प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
मोंगल साम्राज्याचा -हास व नाश (१७०७-१८५८).- औरंगजेबाच्या मरणानंतर मोगल साम्राज्यास एकदम झपाट्यानें उतरती कळा लागली. औरंगजेबानंतर दहा मोंगल बादशहा झाले पण त्यांच्यापैकीं एकहि इतिहासांत विशेष प्रसिद्ध नाहीं. १७३९ मध्यें इराणच्या नादीरशहानें हिंदुस्थानवर स्वारी केली, व दिल्ली शहर लुटून नेलें. मोंगल घराण्यांतले वंशज १८५८ पर्यंत दिल्लीच्या तक्तावर होते, परंतु खरी सत्ता दरबारांतील लोकांच्या व मराठे सेनापतींच्या हातीं होती. औरंगजेबानंतर हिंदुस्थानांतील कोणाहि मुसुलमान राज्यकर्त्यानें सुलतान म्हणजे सम्राट ही पदवी धारण केली नाहीं. म्हैसूर येथील टिपू स्वतःस सुलतान म्हणवीत असे, पण खरी साम्राज्यसत्ता हातीं नसल्यामुळें तो त्याच्या वेडेपणाचा एक प्रकार समजला पाहिजे. औरंगजेबानंतर जी अंदाधुंदी व बंडाळी साम्राज्यांत माजली त्या वेळीं दोन मुसुलमान सरदार स्वतंत्र राजे झाले. एक दक्षिणहैद्राबादेस निजामउल्मुल्क, हा सुनीपंथाचा होता. त्यानें १७२४ पासून स्वतंत्र राज्य स्थापलें. दुसरा सादत अल्ली खान, हा शिया पंथाचा होता त्यानें अयोध्येस स्वतंत्र राज्य केलें. पश्चिम हिंदुस्थान व मध्य हिंदुस्थानांत मराठे प्रबल होऊन राहिले. या तिघांपैकीं कोणीहि मोगल बादशहास खंडणी देत नसे. बंगाल्यांत मुर्शिद कुलीखान व त्याचे वंशज यांनीं राज्य केलें, आणि हा श्रीमंत पण युद्धपराङमुख बंगाल प्रांत मात्र बादशाही खजिन्यांत खंडणीच्या रूपानें सतत पैसा ओतीत राहिला.
नादीरशहा निघून गेल्यानंतर मराठ्यांनीं दक्षिणेकडून व अफगाणांनीं पश्चिमेकडून दिल्लीवर चढाई केली. १७६१ मध्यें पानिपत येथें अहमदशहा दुराणीनें मराठ्यांच्या संयुक्त सैन्यावर जय मिळविला, पण दिल्ली येथें स्वतः राज्य करण्याची त्याची महत्वाकांक्षा नसल्यामुळें तो स्वदेशीं परत गेला, व दिल्लीचा बादशहा शहा अलम महादजी शिंद्याच्या हातांतील बाहुलें बनून दिल्लीच्या तक्तावर राहिला. त्यानंतरचा बादशहा दुसरा अकबर हा ब्रिटिशांच्या आश्रयानें तक्तनशीन झाला. अखेर मोंगल घराण्यांतला शेवटचा बादशहा बहादुर शहा यानें १८५७ च्या बंडांत अंग असल्यामुळें त्याला ब्रिटिश सरकारानें पदच्युत करून दिल्लीचें मोंगली राज्य १८५७ त खालसा केलें.
दिल्लीची मोंगल सत्ता दुर्बल झाल्यानंतर उत्तरेकडे बंगाल व अयोध्या प्रांतांत व दक्षिणेंत निझामचें राज्य व म्हैसूरमध्यें हैदर व टिपू यांच्या सत्तेखालीं कांहीं काल मुसुलमानी अंमल चालू होता पण त्याचा सांस्कृतिक परिणाम म्हणण्यासारखा मुळींच झाला नाहीं.