प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
चालीरीती.- इंका लोकांत मृताबरोबर जिवंतपणी लागणा-या बहुतेक वस्तू पुरण्यांत येत असत. त्यांच्यांत पुरोहितांचा एक मोठा वर्ग असे. पेरणी, कापणी वगैरे वेळीं उत्सव पाळण्यांत येत. संवत्सर सौरमानाचें असून त्यांत १२ महिने व कांहीं अधिक दिवस असत. संपात व अयनबिंदु काढण्याकरितां काहीं युक्त्या योजिलेल्या असत. पावसाळ्याला सुरूवात म्हणजे दुखण्याला सुरूवात असें समजून रोगराई घालविण्याकरितां कांहीं विधी करीत. अग्नीला हवि अर्पण करण्याचे बरेच संस्कार इंकांत असत. विजयोत्सव किंवा युद्धारंभ या प्रसंगीं मनुष्यबलीहि दिले जात. सर्व उपासनाविधी सूर्याच्या प्रार्थनेकरितां व शेतकीसंबंधीं असत.