प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

पुराणवस्तुसंशोधन.- शास्त्रज्ञांनीं येथील पुराणवस्तूंचे संशोधन करून मुख्य दोन मुद्यांचा उहापोह केलेला दिसतो. (१) इंडियन लोकांनीं तयार केलेल्या वस्तूंचा विचार, (२) भूस्तर शास्त्रांत ठरविलेल्या युगांत मनुष्याच्या अस्त्त्विविषयीं विचार. १५ व्या शतकांत या रहिवाशांविषयीं ज्या इतिहासकारांनीं माहिती दिली आहे, त्यांनीं इंडियन लोकांनीं केलेल्या वस्तूंचें वर्णन केलें आहे. त्यासारख्या वस्तू संशोधकांनीं उकरून काढिलेल्या जमिनीच्या थरांत आढळतात.

शास्त्रज्ञांनीं गुहा, उध्वस्त खेडीं, शिंपांचें ढीग, उकिरड्यावरील ढीग, कुंपणें, झोपड्यांच्या सीमा, मातीच्या भींती व राशी, दगडांच्या खाणी, बागांचे अवशेष, थढगीं व राहण्यासाठीं केलेल्या आश्रयाच्या जागा (गुहा, टेकड्या सुळके,) वगैरे पदार्थांवरून माहिती मिळविली आहे. आर्तिक महासागराच्या भागांत प्राचीन खेड्यांचे अवशेष सांपडतांत, त्यावरून असें दिसतें कीं, एस्किमो लोक एका काळीं अतलांतिक महासागराचे किना-यावर राहात होते. वर सांगितलेल्या पुराणवस्तू अमेरिकेच्या [उत्तर व दक्षिण] निरनिराळ्या भागांत आढळतात. एलडोरेडो, मेक्सिको, व पेरु या देशांत प्राचीन भव्य इमारतींचे अवशेष दृष्टीस पडतात. दुस-या ठिकाणीं (उदा. पेरू व इक्वाडोरे) घरांचे झोपड्यांचे व तटबंदीचे प्राचीन भाग नजरेस पडतात.

नातेंगोतें.- कांहीं अपवादादाखल उदाहरणें सोडून या लोकांत नात्याचे संबंध स्त्रियांमार्फत ओळखीत असत. हीं नातीं खरीं व कृत्रिम अशीं दोन प्रकारचीं असत. बायकांनां लढाईंतील कैदी दत्तक घेतां येत असे वत्या सर्वांनां मुलें समजण्याची चाल त्यांच्यांत होती. जेव्हां दोन जातीमध्यें जूट होत असे, तेव्हां त्या दोघांत वडील व लहान भाऊ (अथवा बाप व मुलगा) पणाचें कृत्रिम नातें लावीत इंडियन लोकांच्या परस्परांच्या सहाय्यानें होणा-या व्यवहारांत नात्याचें फार स्तोम माजले होतें म्हणून ह्या सामाजिक संस्थेच्या छटा त्यांच्या कायद्यांत, कलांत व दुस-या इत कृतींत स्पष्टपणें दृष्टीस पडत असत.

युद्धकला.- इंडियन लोकांत युद्धकलेची फार वाढ झाली नव्हती, कारण (शास्त्रज्ञांच्या मतें) हे लोक शांतताप्रिय होते. परस्परांशीं दळणवळण ठेवणें, आदरातिथ्य करणें व मेजवान्या देणें हीं त्यांस फार आवडत असत. सैन्याची रचना समाजघटनेवर अवलंबून होती. सैन्य उभरतांना कांहीं नियमित लोक प्रत्येक टोळीकडून घेतले जात असावेत. सैन्याची संख्या, त्यांमधील जूट व तें सशस्त्र ठेवण्यांचा काल हीं सर्व त्यांच्यांतील समाजसंस्थांच्या स्थितीवर अवलंबून होतीं. धनुष्य बाण, गोफण यांशिवाय हे लोक फेकण्याचीं, भोंसकण्याचीं वगैरे आयुधें वापरीत असत. बायकांनां पकडून त्यांनां टोळ्यांतील माणसांप्रमाणें वागवीत. यूरोपांत गुलाम याचा जो अर्थ रूढा आहे. त्या प्रकारचे गुलाम या लोकांत नव्हते.

लौकिक अथ्वा बालसारस्वत.- इंडियन लोकांनां आकाशांतील ज्योती व त्यांच्या स्थूलगती, हवामान, पाऊस, वारे, ॠतु वगैरेंचें चांगलें ज्ञान होतें. तसेंच त्यांनां लागणारे पदार्थ (उदाहरणार्थ पाणी, माती, दगड, रंगाच्या व खाण्याच्या वनस्पती, विषारी वनस्पती, त्यांचे गुणधर्म, निरनिराळे उपयुक्त क्षार, वेगवेगळ्या प्रकारचीं झाडें, त्यांचे उपयोग इत्यादि.) कोठें चांगले सांपडतात हेंहि त्यांस ठाऊक असे. प्राणी, त्यांचा जीवनक्रम, त्यांचे खाण्याचे पदार्थ, त्यांचा उपयोग ह्यांची माहिती त्यांस होती. असल्या उपयुक्त ज्ञानांतून व त्याच्यांत असलेल्या धार्मिक समजुतीमुळें (उदाहरणार्थ सृष्टींतील सर्व व्यापार विशिष्ट व्यक्तीच्या सामर्थ्यानें घडून येतात या श्रद्धेमुळें) या लोकांत एक अफाट बालसारस्वत निर्माण झालें आहे.

परमार्थसाधन.- या लोकांचा भुतेंखेतें, पिशाच्च, व छाया इत्यादि अदृश्य सृष्टीवर विश्वास होता. त्यांच्यामध्यें निरनिराळ्या जाती असून त्यांचा या जगाशीं निकट संबंध आहे, असें यांचें ठाम मत होतें. ह्यांनां आपल्या इच्छेप्रमाणें कार्यें घडवून आणितां येतात, असें यांस वाटत होतें.