प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

आफ्रिकेचा यूरोपीयांस परिचय.- आफ्रिका या भांवाच्या उत्पत्तीविषयीं बरींच अनुमानें विद्वानांनीं केलीं आहेत. कित्येकांच्या मतें हा शब्द सेमाइट लोकांच्या प्रचारांत होता व त्याचा अर्थ ते मातृभूमीपासून दूर असलेली वसाहत असा करीत असत. सर्वांत चांगलें अनुमान ''चार्लस ईसाट'' यानें केलें आहे. रोमन व कार्थेजचे लोक प्रमुख ''बर्बर'' अथवा न्युमिडियन जातीस ''आफारिक'' म्हणत असत व त्यांच्या देशास तेंच नांव देण्यांत आलें. त्याचाच म्हणजे आफारिक शब्दाचा अपभ्रंश आफ्रिका आहे. पूर्वीं भूमध्यसमुद्राचे किना-यालगतच्या भागास आफ्रिका हें नांव देत असत. पुढें या सर्व खंडाला लोक आफ्रिका म्हणूं लागले.

इजिप्त देश जर या खंडांतून वगळला तर या खंडाचा इतिहास म्हणजे आशियांतील व यूरोपांतील येथें आलेल्या वसाहतवाल्यांचा इतिहास होईल. याला अपवाद म्हटला तर एक पूर्वेकडील अविसिनीयाचें राज्य होय.

फिनिशियन लोकांनीं सुमारें ख्रि. पू. १००० चे सुमारास भूमध्यसमुद्रालगतच्या आफ्रिकेच्या इतर भागीं वसाहत करून ख्रि. पू. ८०० मध्यें कार्थेज हें मोठें प्रसिद्ध शहर वसविलें व त्यांनीं उत्तरेकडील वसाहत करण्याजोगता सर्व प्रदेश आपल्या ताब्यांत घेतला.
 
नंतर ग्रीक लोकांनीं वसाहत करण्यास आरंभ केला; व ख्रि. पू. ३३२ सालीं अलेक्झांड्रिया हें शहर वसविलें.

रोमन लोकांनीं ख्रि. पू. १४६ मध्यें कार्थेज शहराचा नाश केला व ग्रीक सत्ताहि नाहींशी करून आपली सत्ता इजिप्त देशांत व कार्थेज शहरीं कायम केली.

रोमन लोकांची आफ्रिका म्हणजे भूमध्यसमुद्राच्या कांठचा प्रदेश अशी समजूत होती. ख्रि. पू. १४६ या वर्षी सिपिओ आफ्रिकॅनस यानें कार्थेज शहराचा पाडाव करून त्या शहराचा रोमन साम्राज्यांत समावेश केला. याच्या शेजारीं असलेले न्युमिडियन लोक रोमचे दोस्त होते. आगस्टस बादशहानें आफ्रिकेंतील रोमन वसाहतींचा कारभार सीनेटचे हवालीं केला. डायोस्लेटीस बादशहानें कार्थेजच्या वसाहतीचा बराच भाग स्पेनच्या प्रांतास जोडला. अकराव्या शतकांत अरब लोकांचा उत्कर्ष झाला व या लोकांची लाट इजिप्त व आफ्रिकेचा किना-यालगतचा पूर्व भाग या प्रदेशांत पसरली व यांच्या संस्कृतीचा कायमचा ठसा उत्तरेकडील लोकांच्या संस्कृतीवर वठलेला आहे. अरब लोकांनीं उंटाच्या सहाय्यानें आफ्रिकेच्या अंतःप्रदेशांत प्रवेश करून सेनिगँबियांत व नायजर नदीच्या मध्यवर्ती प्रदेशांत आपली सत्ता स्थापिली.

तुर्कांनीं १४५३ सालीं कान्स्टांटिनोपल घेतलें व इजिप्तअलजिरिया, ट्यूनिस व ट्रिपोली हे मुलुख आपल्या अमलाखालीं आणिले.

तुर्कांच्या सत्तेस लवकरच उतरती कळा लागून त्यांची पश्चिम यूरोपांतून उचलबांगडी झाली व वेनिस, पीसा व जीनोवा हीं शहरें व्यापारनिमित्तानें प्रसिद्धीस आलीं. त्यांचा व्यापार इजिप्त व उत्तर आफ्रिकेंतील इतर देशांशीं चालत असे.

पंधराव्या शतकांत पोर्तुगीज लोकांची धाडसीपणा व दर्यावर्दीपणाबद्दल यूरोपांत फार प्रसिद्धी होती. यांनीं केप ऑफ गुडहोपवरून हिंदुस्थानांत येण्याचा जलमार्ग शोधून काढिल्यापासून वेनिस वगैरे शहरांचें महत्त्व जवळ जवळ नाहीसें झालें. याच शतकांत पोर्तुगीज लोकांनीं गीनीकोस्ट व कांगो नदीचें मुख शोधून काढिलें व तेथें व्यापाराकरितां ठाणीं करण्यास सुरवात केली. पुढें पोर्तुगीज लोकांस तांबड्या समुद्राच्या कांठचीं मोठीं शहरें शेधाअंतीं सापडलीं. तेव्हां तेथें म्हणजे अबिसिनियांत वसाहती करण्याचा अथवा साधल्यास राज्य स्थापण्याचा त्यांनीं प्रयत्न केला; पण त्यांत त्यांनां यश न येऊन शेवटीं तेथून कायमचा पाय काढावा लागला.

कांहीं राजकीय घालमेली स्पेन देशांत झाल्यामुळें स्पेन व पोर्तुगालाचीं राज्यें एका छत्राखालीं जाऊन पोतुगालची दर्यावर्दी सत्ता कमी झाली व हालंड, फ्रान्स व इंग्लंड या देशांच्या हातीं ती आली.

डच लोकांनीं केपकॉलनी येथें वसाहत केली व सेंट हेलेना हें बेट इंग्रजांनीं त्याच सुमारास घेतलें.

अठराव्या शतकांत यूरोपियन राष्ट्रांत, अमेरिकेंत व पौरस्त्य देशांत वर्चस्व मिळविण्याकरितां आपसांत चढाओढ सुरू झाल्यानें या खंडाकडे त्यांचें दुर्लक्ष्य झालें असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. पण याच सुमारास या खंडांतील लोकांस गुलाम करून विकण्याचा व्यापार अगदीं कळसास पोहोंचला.

पुन्हां आफ्रिकेंतील अज्ञान प्रदेश शोधण्यास आरंभं झाला. व जेम्स ब्रूस व मंगोपार्क या दोन प्रवाशांनीं नाइल नदीचा व नायजर नदीचा प्रवाह कोठें कसा आहे याविषयीं निश्चितपणें माहिती मिळविली. इतक्यांत फ्रान्स देशांत राज्यक्रांति होऊन नेपोलियनशीं युद्ध करण्यांत सर्व राष्ट्रें गढून गेलीं. या युद्धांत इंग्रजांनीं केपकॉलनी डच लोकांपासून घेतली.

नेपोलियन बादशहाचा पराभव केल्यानंतर पुनः आफ्रिकेंतील अज्ञात आग शोधण्यास सुरूवात झाली.

इंग्रज प्रवाशी १८२३ सालीं चाड सरोवराजवळ आले व १८३० च्या सुमारास त्यांनीं नायजर नदीचें मुख शोधून काढिलें व १८४१ सालीं तेथें एक व्यापारनिमित्त वसाहत केली. याच वेळीं फ्रेंचांनीं बर्बर लोकांच्या चांचेपणास आळा घालून अलजिरिया आपल्या ताब्यांत घेतला.

प्रसिद्ध प्रवासी लिव्हिंगस्टन यानें १८०० सालापासूनच मध्य आफ्रिकेंत प्रवास करण्यास आरंभ केला व त्यानें झांबिझी, न्यासा सरोवर व्हिक्टोरिया फॉल्स नांवाचा धबधबा शोधून काढिला. त्यानें सरोवरांच्या मालिकेपैकीं बरींच सरोवरें शोधून प्रसिद्धीस आणलीं. लिव्हिंगस्टन १८७३ त मेल्यावर त्याचें काम स्टॅनलेसाहेबानें आपल्या हातीं घेतलें.

त्याचप्रमाणें सूदन व साहाराच्या भागांत रोल्फस व स्वाईनफर्ट, गस्टाव नाक्टिगल साहेबांनीं (१८६० ते ७५) अनेकदां प्रवास केला. याच सुमारास दक्षिण आफ्रिकेंत कार्ल माउच व सेलस या यूरोपियन लोकांनीं दक्षिणेंतील इतका वेळ ठाऊक नसलेले भाग लोकांच्या नजरेस आणिले.