प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

मुसुलमानी राज्यकारभाराचें स्वरूप.- हिंदुस्थानांत मुसुलमान लोक शिरले, तेव्हांपासून लूट करण्याचा त्यांचा बराच रोख दिसतो. आरंभीं तर देवळें व शहरें लुटणें, मूर्ती फोडणें, घरें जाळणें व माणसांची कत्तल करणें हे प्रकार बरेच वारंवार होत असत. महंमूद गज्नवी महंमद घोरी, अलाउद्दिन खिलजी, तैमूरलंग, नादीरशहा, अहमदशहा, अब्दाली, इत्यादि पुरूषांनीं व त्यांच्या अनेक सरदारांनीं व प्रांतोप्रांतीच्या अमलदारांनीं अनेक शहरें व देवालयें लुटलीं आहेत. या लुटीपैकीं बराचसा पैसा देशाबाहेर गेला.

इस्लामी धर्माचा प्रसार करणें हा मुसुलमान जेत्यांचा दुसरा प्रबल उद्देश होता. या बाबतींत आरंभींचे सुलतान हिंदूंनां कसे वागवीत याबद्दल कीनच्या इतिहासांत पुढील वर्णन आहे. ''इस्लामी धर्मतत्व असें आहे कीं, लोकांनीं इस्लामी धर्म तरी स्वीकारावा किंवा तरवारीला बळी पडावें. पण भूतदयावादी एका इस्लामी पंथाचें मत असें होतें कीं, इस्लामी धर्म स्वीकारणें नसेल त्यांनीं झिझियानामक कर द्यावा. हा कर देण्याची सवलत देणें म्हणजे हिंदूंवर मोठे उपकार आहेत ही गोष्ट त्यांनीं ध्यानांत वागविली पाहिजे, व फार लीनतेनें वागलें पाहिजे. एखादा कर वसूल करणारा अधिकारी त्यांच्या तोंडावर थुंकला तरी सुद्धां त्यांनीं ती मेहेरनजर समजली पाहिजे त्यांनीं मुसुलमान अधिका-यांच्या आज्ञेंत राहून इस्लामी धर्माची कीर्ति वृद्धिंगत केली पाहिजे. कारण खुद्द कुराणांतच असें सांगितलें आहे कीं, 'त्यांनीं इस्लामी धर्म स्वीकारावा, नाहींतर मरण पत्करावें, नाहींतर गुलाम बनून राहावें.''

सदरहू प्रकारची धर्मक्रांति अल्पकाळांत घडवून आणण्याची मुसुलमान जेत्यांची उत्कट इच्छा होती. पण सामान्यतः ह्या मानव सृष्टींत कोणतीच क्रांति एकदम घडून येत नाही. विशेषतः हिंदुस्थानांत मोठी क्रांति म्हणून क्वचितच घडते असें म्हटलें तरी चालेल. शेकडों वर्षें मुसुलमानांचे हल्ले या देशावर येत होते, तरी हिंदु लोकांच्या पूर्वजीवनक्रमांत फारसा फरक झाला नाहीं. हिंदु व मुसुलमान हीं दोन राष्ट्रे इतके दिवस एके ठिकाणीं राहून एकमेकांपासून इतकीं अलिप्त राहिल्याचें उत्कृष्ट उदाहरण भूतलावर हिंदुस्थानाशिवाय दुसरें नाहीं. इंग्लंडांत नॉर्मन व सॅक्सन लोकांचें संमिश्रण शंभर वर्षांच्या आंत झालें. असो. लष्करी जोरावर हिंदूंच्या भक्कम धर्माचा पाडाव करण्यास झटणें भ्रांतिमूलक होय, हें तत्त्व पांचशें वर्षांच्या अनुभवानें कां होईना पण अकबरासारख्या सुज्ञ राज्यकत्यांस तेव्हांच कळून आलें. म्हणूनच वैरभाव सोडून गोडीगुलाबीचा सौम्य मार्ग त्यानें स्वीकारला, आणि हिदूंशीं अनेक स्नेहसंबंध जोडले. अंततः ह्या युक्तिचाहि फारसा उपयोग झाला नाहीं हें इतिहासावरून स्पष्ट कळतें.