प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

अमेरिकन इंडियन लोकांच्या जाती.- मानवेतिहास शास्त्रज्ञांनीं या लोकांची वसतिस्थानें लक्षांत घेऊन यांच्या जाती कल्पिल्या आहेत, त्यांपैकीं मुख्य जाती व त्यांचीं स्थानें येणेंप्रमाणें:-
  (१) एस्किमो - आर्तिक किना-याच्या लगतच्या भागीं.
  (२) तिने अथवा देने - कानडाच्या वायव्यप्रदेशांत.
  (३) अलगोनक्विन-इरोक्वा-कानडा व उत्तर अमेरिकेंतील पूर्वेकडील संस्थानांत.
  (४) सीयो - पश्चिमेच्या सपाट प्रदेशांत.
  (५) मस्कहोगी - मेक्सिकोच्या आखातालगतच्या संस्थानांत.
  (६) त्लिंकिट हैडा - उत्तर पॅसिफिक किना-यावर.
  (७) सालिश चिनुक - फ्रेझर कोलंबिया किनारा.
  (८) शोशोनी - कॅलिफोर्नियाच्या अंतर्भागांत
  (९) प्युब्लो - नैर्ॠत्येकडील संयुक्त संस्थानांत व उत्तर मेक्सिको.
  (१०) नव्हातला मय - दक्षिण मेक्सिको व मध्य अमेरिका.
  (११) चिबचा केचुवा - दक्षिण अमेरिकेच्या डोंगरांच्या रागेंत.
  (१२) कॅरिब अरावाक - क्रॅरिबिअन समुद्राच्या लगतच्या प्रदेशांत.
  (१३) टुपी ग्वारानी - अमेझॉनचा पाणवट्याचा प्रदेश.
  (१४) अरोकॅनिअन - पंपस गवताळ मुलखांत (दक्षिण अमेरिकेच्या).
  (१५) पॅटॅगोनिअन - पॅटगोनिअन द्वीपकल्पांत.
  (१६) फ्यूजिअन - मॅगेलनच्या सामुद्रधुनीजवळपासच्या भागीं.

स्वाभाविक परिस्थितीचा त्याचप्रमाणें उपयुक्त धातूंचें किंवा इतर वस्तूचें सान्निध्य किंवा अभाव यांचाहि परिणाम राहणीवर बराच घडतो. जनावरें मालाची ने आण करण्याच्या कामीं व धातू आउतें व शस्त्रास्त्रें करण्याच्या कामी फार उपयुक्त असतात व यांच्या समृद्धीमुळें किंवा अभावामुळें या निरनिराळ्या लोकांच्या जीवनक्रमांत फार महत्वाचे फरक पडले आहेत.