प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
शीरशहा व शूर घराणें.- हुमायून पळून गेल्यानंतर शीरशहानें दिल्लीचें राज्य घेतलें, व आसपासचे प्रांत बंडे मोडून ताब्यांत आणले. शिवाय त्यानें राज्यकारभारांत हि चांगल्या सुधारणा केल्या. पुढें अकबरानें ज्या सुधारणा केल्या त्यांचा पाया घालण्याचें बरेचसें काम शीरशहानें केलें. कीन म्हणतो, ''शीरशहानें जितकें शहाणपण दाखविलें तितकें कोणत्याहि सरकारनें, ब्रिटीश सरकारनें सुद्धां, दाखविलें नाहीं.'' शीरशहा १५४५ मध्यें एका वेढ्याचे वेळीं मारला गेला. त्याचा मुलगा फार क्रूर निघाल्यामुळें लवकरच हुमायूनला परत येण्यास संधि मिळाली.