प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
अमेरिका.
अमेरिकेंतील मूळ रहिवाशी.- कोलंबसानें अमेरिका शोधून काढिली खरी, पण त्यास आपण आशियाखंडाच्या दक्षिणेस आलो आहों, असें वाटून त्यानें त्या देशास व तेथील रहिवाशांस ''इंडिया व इंडियन्स'' अशीं नांवें दिलीं. पुढें जेव्हां या खंडास लोक अमेरिका या नांवानें ओळखूं लागले, तेव्हां येथील रहिवाशांस अमेरिकन इंडियन्स असें म्हणण्याचा प्रघात पडला.
हे लोक पूर्वेकडून आले व यांचा अगदीं प्राचीन काळीं नीग्रो किंवा कॉकेशियन वंशाच्या लोकांशी कोणत्याहि प्रकारचा संबंध नव्हता हें मानववंशशास्त्रज्ञांस कबूल आहे. ह्या लोकांनीं कोठून व कसा अमेरिकेंत प्रवेश केला. अथवा हे लोक एस्किमोचे वंशज आहेत कीं काय, किंवा पेनच्या मताप्रमाणें, जे वाचाहीन मानसदृश प्राणी अमेरिकेंत अलारकाच्या मार्गानें उतरले ते यांचे पूर्वज आहेत, वगैरे प्रश्नांची शहानिशा होऊन कायमचा निकास अजून लागला नाहीं. तरी पण या लोकांचा निराळाच एक वंश समजावा असें कांहींचें मत आहे.
हे मूळचे लोक सर्व उत्तर व दक्षिण अमेरिकेंत पसरले होते. अमेरिकेचा विस्तार मोठा व त्यांत सर्व प्रकारचें हवामान आढळतें तेथें डोंगराळ व सपाट प्रदेश आहेत. या सर्व स्वाभाविक स्थितीचा परिणाम या लोकांच्या बांध्यावर वर्णावर व शरीरप्रकृतीवर होऊन यांच्यांत कांहीं उंच तर कांहीं खुजे, काहींचा वर्ण पिंगट तर कांहींचा काळा, कित्येकांचीं डोकीं वाटोंळीं तर कित्येकांचीं लांबट वगैरे फरक यांच्यांत दिसूं लागले असावेत. तसेंच यांच्या जातींत आपआपसांत लग्नें झाल्यानें यांच्या शरीराच्या बांध्यावर व भाषेवरहि बराच परिणाम झाला असावा असें तजज्ञांचें मत आहे.
इंडियन लोक एकंदरींत उंच बांध्याचे आहेत. उंच जातींतल्या लोकांची सरासरी उंची ५ फूट ८ इंचावर असते. ही जात सपाट प्रदेशांत आढळते. खुजे लोक बहुतकरून पहाडी मुलुखांत राहतात.
इतर खंडांतील लोकांचें वर्गीकरण करतांनां त्यांचा वर्ण, उंची व बांधा वगैरे गोष्टींचा फार उपयोग होतो. पण या लोकांचें वर्गीकरण करण्याच्या कामीं त्यांचा उपयोग न झाल्यानें त्यांच्या भाषेच्या विभागानुसार, त्यांच्या जाति व पोटजाति कल्पिल्या आहेत.