प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
आफ्रिकेची यूरोपियन राष्ट्रांत विभागणी - या विभागणीस १९ साव्या शतकाच्या अखेरीस सुरूवात झाली. कांगो व तिला मिळणा-या दुस-या नद्यांचा शोध करण्याचें काम शेवटास गेलें व यापुढें अज्ञान प्रदेश शोधण्याची यूरोपियन राष्ट्रांची जिज्ञासा पूर्ण होत आली आणि या खंडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. व्यापारनिमित्तानें अथवा आफ्रिकेंतल्या रानटी लोकांस सुसंस्कृत करण्याच्या मिषानें प्रत्येक पाश्चात्य राष्ट्रांनीं आफ्रिकेंत वसाहत करून साम्राज्यविस्तार करण्यास आरंभ केला. १८७५ च्या सुमारास इंग्लंड, फ्रान्स व पोर्तुगाल या तीन यूरोपियन राष्ट्रांचे हितसंबंध या खंडांत जडले होते. जर्मनीनें लवकरच चंचुप्रवेश केला व त्याचें अनुकरण इतर राष्ट्रांनीं केलें.
त्यावेळची आफ्रिकेची राजकीय स्थिति लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. इजिप्त, इजिप्तमध्यें समावेश होत असलेला सूदनचा भाग, ट्युनिसीया व ट्रिपोली ह्यांवर तुर्कस्तानच्या सुलतानाची सत्ता होती. मोरोक्को, अबिसिनिया व झांजीबार हीं स्वतंत्र राज्यें होतीं. यांशिवाय सहाराचा वालुकामय प्रदेश वगळला तर जवळ जवळ अर्धा आफ्रिकेचा प्रदेश निरनिराळ्या जातींनीं व्यापिला होता. त्यांपैकीं पश्चिमेस डाहोमे, अशांटी व बेनिन हीं स्वतंत्र नीग्रो लोकांचीं संस्थानें होतीं. यांखेरीज मध्य सूदनमध्यें मुसुलमानांचें एक राज्य होतें व व्हिक्टोरिया नायंझा सरोवराचे वायव्येस युगांडा वगैरे बारीक सारीक स्वतंत्र संस्थानें नीग्रो लोकांचीं होती. इतर ठिकाणीं निरनिराळ्या जातींच्या टोळ्या होत्या. त्यांच्यांत अगदीं भिन्न राज्यपद्धती होत्या. आफ्रिकेच्या मूळ रहिवाशांच्या राज्यांत एकोपा कधींच नव्हता व त्यांच्यामध्यें राज्यविस्तार करण्याची किंवा तें प्रबल करण्याची महत्वाकांक्षाहि नव्हती.
१८७० सालीं फ्रान्स व जर्मनी यांचें मोठें युद्ध होऊन जर्मनी पूर्णपणें यशस्वी झाला. या जयानें जर्मनीची इभ्रत यूरोपियन राष्ट्रांत वाढली व याच वेळेस बिस्मार्क हा जर्मनींत मुख्य मंत्री होता त्याला जर्मनीचें वसाहतीचें साम्राज्य वाढविण्याची फार उत्कट इच्छा होती. अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांनीं इतःपर परक्या राष्ट्रांचें उत्तर अथवा दक्षिण अमेरिकेंत बोट न शिरकूं देण्याचा आपला निश्चय जगजाहीर केला. यामुळें आफ्रिकेशिवाय मोकळा देश दुसरा कोणताहि राहिला नाहीं.
मोझांबिकपासून अँगोलापर्यंत एक पूर्वपश्चिम पट्टा दक्षिण आफ्रिकेंत आपल्या ताब्यांत घेण्याची मनीषा पोर्तुगालची होती. इंग्लंडची उडी तर फारच मोठी होती. इजिप्तपासून तों केपकॉलनीपर्यंत अविच्छिन्न प्रदेश आपल्या अमलाखालीं आणण्याकरितां इंग्लंडनें अटोकाट प्रयत्न केले. वसाहतीच्या साम्राज्याची कल्पना फार उशीरानें जर्मन लोकांच्या लक्षांत आली. तेव्हां शक्य त्या रीतीनें सांपडेल तेवढा मुलुख ताब्यांत घेण्याची हांव जर्मनीस सुटली. मादागास्कर बेटांत व पूर्व, पश्चिम व मध्य आफ्रिकेंत एक मोठें साम्राज्य स्थापन करण्याकरितां फ्रेंचांनीं जारीनें प्रयत्न सुरू केले. इतालीचें लक्ष सारखें ट्रिपोली व त्याच्या सभोंवतालचा मुलुख बळकावण्याकडे लागलें होतें.
व्यापार करण्याच्या व ख्रिस्तीसंप्रदायप्रसार करण्याच्या निमित्तानें व प्रदेश शोधण्याच्या भिषानें, पाश्चात्त्य राष्ट्रांनीं आपले लोक आफ्रिकेंत पाठविलें. त्यांनीं आपलीं ठाणीं ते उतरेलेच्या भागांत व तेथून दूरवरच्या मुलुखांत वसविलीं व तो प्रदेश आपल्या अंमलाखालीं आणिला. जेव्हां ही युक्ति लागू पडत नसे तेव्हां तेथील रानटी लोकांशीं तह करून मातीमोल किमतीस मुलुख विकत घेत किंवा सक्ती करून विकत देण्यास भाग पाडीत. निरनिराळ्या राष्ट्रांत जेव्हां सरहद्दीबद्दल किंवा मुलुखाबद्दल भांडण लागे, तेव्हा जो भाग ज्याच्या पूर्ण ताब्यांत तेवढा त्या राष्ट्राचा समजला जात असे. या तत्त्वास इंग्रजींत ''प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह ऑक्युपेशन'' असें नांव पडलें आहे. कित्येक प्रसंगीं आपसांत तडजोड होऊन एकमेकांत तह होऊन भांडण मिटत असे.
बेलजीयन लोकांनीं कांगोचा प्रदेश कसा घेतला व जर्मन लोकांनीं पूर्व आफ्रिकेंत आपली वसाहत कशी केली या दोन गोष्टी फार मनोरंजक आहे व त्यांवरून आफ्रिकेंतील मुलुख मिळण्यास कोणते प्रयत्न केले असतील याची कल्पना करतां येईल म्हणून त्या खालीं दिल्या आहेत.
बेलजमचा राजा लिओपोल्ड यानें स्टॅनले साहेबास बेलजीयन लोकांच्या पुढें गेलेल्या टोळीस मदत करण्याकरितां पाठविलें आहे असें जाहीर केलें. हा साहेब ''कांगो मंडळाचा'' प्रतिनिधी होता. याचा जाण्याचा खरा उद्देश, कांगोच्या प्रदेशांत ठाणीं बसवून तो आपल्या मंडळाच्या ताब्यांत घ्यावयाचा असा होता. या मंडळाचे सभासद निरनिराळ्या प्रांतातील मोठे लोक होते. हळू हळू या सभेचे सभासद सर्व बेलजियन झाले व पुढें हा सर्व देश लिओपोल्ड बादशहानें आपल्या हयातींत आपल्या राज्यास जोडिला.
तसेंच पूर्व आफ्रिकेचा (सध्यां जर्मनीच्या ताब्यांतून इंग्लंडला मिळालेला) प्रदेश दुस-याच्या अमलांत जावयाचा आहे असें जर्मनीस आढळून येतांच तीन मोठ्या जर्मन पुरूषांनीं अगदीं हलक्या प्रतीच्या कारागिरांचीं सोंगें घेऊन झांजीबारच्या मुलुखांतून तेथें प्रवेश केला व आपल्या जवळचीं निशाणें दूरवर लावून जर्मन सत्ता स्थापन केल्याचें जाहीर केलें. त्यांनीं तेथील राजाशीं तह करून तो मुलुख जर्मनीच्या ताब्यांत गेल्याबद्दल कागदपत्र करून घेतले. पुढें कांहीं दिवस गेल्यानंतर जर्मन सरकारनेंहि तशाच आशयाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
या खंडांतील मुलुखांच्या सरहद्दी ठरविण्याकरितां पाश्चात्य राष्ट्रांनीं जे आपआपसांत तह केले त्यांपैकीं खालील सहा मुख्य आहेत ते येणेंप्रमाणें.
(१) १८९० सालीं जुलै महिन्यांत ग्रेटब्रिटन व जर्मनी यांच्यामध्यें तह झाला. त्या तहान्वयें जर्मनी व ग्रेटब्रिटन या दोन राष्ट्रांचें सत्ताक्षेत्र अथवा कमाल मर्यादा (स्फिअर्स ऑफ इन्फ्ल्युअन्स) ठरल्या. जर्मनीनें झांजीबार हा एक ब्रिटिश साम्राज्याचा संरक्षित भाग असें कबूल केलें व त्या ऐवजीं इंग्लंडनें हेलीगोलंड हे बेट जर्मनीस दिलें.
(२) दुसरा अशाच प्रकारचा तह याच वर्षी ब्रिटिश व फ्रेंच या दोन राष्ट्रांत झाला. या तहाच्या योगानें फ्रेंचांची मादागास्कर बेटावरील सार्वभौम सत्ता व सहारांतील प्रदेश हें सत्ताक्षेत्र ठरून या दोन राष्ट्रांचा तंटा मिटला.
(३) १८९१ मध्यें पोर्तुगाल व इंग्लंड यांनीं आपआपल्या कमाल मर्यादा अथवा सत्ताक्षेत्र पूर्वेकडील व पश्चिमेकडील निश्चितपणें ठरविलें.
(४) १८९४ त सूदनमधील एकमेकांचें सत्ताक्षेत्र फ्रेंच व इंग्लिश राष्ट्रांत निश्चित झालें.
(५) १८९१ त पूर्व आफ्रिकेंतील इतालियन व ब्रिटिश वसाहतींच्या मर्यादांचा कच्चा तक्ता तयार झाला.
(६) १८९८ सालीं ''चाड'' सरोवराच्या लगतच्या प्रदेशांत कोणाची सत्ता कोठपर्यंत आणावी हें कायमचें पक्कें झालें.
पहाणी व मोजणी.- यूरोपियन राष्ट्रांनीं आफ्रिकेंतील देश आपसांत वांटून घेतल्यावर प्रत्येक राष्ट्रानें आपल्या ताब्यांतील प्रदेशाची मोजणी केली. या मोजणीचें काम बरीच वर्षें चाललें होतें. डीअनव्हील या साहेबानें या खंडाचा नकाशा अज्ञात प्रदेशाची जागा रिकामी ठेवून तयार केला. या नकाशांतील कोरी जागा भरण्याचें काम कित्येक लोकांनीं हातीं घेतलें
कांगो नदीच्या पाणवट्याचा प्रदेश, त्या नदीला मिळणा-या नद्या, त्यांचे उगम व तेथील अरण्यें यांची नक्की माहिती जर्मन व पोर्तुगीज प्रवाशांनीं अनेकदां प्रवास करून मिळविली. त्याच प्रमाणें पूर्व आफ्रिकेंतलें काम ब्रिटिश आफ्रिकन संशोधक मंडाळाच्या वतीनें जोसेफ टॉमसन यानें आपल्या आंगावर घेतलें. या भागांत आस्ट्रियन प्रवाशी, काउट टेलेकी व लुडविग व्हान होहनेल या दोन गृहस्थांनीं अबिसिनीयांत दूरवर जाऊन रुडोल्फ सरोवर शोधिलें. १८८३ सालीं जेम्स बंधूंनीं प्रवास करून लोकांच्या या भागाविषयींच्या ज्ञानांत भर टाकली. एडनच्या आखातापासून तो हिंदीमहासागराच्या किना-यापर्यंत पूर्व पश्चिम भाग डोनल्डसन स्मिथ या अमेरिकन पुरूषानें प्रथमच पादाक्रांत केला.
उत्तरेकडील प्रदेशाची माहिती फ्रेंच प्रवासी फोकोल्ड यानें वेशांतर करून काढली. व्हिक्टोरिया नायंझाचे वायव्येस स्टॅनले साहेबांनीं केलेला प्रवास फार प्रसिद्ध आहे. कर्नल मानटील हा फ्रेंच गृहस्थ साहाराचे वाळवंट चाड सरोवराचे दिशनें ओलांडून ट्रिपोलीस येऊन पोहोंचला.
१८९१ सालीं डॉक्टर स्टुलमन हा एमिन पाशान बरोबर घेऊन नाईल नदीच्या पश्चिमेस असलेल्या सरोवराकडे गेला व तेथून पुढें ते दोघे आलबर्ट एडवर्ड सरोवराचे कांठीं उतरले. सरोवराच्या भागांत गेलेल्या प्रवाशांपैकीं डा. बौमन व काउंट गाटझेन यांनीं लावलेले शोध फार महत्वाचे आहेत. १८९९ सालीं मॅककिंडर हा केनया पर्वताच्या शिखरावर गेला. दक्षिणोत्तर दिशेनें एका टोंकापासून तों दुस-या टोंकापर्यंत प्रथम प्रवास ग्रोगन साहेबानें केला.
निरनिराळ्या राष्ट्रांच्या ताब्यांत असलेल्या मुलुखांची सरहद्द ठरविण्याकरितां प्रत्येक राष्ट्राचे प्रतिनिधि घेऊन तयार केलेल्या मंडळानें मोजणीचें व मापनाचें काम फार चोख केलें.
पुराणवस्तुसंशोधनार्थ टामस या व जेम्स ब्रूस यांनीं प्रवास करून बारबरीमधील अवशेष तपासून पाहिले. त्याच प्रमाणें दक्षिणअफ्रिकेंत -होडेशिआंत जुन्या काळच्या इमारती व त्यांचे अवशेष यांवर रॉनडाल माकीवर यानें पुष्कळ श्रम करून ते कोणत्या काळाचें असावेत यासंबंधाची निश्चित माहिती काढिली.
आफ्रिकेचा बरोबर नकाशा तयार करण्याकरतां रुवेनझोरी पर्वतावर त्याच्या सभोंतालच्या प्रदेशांत सर जानस्टन व अब्रूझीचा ड्यूक हे गृहस्थ बरीच मंडळी घेऊन गेले व त्यांनी घेतलेलें काम चांगल्या त-हेनें पार पाडिलें.
व्यापार.- आफ्रिकेंत वसाहती करून ती आपसांत वांटून घेण्याची जी घाई यूरोपियन राष्ट्रांनीं केली, तिचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे पाश्चात्त्य राष्ट्रांनां व्यापारविस्ताकरितां एक क्षेत्र पाहिजे होतें. पण कांहीं विशिष्ट कारणामुळें व्यापार मात्र वाढूं शकला नाही. प्राचीन काळीं गुलामांचा मोठा व्यापार चालत होता व त्याबरोबर थोडें बहुत सोनें व हस्तीदंत हेहि व्यापाराचे जिन्नस होते. आशियांत व यूरोपांत ज्या मोठमोठ्या चळवळी झाल्या व ज्यांच्या योगानें मानवी इतिहासांत मोठी विचारक्रांति घडून आली त्यांचा स्पर्शहि येथील लोकांस झाला नाहीं. याचीं कारणें ४ आहे. (१) दळणवळणाच्या साधनांचा अभाव, (२) किना-यालगतच्या प्रदेशाची रोगट हवा (३) येथल्या रहिवाशांमध्यें अर्थोत्पादन करण्याविषयींची उदासीनता, (४) गुलामांच्या व्यापारामुळें ख-या व्यापाराकडे झालेलें दुर्लक्ष. यांतील तिसरें कारण सोडून बाकीची सहजगत्या दूर करतां येण्यासारखीं आहेत. तिसरें मात्र येथील रहिवाश्यांच्या उत्कट इच्छेशिवाय नाहींसें होणें शक्य नाहीं.
गुलामांचा व्यापार अजिबात बंद करण्यासाठीं इंग्रज सरकारनें पुढाकार घेऊन ब्रूसेल्स शहरीं सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींची सभा भरवून हा व्यापार बंद करण्याचा ठराव १८९० सालीं पसार झाला; व त्याची अंमलबजावणी हळू हळू होत जाऊन सरते शेवटीं हा घातुक व्यापार अगदीं बंद झाला.
या खंडांत व्यापारोपयोगी चार प्रकारचे निर्यात जिन्नस आहेत, (१) वनस्पतिजन्य, (२) प्राणिजन्य, (३) मनुष्यांच्या परिश्रमानें तयार झालेले पदार्थ, (४) खनिज.
पहिल्या सदर खालीं फार महत्वाचे पदार्थ येतात. (१) रबर-याची झाडें येथें फार आहेत व त्याची लागवड सुरू आहे, (२) तालवृक्षापासून काढलेलें तेल, (३) इमारतीचें लांकूड, (४) गोंद, कोलानट.
दुस-या सदरांत (१) हस्तीदंत (कांगो) (२) मेण (३) कातडी (४) लोंकर, पक्ष्यांचीं पिसें हे जिन्नस येतात.
तिस-या सदरांत नारळ त्याच्या झाडापासून तयार केलेले पदार्थ (झांजीबार), काफी, कापूस (इजिप्त), साखर (मारिशस), तंबाखू (अलजिरिया) हे पदार्थ येतात.
व चवथ्या सदरांत सोनें (दक्षिण आफ्रिका), हिरे (किंबरले द.आफ्रिका), दगडी कोळसा (द. आफ्रिका नाताळ), पास्फेटस (अलजिरिया) हे जिन्नस मोडतात.
कापड, कृत्रिम खाद्यपदार्थ व दुसरे ऐषआरामाचे पदार्थ हे जिन्नस बाहेरून येतात.
आफ्रिकेंत पूर्वीं नद्यांचा उपयोग दळणवळणाचें कमीं होत नसे. कारण त्यांत धबधबे फार आहेत. सध्यां प्रयत्नानें त्यांचा व्यापारनिमित्त उपयोग होत आहे. पाऊल वाटेनें डोक्यावरून शेंकडो मैल सामानाची ने आण करीत असत. उंटांचे तांडे मालाची ने आण करण्याकरतां लावीत असत. पूर्वींच्या वाटा मोठमोठ्या शहरांवरून जात असत. पण विषुववृत्ताजवळच्या दाट अरण्यांतून मात्र एकहि वाट नव्हती. वालुकामय प्रदेशांतून प्रवासासाठीं उंटासारखें दुसरें कोणतेंही जनावर नाहीं. नाईल नदींतून माल खालीवर पूर्वीं लहान लहान पडावांतून भरून जात येत असे.
यूरोपियन राष्ट्रांच्या वसाहती झाल्यापासून तारायंत्रें, आगगाड्या व आगबोटीं यांचा सुळसुळाट झाला आहे. या अर्वाचीन साधनांनीं आफ्रिकेंतील प्रवास बराच सुगम होत आहे. पण एकंदर खंडाच्या विस्ताराच्या मानानें पाहिलें असतां अजून कांहींच नाहीं असें म्हणण्यास हरकत दिसत नाहीं. इजिप्त देशांत १८५५ पासून आगगाडी सुरू आहे.