प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
इंकांच्या पूर्वीचा धर्म - या 'अखंड पाषाणस्तंभी' लोकांचा धर्म कशा प्रकारचा होता हें समजण्याला फक्त एक मार्ग आहे. तो म्हणजे एका अखंड दगडाचा तयार केलेला सर्वश्रुत दरवाजा होय. या दरवाजावर मध्यभागीं एक प्रतिमा असून तिच्याभोवतीं बरींच धार्मिक चिन्हें व आकृती आहेत. मध्यप्रतिमेच्या डोक्याभोंवतीं किरणें पसरलीं असून तिच्या प्रत्येक हातांत एक प्रकारचा टोकाला पक्ष्यांचीं चित्रें असलेला राजदंड आहे. तिच्या पोषाखावर इंकाच्या काळीं सूर्याच्या सुवर्ण प्रतिमेभोंवतीं जशीं महिन्यांचीं चिन्हें असत तशीं चिन्हें आहेत. ही वर वर्णिलेली मध्यप्रतिमा सर्व लोकाधिपतींकडून पूजिली जाणारी देवता असली पाहिजे. पण या अखंडपाषाणस्तंभीं साम्राज्याचा नाश होऊन इंकांचें साम्राज्य उदयास येईपर्यंत ब-याच शतकांइतका काळ लोटला असला पाहिजे. जेव्हां या प्राचीन साम्राज्याचे तुकडे तुकडे झाले तेव्हां अँडियन प्रदेशांत अनेक टोळ्या येऊन राहिल्या व पूर्वींच्या जागीं अनेक पोटभाषा आल्या. स्पॅनियर्ड लोक येण्यापूर्वीं सुमारें पांच शतकें इकांनीं आपलें साम्राज्य स्थापण्याला सुरुवात केली. त्यांची भाषा त्या प्रदेशांत वरचढ होऊन राहिली.