प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
मोंगलांच्या राज्यकारभारपद्धतीचें महत्त्व - मोगलांच्या राज्यकारभारापद्धतीची नीट माहिती करून घेणें आजहि आगत्याचें आहे. त्याचीं कारणें अनेक आहेत. आज ज्याप्रमाणें ब्रिटिश राज्यपद्धति जशीच्या तशीच बडोदें. ग्वालेर, इंदोर, अलवार वगैरे संस्थानांत चालू करण्यांत आलेली आहे त्याचप्रमाणें मोंगली सत्तेच्या काळांत मोंगलांच्या सर्व मांडलीक राज्यांत, इतकेंच नव्हे तर पूर्णपणें स्वतंत्र असलेल्या तत्कालीन हिंदू राज्यांतहि मोंगलांची राज्यकारभारपद्धति तिच्या सर्व अंगासह व नावकिताबासहित चालू करण्यांत आलेली होती.
शिवाजीसारख्या हिंदू पद्धतीच्या कट्ट्या अभिमानी राजानें सुद्धां आपल्या मराठी राज्यांत प्रथम तीच मोंगली पद्धति सुरू केली होती; आणि पुढें जरी आपल्या अष्ट प्रधानमंडळाला त्यानें विचारपूर्वक फारसी नांवें बदलून संस्कृत नांवें दिलीं, तरी पुष्कळ खात्यांत सरकारी कागदपत्रांत इस्लामी नांवेच कायम होतीं. येणेंप्रमाणें एकेकाळीं ही मोंगली राज्यकारभारपद्धति सर्व हिंदुस्थानभर पसरलेली होती.
आजहि ब्रिटिश राज्यपद्धतीचें बारकाईनें निरीक्षण केल्यास तिची इमारत मोंगली पायावरच अद्यापहि उभारलेली आहे असें दिसून येईल. १८ व्या शतकांमध्यें ईस्ट इंडिया कंपनींतील इंग्रज व्यापा-यांनां व साध्या कारकुनांनां अत्यंत परकीय देशांत परकीय लोकांवर राज्य करण्याचा अनपेक्षित प्रसंग आला तेव्हां त्यांनींहि त्या वेळीं सर्वत्र प्रचलित असलेल्या मोंगली पद्धतीचाच जरूर त्या थोडक्या फेरफारानें अंगीकार केला. वारन हेस्तींग्जच्या वेळीं बंगाल व बहारमध्यें मोंगली राज्यपद्धतिच सुरू होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. पुढील गव्हर्नर जनरलांनीं पुष्कळ फेरबदल केले, तथापि मूळ मोंगली पाया कायमच आहे.
महंमदी अमलामुळें एकंदर भरतखंडावर जे सांस्कृतिक परिणाम झाले त्यांचें विवेचन पहिल्या विभागांत केलेंच आहे.