प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

कोलंबस व वास्को डी गामा यांच्या भौगोलिक शोधांचा जगाच्या भवितव्यावर झालेला परिणाम म्हटला म्हणजे जगाचें यूरोपीभवन हा होय. हें यूरोपीभवन जगांत कमी अधिक प्रमाणानें चोहोंकडे झालें. रशीयासारख्या देशाचें स्वामित्व सैबिरियामध्यें पसरलें आणि पूर्वेकडील राष्ट्रांस आणि जातींस रशियनपणा बराचसा आला. जपाननें यूरोपीयांचीं शास्त्रें व अर्वाचीन व्यापाराच्या दळणवळणाच्या व उत्पादनाच्या पद्धती घेऊन आपल्या राष्ट्राचा अधिक विकास करून घेतला. चीननें यूरोपीय संस्कृति भीत भींत उचलली तरी कांहीं बाबतींत अर्वाचीनपणा अधिक दाखविला आहे. चीनवर परकीयांचे जे आघात झाले त्यापासून चीन बचावून त्यानें अधिक सुसंस्कृतता प्राप्त करून घेतली हें खास. हिंदुस्थानावर यूरोपीय सत्ता स्थापन झाली आणि इतर एशिया यूरोपीयांच्या धाकांत आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. एशियामध्यें यूरोपीयांनीं आपल्या वसाहती सैबिरिया खेरीज इतरत्र स्थापिल्या नाहींत. आफ्रिका, अमेरिका व ओशिआनिया येथें यूरोपीय रक्ताच्या लोकांच्या वसाहती स्थापन झाल्या आहेत आणि अमेरिकेंतील देश्य जनतेची प्राचीन संस्कृति पुसटूंन टाकली जाऊन त्यांच्यांत यूरोपीय संस्कृति स्थानापन्न होण्याचीं लक्षणें दिसत आहेत.

जगांत जें यूरोपाचें वर्चस्व झालें त्याचे प्रकार येणें प्रमाणे सांगतां येतील.

  (१) कांहीं प्रदेश देश्य जनतेचा जवळ जवळ नायनाट होऊन यूरोपीय लोकांकडून बसविले गेले.
  (२) कांहीं प्रदेशांत यूरोपीय जातीचे लोक मोठ्या संख्येनें वसती करते झाले आणि देश्य लोक जरी वसती करीत असले किंबहुना त्यांची वसती जरी मोठी असली तरी त्यांची संस्कृति वन्यच राहिली.
  (३) कांहीं प्रदेशांत यूरोपीय रक्ताच्या लोकांनीं जिंकून आपली संस्कृति तेथें प्रस्थापित केली आणि देश्यांस किंवा तेथील इतर लोकांस त्या संस्कृतीचे आश्रयी किंवा शूद्रवर्ग बनविलें.
  (४) कांहीं प्रदेश यूरोपीयांनीं जिंकले पण देश्यांस आपल्या संस्कृतीचे अंशभाक् बनविलें नाहीं. तर त्यांनां आपले उपासना, संप्रदाय, भाषा वगैरे राखूं दिले पण त्यांचा विकास मात्र बंद पाडून त्यांचा राष्ट्रीय जीवितक्रम दुर्गतीस नेला.
  (५) ज्या कांहीं प्रदेशांचें विशिष्टत्व आणि स्वातंत्र्य राहिलें तेथें यूरोपीय शास्त्रीय ज्ञानाचा आणि रीतिरिवाजाचा प्रसार केला.
  (६) कांहीं प्रदेशांतील लोकांनां यूरोपीय लोकांनीं जिंकलें पण त्यांच्याशीं लग्नव्यवहार करून त्यांस आत्मसात् केलें.

  या नियमाखालीं सर्व जगाचा अर्वाचीन इतिहास आणतां येईल असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. यूरोपीय वर्चस्वाचा जपानवर, हिंदुस्थानवर, चीनवर, तुर्कस्तानावर, निग्रोंवर, मावरीलोकांवर व अमेरिकन इंडियन लोकांपैकीं पेरु व मेक्सिको येथील लोकांवर आणि संयुक्तसंस्थानांतील देश्यांवर परिणाम झाला, पण निरनिराळ्या प्रकारें झाला. तो कोठें व कसा काय हें पाहूं.

जे प्रदेश यूरोपीयांनीं वसविले आणि ज्यांतील देश्यांचा जवळ जवळ नायनाट केला अशांमध्यें आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, टॅस्मेनिया, संयुक्तसंस्थानें, कानडा वगैरे प्रदेश येतात. संयुक्तसंस्थानें आणि कानडा येथील लोकांचा नायनाट यूरोपीयांनीं केला किंवा नाहीं याविषयीं मतभेद आहे. कित्येक असें म्हणतात कीं संयुक्तसंस्थानांत जरी अनेक इंडियन लोकांचीं राष्ट्रें होतीं तरी त्यांची संख्या फारशी नसावी, कां कीं, ज्या लोकांची संस्कृति केवळ व्याधकर्मजीवि आहे व जींत कृषिकर्म फारसें वृद्धिंगत झालें नाहीं त्या संस्कृतींतील लोकांची संख्या फारशी नसते व कांहीं ग्रंथकार असेंहि म्हणण्यास धजतात कीं, ज्या काळीं यूरोपीयांनीं संयुक्तसंस्थानांत वसाहत केली त्या काळाच्या त्या जातींच्या लोकवस्तीपेक्षां आज त्या जातींची लोकवस्ती कमी नाहीं. यूरोपीयांच्या आगमनानंतर सामोआ, टाहिटी, वगैरे अनेक बेटांतील मूळ लोक नष्ट झाले, ते नवागतांशीं पशूंप्रमाणें शिकार करून मारले असें नाहीं. ज्या जाती अत्यंत कनिष्ठ दर्जाच्या संस्कृतीच्या असतात. त्यांचा गो-या लोकांशीं प्रसंग आला म्हणजे त्या कनिष्ठ जातींचा संहार खालील कारणामुळें होती. (१) यूरोपीयन लोकांकडून त्या लोकांस सहारक शस्त्रास्त्रें मिळत आणि त्यामुळें त्या लोकांतील आपापसांतील लढाया अधिक संहारक होत, (२) यूरोपीयन लोक किना-याजवळील जमीन घेत आणि त्यांस आंत किंवा दरीखो-यांत घालवीत; त्या क्रियेंत त्यांचा संहार यूरोपीयाकडून होई व त्यांचा यूरोपीयांकडून पराभव झाल्यामुळें दुस-या आंतील लोकांशीं त्यांनां लढावें लागे त्यामुळें आणखी संहार होई. (३) यूरोपीयांनीं देश्यांस कोप-यांत घालविलें आणि त्यांची जमीन घेतली म्हणजे त्यांचें निर्वाहाचें साधन कमी होई आणि शिवाय त्यांच्यांत रोगराई वाढे व त्यामुळें त्यांची संख्या कमी होई, (४) यूरोपीयांकडून त्यांच्यामध्यें उपदंशप्रमेहादि नवीन रोगांचा प्रसार होई आणि त्या रोगापासून आपला बचाव करून घेण्यास त्यांस साधन नसे.

यूरोपीयांचें आगमन चोहोंकडे केवळ देश्यसंहारक झालें असें नाहीं. कांहीं ठिकाणीं देश्यांस नवीन धंदे व रोगांपासून नवीन संरक्षण यूरोपीयांच्या सत्तेपासून मिळालें. जेथें देश्यांची वस्ती मोठी होती पण ती विशेष कमी झाली नाहीं आणि यूरोपीयांची वस्ती मात्र बरीच झाली असा प्रदेश म्हटला म्हणजे आफ्रिका होय. सर्व आफ्रिका आज यूरोपीयांच्या ताब्यांत आली आहे आणि जी देश संस्थानें तेथें आहेत तीं यूरोपीयांच्या संरक्षणाखालीं आहेत. जेथें देश्यांचा वर्ग बराच मोठा व यूरोपीयांचाहि वर्ग बराच मोठा अशी स्थिति असते, तेथें देश्यांस शूद्रत्व पत्करावें लागतें व हळू हळू त्यांच्या संस्कृतीचे आश्रयी व्हावें लागतें. अशा प्रसंगीं देश्यांची संख्या उलट यूरोपीयांनीं नवीन उत्पन्न केलेल्या उद्योगामुळें आणि शेतकीच्या उत्तेजनामुळें वाढते हिंदुस्थान व आफ्रिका यांची स्थिति कांहीं अंशीं एकच आहे.

जेथें देश्यांनीं आपलें स्वातंत्र्य कायम ठेवलें आहे अशीं राष्ट्रें म्हटलीं म्हणजे इराण, तुर्कस्तान, चीन व जपान हीं होत. ज्या राष्ट्रांनीं यूरोपीय सुधारणा घेतली त्या राष्ट्रांनीं आपली उन्नति करून घेतली व त्यांनीं यूरोपीय सुधारणा ज्या मानानें घेतली त्या मानानें आपले जगांत महत्त्व प्रस्थापित केलें.

जेथें देश्यांशीं लग्नव्यवहार करून त्यांस आपल्या समाजाशीं एकरूप करण्याचा प्रयत्न केला गेला असे प्रदेश म्हटले म्हणजे स्पानिश व पोर्तुगीज लोकांनीं व रशियन लोकांनीं व्यापलेले होत. फ्रेंच, पोर्तुगीज व स्पानिश लोकांनां काळ्या लोकांशीं लग्नव्यवहार करण्यांत कमीपणा वाटत नसे. फ्रेंच कनेडियन लोकांत तेथील अमेरिकनइंडियन लोकांशीं लग्नव्यवहार बराच वाढला. स्पेन व पोर्तुगाल यांनीं रोमन क्याथोलिक संप्रदायाचा सत्तेखालीं आणलेल्या प्रदेशांत प्रसार केला आणि तेथील लोकांशी लग्नव्यवहारहि केला. फिलिपाईन्समध्यें बहुतेक लोक ख्रिस्ती झाले आणि त्यांतील उच्च वर्गानें स्पानिश लोकांशीं लग्नें वगैरे केलीं. आज त्यांच्यांत संस्कृति व शिक्षण हिंदुस्थानाच्या पेक्षां किती तरी पटीने अधिक आहे एवढेंच नव्हे तर त्यांच्यांत उच्च त-हेचा आयुष्यक्रम संवर्धित झाला आहे. आणि आज फिलिपिनोंचा दर्जा जगाचे उपयुक्त नागरिक या दृष्टीनें हिंदुस्थानी लोकांच्यावर कोणीहि लावील.

एशियांतील राष्ट्रें, आफ्रिका व अमेरिका हीं सर्व यूरोपीय संस्कृतीनें, भिन्न प्रमाणानें व पद्धतीनीं संस्कारिलीं गेलीं. ऐशियांतील सैबीरियांतील लोकांखेरीज इतर राष्ट्रांची हकीगत जगाच्या इतिहाससूत्राचें कथन करतांना देण्यांत आलीच आहे. आतां आफ्रिका, अमेरिका व हिंदी महासागरांतील द्वीपें व सैबेरिया येथील यूरोपीयस्पर्शापूर्वींची व त्यांच्या यूरोपीभवनाची हकीगत देण्याकडे लक्ष देऊं.