प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

घोरी घराणें.- महंमूदाच्या गझनबी घराण्यानें ९९६ ते ११८६ पर्यंत गिझनी व लाहोर येथें राज्य केलें. हें घराणें घोरीच्या महंमूदानें बुडविलें. त्यानें हिंदुस्थान जिंकण्याकरितां एका अगदीं साध्या मार्गाचा अवलंब केला. नंतरच्या सर्व जेत्यांनीं व इंग्रजांनीं सुद्धां याच मार्गाचा उपयोग केला. तो मार्ग हा कीं, हिंदुस्थानांतील अनेक राजांचीं जी भांडणें व युद्धें आपसांत होत त्यांमध्यें पडून त्यांच्या आपसांतील चुरसीनें त्यांनां प्रथम हतबल करावयाचें व नंतर त्यांचीं राज्यें हस्तगत करावयाचीं. महंमूद घोरीनें दिल्ली व कनोज येथील राजांच्या आपसांतील भांडणांत एका पक्षास प्रथम मदत करून नंतर त्यानें दोन्हीं राज्यें बळकावलीं, आणि नंतर बनारसपासून ग्वालेर व गुजराथपर्यंत मुलुख जिंकून आपले साम्राज्य स्थापल व दिल्ली येथें राजधानी ठेविली.