प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

अमेरिकेंशीं युरोपीयांचा परिचय.- फार प्राचीन काळापासून यूरोप खंडाच्या पश्चिमेस एक मोठा प्रदेश आहे असा लोकांचा समज होता. मध्ययुगांत तर या खंडाचा विस्तार, तेथील रहिवासी व त्यांची अफाट संपत्ति यांविषयीं दंतकथा यूरोपच्या वातारवणांत फार दाट पसरल्या होत्या. त्यांचा परिणाम कोलंबसाच्या मनावर झाला व त्यास हा देश शोधून काढण्याची उत्कंठा फार लागली. प्रवासाच्या सामुग्रीची जुळवाजुळव करतांना त्यास फार हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. सरतेशेवटीं स्पेनचा राजा फर्डिनांड व राणी इसावेला यांचीं मनें वळवून त्यांपासून त्यानें तीन जहाजें मिनतवारीनें मिळवलीं. ३ आगस्ट १४९२ इसवी रोजीं तो प्रवासास निघाला व त्याच वर्षाच्या आक्टोबरच्या १२ तारखेस बहामा बेटावर त्यानें पाय ठेवला. हा दिवस अमेरिकेचा शोध लागला म्हणून जगाच्या इतिहासांत चिरस्मरणीय झाला आहे.

अमेरिका या नांवाची उत्पत्ति अमेरिगो व्हेसप्युसी यापासून झाली आहे व १५०७ मध्यें वाल्डसीमुल्लर या गृहस्थानें जो नकाशा प्रसिद्ध केला त्यांत अर्जेनटाईनच्या मुलुखास हें नांव दिलें होतें. जसजसे या खंडांतींल अज्ञात प्रदेश उघडकीस येऊं लागले तसतसें तें नांव पसरत चाललें व शेवटीं या दोन्ही खंडांस एकाच नांवानें लोक ओळखूं लागले.

प्रथम कोलंबसास आपण अमेरिकेचा शोध लावला ही कल्पना देखील नव्हती. त्यास आशियाचे पूर्वेस आलों असें वाटून त्यानें आपण शोधून काढलेल्या प्रदेशास ''इंडोज'' हें नांव दिले व तेंच नांव स्पेनच्या अमेरिकेच्या वसाहतीस अनेक पिढ्या चालू होतें.

पोर्तुगीज लोकहि दर्यावर्दीपणाबद्दल व धाडसाविषयीं त्या वेळीं प्रसिद्ध होते त्यांनींहि ब-याच नवीन नवीन देशांची ओळख पाश्चात्य लोकांस करून दिली.

स्पेन व पोर्तुगाल या दोन राष्ट्रांत नवीन हुडकून काढलेल्या प्रदेशावर कोणाचें स्वामित्व असावें याबद्दल तंटा उत्पन्न होऊन त्याचा निवारा करण्याचें काम रोमच्या धर्म गुरूकडे सोंपविण्यांत आलें. त्याच्या अखेरनिकालान्वयें ग्रीनीचच्या पश्चिमेस ६० पश्चिम रेखांशाच्या पलीकडील मुलुखावर स्पेनची सत्ता कायम राहिली. या निकालानंतर अमेरिका शोधण्याचें काम जारीनें सुरू झालें. कालंबसानें स्वतः मध्य अमेरिकेच्या किना-यावरून एक दोन सफरी केल्या (१५०२-१५०४). १५०९ सालीं डेरियन नांवाची पहिली स्पेनची वसाहत हिस्पानिओलांत स्थापन झाली. १५११ त क्यूबा बेटांत वसाहत झाली. १५१२ च्या सुमारास फ्लॉरिडा व बहामा खाडीच्या किना-याचा पूर्णपणें शोध लागला. १५१३ त डेरिअनची संयोगीभूमि ओलांडून वास्को नुनेझ डी बाल्बोआ पॅसिफिक महासागरांत प्रविष्ट झाला. १५२० सालीं मॅगिलननें अमेरिकेच्या अगदीं दक्षिण टोंकास प्रथम वळसा घातला म्हणून त्या सामुद्रधुनीस मॅगिलनची सामुद्रधुनी हेंच नांव ठेविलें. ह्या सामुद्रधुनीच्या शोधानंतर ५० पाश्चिमरेखांशाच्या पलीकडील भूभागाच्या संशोधनाची इतिश्री झाली.

स्पॅनिश लोकांनीं प्रथम व्यापाराकरितां अमेरिकेंत वसाहती केल्या व त्यासाठीं अमेरिकेंत नसलेले प्राणी व वनस्पति युरोपांतून तेथें नेले. क्यूबा बेटांत ऊंसाची मोठी लागवड केली. पण अमेरिकेंत सोन्याच्या खाणींचा शोण लागला व जसजसें सोनें वगैरे धातू जास्त सापडूं लागल्या तसतशी स्पॅनिश लोकांची सुवर्णतृष्णा अनावर झाली. खाणींत काम करण्याकरितां मजुरांचा तुटवडा भासूं लागला तेव्हां येथील मूळच्या रहिवाश्यांस जबरीनें गुलाम करण्यांत आलें. प्रथम वसाहती कायमच्या नसत. सोनें संपतांच त्या एका जागेहून दुसरीकडे हालवीत असत. मेक्सिको व पेरु हे देश सोडून जिकडे तिकडे रानटी लोकांच्या टोळ्या पसरल्या होत्या. असल्या टोळ्यांचा तर टिकाव स्पॅनिश लोकांपुढें मुळींच लागत नसे.

मेक्सिको व पेरु देशांत सुव्यवस्थित व सुसंपन्न राज्यें होतीं व तेथील लोकांतहि एका विशिष्ट संस्कृतीची प्रगति झाली होती. पण या लोकांस यूरोपीयांचें शस्त्रास्त्रांचें ज्ञान नव्हतें म्हणून हीं दोन राज्यें स्पॅनिश तृष्णेच्या बळी पडून त्यांचा नायनाट झाला. मेक्सिकोचें राज्य कोर्टिसनें तेथील दुफळ्यांचा फायदा घेऊन जिंकलें म्हणून त्याची स्पेनच्या किंबहुना यूरोपच्या इतिहासांत निपुण राजकार्यधुरंधर पुरुषांत गणना केली आहे ! पीझारोनें विश्वासघात करून थोड्या सैन्यानिशीं पेरु घेतला म्हणून जगांत त्याची कीर्ति अजरामर आहे !

स्पॅनिश लोकांनीं जे येवढें अफाट राज्य अमेरिकेंत निर्माण केलें त्याचा राज्यकारभार अगदीं निव्वळ वसाहतीच्या पद्धतीवर चालविला होता. या पद्धतीचें थोडक्यांत दिग्दपद्धतीवर करावयाचें म्हणजे ही पद्धत संपत्ति शोषण्याची होती असें म्हटलें तर अगदीं अन्वर्थक होईल. वसाहतीनीं सोन्यारूप्यासारख्या मौल्यवान धातू व कच्चा माल पुरवून त्या ऐवजीं स्पेन देशांत तयार झालेला माल विकत घ्यावा हें वसाहतीच्या राज्यकारीगाराचें मुख्य धोरण ठरलें होते. वसाहती म्हणजे स्पेनच्या राजाची अमेरिकेंतील खासगी मिळत होती. व राज्यकारभाराकरितां ''कौन्सिल ऑफ इंडिज'' नांवाचें मंडळ स्थापन करण्यांत आले होतें. अमेरिकेंतील वसाहतीचे चार भाग करून त्या प्रत्येकावर एक गव्हर्नर नेमीत असत. लहानसान भागाच्या मुख्य अणिका-यांस ''कॅपर जनरल'' पदवी दिली होती. गव्हर्नरच्या हातीं सर्व प्रकारच्या अधिकाराचीं सूत्रें होतीं. त्याच्या सत्तेस फक्त न्यायकचे-यासच थोडासा आळा घालता येत असे. सर्व निकालांवर ''कौन्सिल ऑफ इंडिजकडे'' अपील होत असे. खाणीच्या उत्पन्नाचा पांचवा हिस्सा राजास द्यावा लागे. या कामाकरितां प्रत्येक धन्याच्या ताब्यांत पुरेसे गुलाम दिलेले असत. त्यांच्याकडून ते काम चोपून घेत असत. गुलामांकडून काम घेण्याची चट लागल्यावर तेथील मूळ रहिवाशी किती निकृष्टावस्थेस पोंचले असतील याची सहज कल्पना करतां येईल.

पोर्तुगीज लोकांनीं ब्राझिल (दक्षिण अमेरिका) देशांत वसाहत केली. त्यांनीं देखील स्पेनच्या वसाहतीच्या पद्धतीचें अनुकरण केलें. १५३४ सालीं खासगी व्यापाराचें कायद्यानें नियमन करण्यांत आलें व १५४९ त या देशावर एक गव्हर्नर जनरल नेमला.