प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
मोंगली कारभाराचें ध्येय - मोंगली सत्ता लष्करी स्वरूपाची होती व त्यामुळें सर्व अधिकार एका अनियंत्रित व्यक्तीच्या हातांत एकत्र झालेला होता. या साम्राज्यांतील मुसुलमानी प्रजेला राजा हाच राजकीय व त्याचप्रमाणे धार्मिक बाबतींत सर्वसत्ताधीश असे, व त्यामुळें स्वधर्मबांधवांच्या सर्व प्रकारच्या समारंभांत तो भाग घेत असे, परंतु मुसुलमानतेरांच्या बाबतींत तो फारशी ढवळाढवळ करीत नसे. मुसुलमानेतर प्रजेचें संरक्षण पोलीस अधिका-यांकडून नीट करविणें व कर वसूल करणें ही दोनच आपलीं कामें असें मोंगल राजे मानीत असत. प्रजेला शिक्षण देणें हें राजाचें कर्तव्य आहे असें त्या वेळीं मानीत नसत. खुद्द इंग्लंडमध्येंहि १८७० पर्यंत हे सरकारचें कर्तव्य आहे असें मानीत नव्हते. हिंदु व मुसुलमानी दोन्ही राज्यपद्धतींत शिक्षण हें धार्मिक चळवळीचें अंग आहे असें मानीत. राजा शिक्षणाप्रीत्यर्थ खर्च करी पण त्याला धार्मिक दानधर्माचें स्वरूप असे. तसेंच कला व वाङ्मय यांनां उत्तेजन देणें याचाहि राज्यकारभाराशीं संबंध नव्हता; ती केवळ राजाच्या खासगी मेहेरबानीची व वैयक्तिक मर्जीची गोष्ट होती. तात्पर्य पोलीसखाते व जमाबंदीखातें खेरीज करून बाकी सर्व बाबतींत मोंगल सरकार हिंदु समाजांतील एकंदर चळवळीपासून अलिप्त असे; व यावरुन पहातां त्यावेळचें सरकारी धोरण अत्यंत आकुंचित स्वार्थपर व ऐहिकस्वरूपाचे होतें. मुसुलमानी संप्रदाय व संस्कृति जित हिंदूंमध्यें प्रसृत करण्याचें उच्च ध्येय मोंगल बादशाहापुढें नव्हतें. प्राचीन रोमन किंवा आधुनिक ब्रिटिश राजनीतीचें ध्येय यापेक्षां अगदीं निराळें व फार व्यापक असल्याचें स्पष्ट दिसतें.