प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

मोंगल बादशहाचें कर्तृत्व.- बाबरनें हिंदुस्थान जिंकल्यानंतर लवकरच सुधारलेली राज्यकारभारपद्धति सुरू झाली. परंतु ती सुरू करण्याचा पहिला मान खुद्द मोंगल बादशहास नसून शीरशहाला आहे. हुमायून बादशाहाचें सिंहासन बळकावणा-या या  बंडखोर सरदारानें आपल्या अल्प कारकीर्दींत सुसंधटित व सुधारलेली कारभार पद्धति अमलांत आणण्याचा उपक्रम केला. नंतर त्याच्याच पायावर अकबर बादशहानें सुधारणांची मोठी भव्य इमारत उभारली. या कामांत अकबराला अबुल फझलचें फार साहाय्य झाले. अबुल फजलनें लिहिलेल्या ऐने अकबरी नामक ग्रंथांत अकबराच्या राज्यकारभाराची बादशहाच्या दिनचर्येसुद्धां सर्व हकीगत फार बारकाईनें दिली आहे. अकबर बादशहा अहोरात्रींत एकढांच जेवीत असे, मांसाशन कित्येक महिने बिलकुल करीत नसे. तो झोंपहि फार थोडी घेत असे. थोडीशी झोंप पूर्व रात्रीं व थोडीशी पहाटेस घेऊन बाकी रात्रीचा वेळ तो वादविवादांत किंवा राज्याचे काम पाहण्यांत घालवी. अकबर बादशाहानें चालू केलेली राज्यकारभारपद्धति आणि परधर्मीयाबरोबरचे सहिष्णुतेचें व समानतेचें धोरण हीं नांवाजण्यासारखीं होतीं यांत शंका नाहीं.

त्याचा मुलगा जहांगीर याची कारकीर्द जुलुमी नव्हे पण निष्काळजीपणाची होती. राज्यकारभार कसा करावयाचा यासंबंधानें त्यानें आपले स्वतःचे विचार लिहून ठेविले आहेत, ते ब-या प्रकारचे आहेत. तथापि हे विचार प्रत्यक्ष अमलांत आल्याचें दिसत नाहीं. उदाहरणार्थ, मालाच्या वाहतुकीवरील जकाती नसाव्या असा त्याचा हुकूमहि होता पण त्याचीं अम्मलबजावणी होत नव्हती. दुसरें उदाहरण मद्यपानाचें. मितपानाचा प्रसार प्रजाजनांत केल्याचें तो श्रेय घेतो, पण स्वतः अतिरक्ति मद्यपान करीत असे हें प्रसिद्धच आहे.

पुढील बादशहा शहाजहान याची कारकीर्द प्रजेला सुखावह गेली. हिंदु व यूरोपीय दोघांहि लेखकांनीं त्याची स्तुति केलेली आढळते.

अवरंगजेबाच्या कारकीर्दीत पूर्वीं अकबरानें घालून दिलेली राज्यकारभाराचीं उच्च तत्त्वें झुगारून देण्यांत आलीं. एकीकडे साम्राज्याची मर्यादा वाढत होती, पण प्रजेमध्यें असंतोष पसरूं लागून मोंगल साम्राज्य विस्कळित होण्याची क्रिया झपाट्यानें सुरू झाली. अवरंगेजेब नें जीं इतर मुसुलमानी राज्यें नष्ट केलीं त्यामुळें मराठी राज्यावरील दडपण कमी होऊन मराठे अधिकाधिक प्रबल होत गेले. अवरंगजेब मरण पावतांच प्रांतोप्रांतीचे मुसुलमान अधिकारी स्वतंत्र राजे बनले. सात पिढ्यांसंबंधाचा वर सांगितलेला नियम लागू झाला असें म्हणावें लागतें, कारण अवरंगजेबानंतर मोंगल राजघराण्यांतला जोम एकदम कमी झाल्याचें दिसून येतें.