प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

आफ्रिका
लोक.- आफ्रिकेंतील मूळ रहिवाश्यांच्या जाती व पोटजाती, त्यांचे वसतिस्थान, त्यांचीं प्रयाणें व संस्कृति यांविषयीं विचार करतांनां मुख्य तीन गोष्टी लक्ष्यांत ठेविल्या पाहिजेत. (१) या खंडांत मोठे पर्वत, नद्या वगैरे नैसर्गिक प्रतिबंधांच्या अभावामुळें निरनिराळ्या जातीपोटजातींत दळणवळणास आडकाठी कोणतीहि नव्हती, त्यामुळें यांच्या संस्कृतीतहि विशेष भिन्नपणा उरला नाहीं. त्यामुळें निरनिराळ्या जातींतील फरक स्पष्टपणें नरजेस येण्यासारखे नाहींत. कित्येक वेळीं जेव्हां निरनिराळ्या जातींचे लोक एका ठिकाणीं येतात किंवा एका परिस्थितींत (उदाहरणार्थ एका राजसत्तेखालीं) असतात तेव्हां परस्परांच्या चालीरीतींच्या अनुकरणामुळें पुष्कळसे लोक संक्रमणावस्थेंत आढळतात, (२) पूर्वीं रोमन लोकांच्या अमलाखालीं असलेला भाग सोडून आफ्रिकेंतील मूळ रहिवाश्यांचा इतिहास किंवा तो समजण्याचीं साधनें कांहीं समजणें शक्य नाहीं. तसेंच या लोकांची स्मरणशक्ति अगदीं कोती असते. यामुळें या लोकांचे प्राचीन वसतिस्थान, त्यांचे परिभ्रमणमार्ग, त्यांच्या संस्कृतीचा उगम यांविषयींची माहिती सर्व अनुमानात्मक आहे असें म्हटल्यास फारसें वावगे होणार नाहीं, (३) वरील गोष्टीविषयीं विद्वान लोकांनीं ज्या निरनिराळ्या उपपत्ती बसविल्या आहेत त्याहि पुरेशा साधनांच्या व पुराव्याच्या अभावीं पूर्णपणें विश्वसनीय नाहींत. येथील मूल रहिवाश्यांच्या पांच मुख्य जाती आहेत त्या अशाः बुशमन, नीग्रो, प्राच्य हेमाईट, लीबियन व सेमाईट. यांच्यांत रक्ताची व चालीरीतीचीं भेसळ झाल्यानें किंवा होत असल्यानें संक्रमणावस्थेंत असलेल्या पुष्कळ उपजाती आहेत.

बु श म न.- या जातीचे लोक खुजट. पिंगट वर्णाचे असतात या वर्णात किंचित् पिंवळसर रंगाची झांक असते. हे पारधी असल्यानें नेहमी फिरते असतात. ऐतिहासिक कालापासून हे कालाहारी व साहारा वाळवंटाच्या दक्षिण व पूर्व सरहद्दीवर राहात असत. परंतु टँगानिका सरोवरापर्यंत यांच्या वसतीचे अवशेष आढळतात.

हा टे न टॉ ट.- या लोकांचें वर्गीकरण वरील सदरांत केल्यास कांहीं हरकत दिसत नाहीं. पण यांचे कोणाशीं विशेष साम्य आहे याविषयीं बराच मतभेद आहे. हे गुरेंपाळणारे, किंचित पिवळसर वर्णाचे, मध्यम उंचीचे लोक आहेत. हे बुशमन नीग्रो व हेमाइट लोकांची भेसळ होऊन झाले असावे असें तज्ज्ञांचें मत आहे.

नी ग्रो.- अबिसिनिया व तांबड्या समुद्राच्या कांठचा भाग सोडून साहाराच्या दक्षिण सरहद्दीपासून तों केपपर्यंत सर्व प्रदेश नीग्रो व त्यांच्याशीं लिबियन व सेमाइट लोकांचीं भेसळ होऊन नवीन संक्रणावस्थेंत असलेल्या लोकांनीं व्यापिला आहे असें म्हणण्यास हरकत नाही.

हे मा इं ट से मा इ ट.- आफ्रिकेच्या ईशान्येस व अबिसिनीयांत हेमाइट व सेमाइट या दोन जाति मिसळून तयार झालेले लोक राहतात. अलजीरिया व मोरोक्कोत लिबियन जातीचे लोक असतात. यांचा वर्ण गौर आहे. यांच्यावर अरबी चालीरीतींचा व धर्माचा संस्कार झालेला आहे. अबिसिनियाचा गाला म्हणून जो भाग आहे त्यांत व सोमाली मुलुखांत हेमाइट जात राहते.

नीग्रो व यांच्याशीं दुस-या रक्ताची भेसळ होऊन तयार झालेल्या जाती यांचीच आफ्रिकेंत सर्वांत जास्त लोकसंख्या आहे. या लोकांचें त्यांच्या भाषेवरून दोन भाग केले आहेत. अस्सल नीग्रोंत भाषेचा फारच घोंटाळा आहे. बंटु ही जी यांची पोटजात आहे तींतच काय ते सर्व लोक एक किंवा दोन ठरींव भाषा बोलतात.

याशिवाय अगदीं दाट अरण्यांत पारध करून उपजीविका करणा-या फार खुज्या लोकांची एक निराळी जात आहे, त्यांची फारशी माहिती सध्यां उपलब्ध नाहीं.