प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
इंकांच्या पूर्वीचे लोक :- इंका लोकांचा उदय होण्यापूर्वींची संस्कृति आपणांस प्रथम पाहिली पाहिजे. कारण इंकांनीं कांहीं नांवें व त्यांबरोबर धार्मिक कल्पना या अतिजुनाट लोकांपासून परंपरागत आलेल्या होत्या तशाच स्वीकारल्या टिटीकाका सरोवराच्या दक्षिण किना-याजवळ व समुद्रसपाटीपासून बारा हजारांपेक्षां जास्त फूट उंचीवर अतिशय संस्मरणीय स्वरूपाचे प्रचंड अवशेष आढळतात. हे अवशेष इतके विशाल आहेत कीं, त्यावरून तेथील आसमंतांत एक मोठी लोकवस्ती असली पाहिजे असें दिसून येतें. तेथील दगड इतक्या मोठ्या आकाराचे आहेत व तेथून अगदीं जवळची म्हणतां येईल अशी खाण इतक्या दूर अंतरावर आहे कीं, त्या वेळच्या लोकांच्या जवळ अतिशय मोठें यांत्रिक कौशल्य वास करीत असलें पाहिजे हें उघड दिसतें. तसेंच त्या दगडांची घडण, त्यांवरील शिल्पकाम व त्यांच्या बांधेसूद व एकजातीच्या इमारती पाहून या लोकांचें कौशल्य व सौंदर्यकल्पना चांगली व्यक्त होते. त्या ठिकाणीं अनेक पुतळे आहेत. तसेंच, ३६ x ७ फूट एकढ्या आकाराचे सुद्धां अखंड पाषाणस्तंभ आहेत. हे लोक दक्षिणेकडून आले असावेत असें म्हणतात. हा प्रदेश पूर्वीं हल्लींच्या इतका उंचावर नसावा. कारण १२,५०० फूट उंचीवर कांहीं एक धान्य पिकणार नाहीं व लोकवस्तीहि फारच थोडी असणार. पण त्या वेळची वस्तुस्थिति तशी नव्हती. टिआहूआनाकू ही प्रचंड इमारत बांधण्याला मोठी लोकवस्ती, यांत्रिक शक्ति आणि खाद्यपेयादि जंगी सामुग्री आवश्यक होती हे निःसंशय आहे. प्राचीन स्पॅनिश ग्रंथकार एकमतानें असें प्रतिपादितात कीं टिआहूआनाकूचे हल्लीचे अवशेष इंकांच्या ब-याच मागील काळांत बांधले असले पाहिजेत.