प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
हिंदुसथानचें स्वातंत्र्यसंरक्षण.- परकीयांच्या हल्ल्यांचा प्रतिकार हिंदू लोकांनीं अनेक वेळां केलेला आहे. अलेक्झांडर ऊर्फ शिकंदर बादशहाच्या वेळेपासून परकीयांचे हल्ले हिंदुस्थानावर होऊं लागले. त्यापूर्वींच्या हल्ल्यांची ऐतिहासिक माहिती नाहीं. खरें म्हटलें म्हणजे हिंदुस्थानास संपूर्ण स्वतंत्रता जर कधीं आली असेल, तर ती शिकंदर बादशहा येण्याच्या पूर्वीं असेल. शिकंदराच्या वेळेपासून ग्रीक, सिथियन, शक, हूण व पुढें अरब, तुर्क, मोंगल आणि सरशेवटी पाश्चात्त्य ख्रिस्ती इत्यादि अनेक परकीय लोकांचे हल्ले आज दोन अडीच हजार वर्षें हिंदुस्थानावर येत आहेत; आणि त्या सर्वांचा थोड्याबहुत अंशानें येथें रिघाव झाला आहे, तथापि त्यांचा प्रतिकारहि वेळोवेळीं येथील लोकांकडून झालेला आहे, हें सहसा कोणाच्या लक्षांत येत नाहीं 'शिकंदर बादशहाच्या स्वारीनंतर शहाबुद्दीन घोरीच्या स्वारीपर्यंत जीं पंधराशें वर्षें गेलीं, तेवढ्या काळांत ह्या देशावर परकीयांच्या स्वा-या एकामागून एक येत होत्या; आणि तितक्यांस येथचे लोक मागे हटवून स्वतःची सत्ता स्थापन करीत होते. जगाच्या इतिहासांत इतके प्रचंड झगडे सापडणें कठिणं. शिकंदर बादशहाचें वास्तव्य येथें झालेंच नाहीं. त्याचे कांहीं लोक मागें राहिले, त्यांस चंद्रगुप्तानें घालवून दिलें. पुढें शंभर वर्षांनीं वायव्येकडील बँक्ट्रिया या देशांतून ग्रीक लोकांनीं पुनः हिंदुस्थानावर स्वारी केली त्यावेळीं मगध देशचा राजा पुष्यमित्र व त्याचे सेनापती ह्यांनीं इ. स. पू. १७५ च्या सुमारास त्या यवनांस बाहेर घालवून दिलें. यवनानंतर शक आले. त्यांनीं तक्षविला व मथुरा येथें सुमारें शंभर वर्षें राज्य केलें. त्यांचा पाडाव इ. स. पूर्वीं ५७ च्या सुमारास उज्जनीच्या विक्रमादित्यानें केला. नंतर पश्चिमेकडून शकांची दुसरी एक टोळी आली. त्यांचा राजा नहपान याचा गौतमीपुत्र पुलुमायि शातकर्णी यानें इ. स. १२६ त पराभव केला. त्यानंतर यूएची नांवाचे लोक हिंदुस्थानावर आले. त्यांचे राजे कनिष्क, हुविष्क व वासुदेव यांनीं शंभर वर्षेपावतों पंजाब व सभोंवारच्या प्रदेशावर राज्य केलें. त्यांचा पाडाव गुप्तवंशी प्रबल राजा समुद्रगुप्त यानें चवथ्या शतकांत केला. पांचव्या शतकांत श्वेत हूण लोक हिंदुस्थानावर चालून आले. त्यांचा दुष्ट राजा मिहिरगुल यास सहाव्या शतकांत यशोधर्म राजानें जिंकलें. तरी सातव्या शतकांत पुनरपि हूण लोक हिंदुस्थानांत आले त्यांस कनोजच्या श्रीहर्षानें कायमचें हांकून लाविलें. त्यानंतर सुमारें तीनशें वर्षेंपावेतो हिंदुस्थानावर परचक्र आलें नाहीं. पुढें सबक्तगीन व गझनीचा महमूद चालून आले. त्यांजपुढें हिंदु लोक हार पावले, तथापि त्यांनीं स्वराज्य घालविलें नाहीं. आणखी दोनशें वर्षें गेल्यावर महंमद घोरी हिंदुस्थानावर आला. त्याजला अडविणारा शेवटचा शूर वीर पृथ्वीराज होय. परंतु त्या सामन्यांत पृथ्वीराजाचा पाडाव होऊन बाराव्या शतकाच्या आरंभीं हिंदुस्थानावर परराज्य स्थापन झालें. सारांश, बाराव्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीराजाचा पाडाव झाला. तोपावेतों हिंदुस्थानांत आर्यांचें स्वतंत्र राज्य कायम होतें. तेराव्या शतकापासून मात्र हा देश परचक्राखालीं गेला. तें परचक्र मुसलमानांचें होय.