प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

मुसुलमानी अंमलाखालील हिंदुस्थान.- एखादें राजघराणें किंवा एखादी राज्यशासनपद्धति अस्तित्वांत आली असतां, तिच्या अस्तित्वास निसर्गनियमानुसारच कांहीं ठराविक मर्यादा असते, असें इतिहासांतील अनेक ठिकाणच्या दाखल्यांवरुन दिसून येते. उदाहरणार्थ, ख्रि. पू. ३० मध्यें ऑगस्टनें रोमन साम्राज्यांत जी अनियंत्रित शासनपद्धति सुरू केली ती इ. स. १८० मध्यें एम् ऑरेलियसच्या मृत्यूबरोबर लयास गेली. बगदाद येथें इ. स. ७५४ मध्यें स्थापन झालेली खलीफांची सत्ता ९६४ पर्यंत मोठ्या भरभराटींत होती, पण त्यानंतर लवकरच खलीफांचें साम्राज्यवैभव नष्ट झालें. त्याच सुमारास म्हणजे इ. स. ७५२ मध्यें पश्चिम यूरोपांत स्थापन झालेले कोरोलिंगियन साम्राज्यसत्ताधीश घराणें इ. स. ९५६ मध्यें ह्यु कॅपेटनें नष्ट केले. इंग्लंडमध्यें वुल्यम दी काँकरर यानें स्थापन केलेलें राजघराणें तिस-या हेनरीच्या निधनाबरोबर लयास गेलें, आणि पार्लमेंटची स्थापना होऊन लोकप्रतिनिधिनियंत्रित अशी राजसत्ताक पद्धति सुरू झाली. फ्रान्समधलें बोर्बोन राजघराणें चवथा हेनरी राज्यावर आला (१५८९) तेव्हांपासून सोळावा लुई मरेपर्यंत (१७९३) टिकलें. पुन्हां इंग्लंडमधील लोकनियंत्रित राजसत्ताकपद्धतीचा इतिहास पाहिला तरी असें दिसतें कीं, प्रथम पार्लमेंटमध्यें लार्ड लोकांचें वर्चस्व होतें ते १८३२ मध्यें नष्ट होऊन खरी सत्ता कॉमन्स लोकांच्या हातीं गेली आणि राजा तर लोक प्रतिनिधींच्या हातांतील केवळ बाहुलें बनून राहिला. अशा या अनेक उदाहरणांवरून असें अनुमान काढावेंस वाटतें कीं, एकादें राजघराणें किंवा एकादी राज्यशासनपद्धति अस्तित्त्वांत आल्यावर तिचा जोम सरासरीनें सात पिढ्या टिकतो. शिवाय आकस्मिक युद्धादि कारणांमुळें ही अस्तित्वमर्यादा कमी होण्याचा संभव असतोच. वरील नियम हिंदुस्थानांतील मुसुलमानी (१००१-१३७८) व मोंगली (१५२६-१७४८) दोन्ही अम्मलांनां लागू पडतो.