- आस्ट्रेलियाचा प्रथम शोध कोणीं लावला हे ठरविणें कठिण आहे. तेराव्या शतकांत चिनी लोकांनां याखंडाची माहिती होती असा पुरावा मिळतो. मलायी लोकांनांहि ही माहिती होती. १३ व्या शतकाच्या अखेरीस पूर्वेकडील देशांत भेट देणारा मार्कोपालो यानें दक्षिणेकडे एक मोठें खंड आहे असा उल्लेख केलेला आहे. इंग्लंडच्या आठवा हेनरी या राजाला अर्पण केलेल्या एका नकाशांत हें दक्षिणेकडील मोठें खंड दाखवलें आहे. १५०३ मध्यें बिनॉट पॉलमियर सिऊर डी नॉनेव्हिल या फ्रेंच प्रवाशाचे जहाज वादळांत सांपडून एका मोठ्या बेटाच्या किना-याला लागलें होतें, पण हें बेट मादागास्कर असावें असें फ्लिंडर्स व इतर तज्ज्ञांचें मत आहे. १५३१ च्या सुमारास हे खंड शोधून काढल्याबद्दलच्या मानावर फ्रेंच व पोर्तुगीज या दोन राष्ट्रांतले लेखक आपापल्या तर्फें हक्क सांगत आहेत. परंतु खात्रीलायक पुरावा पुढें आलेला नाहीं. १७ व्या शतकाच्या आरंभीं स्पेनचा राजा तिसरा फिलिफ यानें हे दक्षिणेकडील खंड शोधून काढण्याकरितां डी टॅरिस याच्या हुकमतीखाली एक थोड्या जहाजांचा ताफा पाठविला. या जहाजांनीं १६०६ मध्यें न्यू हेब्रिडीज बेटांपैकीं एस्पिरिटो शँटो हे नांव हल्लीं असलेलें बेठ शोधून काढिलें. परंतु पुढें जहाजावरील खलाशांनीं दुखण्याला वगैरे त्रासून बंड केल्यामुळें दी टॉरस संशोधनाचें काम सोडून फिलिपाइन बेटांत गेला याच सुमारास अनेक डच प्रवाशांनीं या खंडाच्या शोधार्थ प्रयत्न केले. यांपैकीं पेलसर्ट यानें दिलेली आस्ट्रेलियाच्या पश्चिम किना-याची माहिती वाचनीय आहे. १७ व्या शतकाच्या आरंभीच्या या डच प्रवाशांनीं दिलेली पश्चिम किना-याची व त्यालगतच्या बेटांची माहिती विश्वसनीय असून त्यांनीं तिकडील भागांनां दिलेली नांवें अद्यापहि चालू आहेत. या खंडाच्या अंतर्भागाची माहिती डच प्रवाशांपैकीं पेलसर्ट ह्या एकट्यानेंच दिली असून कांगेरू या जनावराचाहि त्यानें उल्लेख केला आहे. १६४२ मध्यें डच ईस्ट इंडिज येथील गव्हर्नर व कौन्सील यांच्या मदतीनें अँबेल जॅन्सझून टॅस्मन हा प्रवाशी बटेव्हिआ यांच्या मदतीनें अँबेल जॅन्सझून टॅस्मन हा प्रवाशी बटेव्हिआ येथून आस्ट्रेलिया खंडाच्या शोधार्थ निघाला. त्यानें २४ नोव्हेंबर रोजीं जें बेट शोधून काढलें त्यालाच हल्लीं टॅस्मानिया हें नांव चालू आहे. परंतु टॅस्मनचे खलाशी तेथें उतरले नाहींत. त्यामुळें हें बेट डच लोकांच्या ताब्यांत राहिलें नाहीं. आस्ट्रेलिया खंडाला भेट देणारा पहिला इंग्लिश प्रवाशी वुइल्यम डँपियर हा होय. त्यानें प्रथम १६८८ मध्यें व नंतर १६९९ मध्यें या खंडाच्या संबंधाची बरीच माहिती मिळविली.
यानंतर ब-याच वर्षांनीं म्हणजे १७६९-७० या सालीं कॅप्टन जेम्स कुक यानें केलेली सफर विशेष महत्वाची आहे. १७६९ आक्टोबर ६ रोजीं कुक न्यूझीलंड बेटानजीक गेला व नंतर त्यानें आस्ट्रेलियाच्या पूर्व किना-यावर उतरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळीं तेथें एक देश्य लोकांची टोळी विस्तवावर खाद्य पदार्थ शिजवीत होती. या देश्य लोकांनीं प्रथम कुकच्या जहाजाकडे मुळीच लक्ष दिलें नाहीं. परंतु कुकचे लोक किना-यावर उतरूं लागतांच दोघे देश्य इसम हातांत भाले घेऊन त्यांनां अडवण्याकरतां आले. तेव्हां कुकच्या लोकानीं बंदुक झाडली तरी ते भिऊन पळाले नाहींत. हें त्यांचे धाडस आश्चर्य करण्यासारखें होतें; कारण कोलंबसाला अमेरिकेंत ह्याच्या उलट अनुभव आला होता. तेथील अमेरिकन इंडियन बंदुकीचा आवाज ऐकतांच अगदीं घाबरून गेले; व ते यूरोपीय लोकांनां देवाप्रमाणें मानूं लागले. असो. १७७२ मध्यें कुकनें याच खंडाकडे दुसरी सफर करून आणखी माहिती मिळविली. यानंतर १७८७ मध्यें ब्रिटिश लोकांनीं आस्ट्रेलियांत जाऊन पहिली वसाहत केली. पुढें १८१६ ते १८७५ याच्या दरम्यान अनेक प्रवाश्यांनीं आस्ट्रेलिया खंडाच्या अंतर्भागाचें संशोधन केले. त्यांत ऑक्सले (१८१६), मित्रेल (१८३३), एयर (१८४०), स्टुअर्ट (१८६०), गाईल्स (१८७५) वगैरे संशोधक प्रमुख आहेत.
आस्ट्रेलियांतील वसाहतींचा आरंभीचा इतिहास- आस्ट्रेलियांतील सहा संस्थानांपैकीं न्यू साऊथ वेल्स येथील वसाहत सर्वांत अगोदरची आहे. १७८८ मध्यें पोर्ट जॅक्सन हें ठिकाण इंग्लंडमधून पाठविलेल्या गुन्हेगारांकरितां नवीन बसविण्यांत आले. येथें पुढें पन्नास वर्षें गुन्हेगार पाठविण्याचा क्रम चालू राहून १८३९ मध्यें काळ्या पाण्याची शिक्षाच इंग्रजी कायद्यांतून रद्द करण्यांत आली. १८२१ नंतर या गुन्हेगार वसाहतवाल्यांनीं आपल्या औद्योगिक प्रगतीला चांगला आरंभ केला. याच सुमारास टॅस्मानियांतहि गुन्हेगारांची वसाहत करण्यांत आली. लवकरच व्हिक्टोरिया हें नांव हल्लीं असलेला प्रांत व्यापण्यांत आला. १८२५ ते १८२९ यांच्या दरम्यान वेस्टर्न आस्ट्रेलिया हा प्रांत तयार झाला. हे इतर प्रांत वसाहत स्थापण्याच्या उद्येशानें स्थापन झालेल्या कंपन्यांनीं बसविले. न्यू साऊथ वेल्स हा प्रांत मात्र मूळ गुन्हेगारांनीं बसविला. पुढें १८३९ मध्यें गुन्हेगार पाठविण्याचा कायदा बंद झाल्यावर हे सर्व प्रांत सारख्या दर्जाचे बनले.
१७८८ मध्यें गुन्हेगारांची पहिली वसाहत झाली त्या वेळीं लष्करी अधिका-यांच्या हातांत सर्व अनियंत्रित सत्ता होती. या लष्करी गव्हर्नरांनी तेथें रस्ते, पूल वगैरे बांधून व गुन्हेगार वसाहतवाल्यांस मेंढ्या पाळण्याचा धंदा करण्यास उत्तेजन देऊन या वसाहतीची बरीच सुधारणा केली. पुढें हा धंदा इतर प्रांतांतहि पसरला, व लोकरीचा व्यापार करण्याकरितां श्रीमंत लोक तिकडे जाऊन राहूं लागले.
१८४१ ते १८५१ याच्या दरम्यान ब-याच सोन्याच्या खाणी सापडून या प्रांतांतील वस्ती झपाट्यानें वाढूं लागली. याप्रमाणें भरभराट होतांच १८६० मध्यें पांच संस्थानांनां जबाबदारीची राज्यपद्धति देण्यांत आली. त्यामुळें प्रत्येक प्रांतात आपापली अंतर्गत सुधारणा करण्यास पूर्ण मोकळीक मिळाली. असा आस्ट्रेलियांतील वसाहतींचा थोडक्यांत इतिहास आहे.