प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
मोंगली राज्यकारभार पद्धतीचा मूळ आधार : - मोगल बादशाहांनीं तरी आपली पद्धति कशावरून ठरविली ? अर्थात् त्यांनीं हिंदुस्थानाबाहेरील इराक येथील अब्बासी खलीफांच्या ईजिप्तमधील फतिमिद खलीफांच्या पद्धतीवरून ती आयती उचललेली दिसते. म्हणून तिला थोडक्यांत पर्शु-अरबी पद्धति असें म्हणतां येईल. त्यांचीं राज्यकारभारांतील तत्त्वें, धार्मिक बाबतींतलें धोरण, करव्यवस्था, खातेविभागणी व सरकारी अधिका-यांचीं नांवें, हुद्दे सुद्धा सर्व हिंदुस्थानाबाहेरून आयतीं आणलेलीं होतीं अर्थात हिंदुस्थानांत ती पद्धति सुरू करतांना तेथें पूर्वापार चालू असलेल्या प्राचीन हिंदु पद्धतीकडे सर्वस्वी दुर्लक्ष करणें शक्य नसल्यामुळें त्यांनां स्थानिक परिस्थितीला धरून थोडे फेरफार करावे लागलेच. उदाहरणार्थ आपल्या मुख्य इस्लामी तत्त्वांनां बाध येत नसेल अशा सर्व स्थानिक हिंदु चालीरीतीनां ते मान देत असत सामान्यतः प्राचीन हिंदु ग्रामव्यवस्था व खालच्या दर्जाचे नोकर, कामगार मोगल बादशाहांनीं जुन्या हिंदुपद्धतीतीलच कायम ठेवले होते. मुख्य राजदरबार व वरिष्ठ अम्मलदार यांची रचना मात्र सर्वस्वी इराण व ईजिप्तमधील पद्धतीची होती. उदाहरणार्थ, ईजिप्तमधील अरबी राज्यपद्धतींत सुभेदार व खजिनदार हे दोन स्वंतंत्र अधिकारी असत. सुभेदाराला अमीर म्हणत. व त्याच्या हातीं लष्कर व पोलीस हीं दोन खातीं असत खजीनदाराला अमील म्हणत व तो खजिन्यावर मुख्य असे. आणि सेनापतीपेक्षां खजिनदाराचाच पगडा राजधिर अधिक असे. हिंदुस्थानांतहि मोंगलांचे प्रांतावर सूभेदार व दिवाण असे दोन अधिकारी असून ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी असत.