प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

आस्ट्रेलिया
लोक.- आस्ट्रोलियांतील देश्य लोकांचें मूळ शोधून काढणें हें मोठें बिकट कोडें आहे. या लोकांचा इतर प्रदेशांतील लोकांशीं असलेला मानवजातिविषयक संबंध शोधून काढण्याचें काम विशेष अवघड असल्याचें कारण असें कीं, त्यांच्या शरीराचें वळण आसपासच्या जातीच्या लोकांच्या शरीरवळणापेक्षां फारच निराळें आहे. हा शरीराच्या ठेवणीचा प्रश्न सोडून देऊन त्यांच्या सामाजिक चालीरीतीसंबंधानें पाहूं गेल्यास त्यावरूनहि त्यांचा पृथकपणा अधिकच प्रस्थापित होतो. त्यांचे शेजारीं मलायी लोक, पाप्यूअन लोक व पॉलीनेशियन लोक शेती करणारे आहेत व घरें बांधून राहणारे आहेत, तर हे आस्ट्रेलियन लोक यांपैकीं कांहीं करीत नाहींत. मातीचीं भांडीं घडविणें ही कला मलायी व पाप्यूअन लोकांस अवगत आहे. धनुष्यबाण वापरण्याचें ज्ञान पाप्यूअन लोकांत आहे. चांगल्या मोठाल्या नावा तयार करण्याइतकें कौशल्य या तिन्ही जातींच्या लोकांत आहे पण यांपैकीं कोणतीच विद्या आस्ट्रेलियन लोकांस नाहीं. अर्थात् आस्ट्रेलियन लोक अत्यंत प्राथमिक अवस्थेंतील मानव जात असल्यामुळें त्यांचे मूळ शोधण्याकरितां फार दूरवर तपास करणें भाग पडतें.

शिवाय या लोकांचे आस्ट्रेलियांत प्रथम आगमन केव्हां झालें यासंबंधीं दंतकथा, आख्यायिका वगैरे कांहीच उपलब्ध नाहीं. यावरून हें आगमन फार फार प्राचीन असले पाहिजे. मलायी, पाप्यूअन व पॉलीनेशियन या लोकांशीं यांचें शारीरिक साम्य मुळींच नाहीं. पण आस्ट्रेलियांतील अनेक देश्य जातीचें मात्र आपसांत इतकें निकट साम्य आहे कीं, त्या सर्व जाती एकाच मानववंशातील आहेत असें मानणें भाग पडतें. पण या निरनिराळ्या जातींच्या भाषा मात्र भिन्नभिन्न आहेत. तथापि व्याकरणदृष्ट्या या अनेक भाषांतील ब-याच क्रियापदांचे मूळ धातू एकच असल्यामुळें त्या सर्व भाषा मूळ एकाच मातृभाषेपासून झाल्या असाव्यात हें उघड आहे. याच वस्तुस्थितीवरून आणखी एक अनुमान असें निघतें कीं, एका मूळ भाषेपासून या अनेक भिन्न भाषा तयार झाल्या; त्या अर्थीं या आस्ट्रेलियन जातीच्या लोकांच्या मूळ पूर्वजांची तेथें वसाहत झाल्यास फार दीर्घ काळ झाला असावा. पॉलिनेशियन लोकांहून आस्ट्रेलियन लोक मानववंशशास्त्रदृष्ट्या भिन्न आहेत या विधानाला भाषविषयकहि पुरावा आहे. तो असा कीं, आस्ट्रेलियन भाषांत संख्यावाचक शब्द तीन चार आंकड्यांपर्यंतच आहेत तर पॉलिनेशियन भाषेंत हे शब्द हजार संख्येपर्यंतहि आहेत.

आस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडील टॅस्मानिया बेटांतील लोकांच्या मूळ उगमाचा प्रश्न वरच्याहूनहि कठीण आहे. कारण टॅस्मानियन लोकांचें शारीरिक साम्य पाप्यूअन लोकांशीं आहे. आस्ट्रियन लोकांशीं मुळींच नाहीं. पण टॅस्मानियन लोकांची कलाविषयक प्रगति मुळींच झालेली नव्हती. कारण त्यांनां नावाहि चांगल्याशा करतां येत नव्हत्या. आस्ट्रेलियांतील व टॅस्मानियांतील वनस्पती व प्राणी यांवरून पाहतां पूर्वीं एके काळीं आस्ट्रेलिया व टॅस्मानिया ही दोन्हीं मिळॅन एकच खंड होतें असें ठरतें. तेव्हां हे पाप्यूअनांचे संबंधी टॅस्मानियन लोक आस्ट्रेलियांतून दक्षिणेकडे उतरत उतरत टॅस्मानियांत आले, कीं टॅस्मानियाचें स्वतंत्र बेट बनल्यानंतर समुद्रावरून तेथें आले ? आस्ट्रोलियांतून आले असें म्हणावे तर आस्ट्रेलियांत या जातीच्या लोकांचे अवशेष मुळींच सांपडत नाहींत. समुद्रावरून आले असें म्हणावें तर त्यांनां दर्यावर्दीपणाचें ज्ञान मुळींच नव्हतें.

आस्ट्रेलियन लोकांच्या संबंधानें मानववंशशास्त्रांनीं निरनिराळे सिद्धांत पुढें मांडले. कोणीं त्यांनां भाषासामयावरून व आचारसाम्यावरून आफ्रिकेंतील नीग्रोलोकांचे संबंधी ठरविलें. परंतु हीं साम्यें भ्रांतिमूलक असल्याचें अलीकडे सिद्ध झालें आहे. ए. आर. वॅलेसनें असा सिद्धांत केला कीं, हे लोक काकेशियन वंशाचे आहेत; कारण त्यांचें जपानांतील आइनस लोकांशीं व कांबोडियांतील ख्मेर व चाम लोकांशीं साम्य आहे. हे काकेशियन वंशीय लोक दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका व आस्ट्रेलिया मिळून पूर्वीं जेव्हां एक खंड होतें तेव्हां या आंटार्टिक खंडांत रहात होते हा सिद्धांत ग्राह्यसा दिसतो. पण पाप्यूयनसदृश टॅस्मानियन लोक टॅस्मानियांत कसे आले हा प्रश्न वरील सिद्धांतास विघातक असल्यामुळें हा दुसरा सिद्धांतहि आतां अग्राह्य ठरला असून एक तिसराच सिद्धांत प्रस्थापित होऊं पहात आहे. तो सिद्धांत असा कीं, एका अज्ञान असलेल्या अशा प्राचीन काळीं हिंदुस्थानच्या दक्षिणेंत रहाणारें द्रविडी लोक खालीं सरकत सरकत सिलोनमध्यें गेले व तेथून लहान लहान नावांच्या सहाय्यानें आस्ट्रेलियाच्या वायव्य भागांत उतरले. पाप्यूअन लोक अगोदरच तेथें होते. त्यांनां या द्रविडी लोकांनीं दक्षिणेकडे रेटलें त्यामुळें ते अखेर टॅस्मानियांत जाऊन राहिले.

आस्ट्रेलियन लोक इंडो- आर्यन आहेत या सिद्धांताला शारीरिक साम्याचा पुरावा आहे. डॉ. चार्लस पिकेरिंग म्हणतो, ''आस्ट्रेलियन लोक अत्यंत मागासलेले असले तरी त्यांचे शरीर बांधेसूद व अवयव रेखलेले असतात.'' हक्सले व सर डब्ल्यु. डब्ल्यु. हंटर यांनीं याच मतास पुष्टि दिली आहे. बिशप काल्डवेलनें असा पुरावा दिला आहे कीं, आस्ट्रेलियाच्या दक्षिण व पश्चिम भागांतील लोक ''मी, तूं, तो, आम्ही, तुम्ही, यांनां मद्रास किना-यावरील द्रविडी कोळ्यांचेच शब्द वापरतात.''  आणि शिवाय आस्ट्रेलियन लोकांचें द्रविडी लोकांशीं शारीरिक साम्य आहे. या सर्व गोष्टी लक्षांत घेता द्रविडी लोकच फार फार प्राचीन काळीं आस्ट्रेलियांत गेले हा सिद्धांत खरा मानावा लागतो.

हे मूळचे आस्ट्रेलियन लोक फार मागासलेले राहिल्यामुळें त्यांचा इतिहास किंवा संस्कृति याबद्दल देण्यासारखी माहिती कांहींच नाहीं. यूरोपीय लोकांनीं आस्ट्रेलियाचा शोधून काढली तेव्हां तेथील लोक अगदीं प्राथमिक स्थितींत होते. शिकार केलेल्या जनावरांचें मांस व कंदमुळें आणि सर्प वगैरे प्राणी खाऊन ते रहात असत. जमीन नांगरून शेतकी करणें किंवा गुरें पाळणें या गोष्टीहि त्यांनां माहीत नव्हत्या. कायमची घरें बांधून राहणें त्यांनां माहित नव्हतें. बहुतेक भांगांतले स्त्रपुरूष पूर्ण विवस्त्र स्थितीत हिंडत असत. थेडक्यांत सांगावयाचें म्हणजे सामाजिक, राजकीय व धार्मिक बाबतींत हे लोक मागासलेले असल्यामुळें त्यांची अधिक माहिती येथें देण्याची आवश्यकता नाहीं.