प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
मोंगल बादशहा बाबर व हुमायून.- बाबरनें प्रथम विरुद्ध उठलेल्या लोकांच्या अत्यंत क्रूरपणानें कत्तली केल्या. त्यानें आपल्या 'आत्मवृत्तांत' सर्व हकीगत सविस्तर लिहून ठेविली आहे. तसेंच त्यानें आपलीं मतें व भावना मनमोकळेपणानें लिहून ठेविल्या आहेत. शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे श्रम करण्याची त्याला आवड असे. राज्यकारभाराचें काम संभाळून शिवाय तो तलाव, विहिरी बांधणें व दूरदूर देशच्या फळझाडांची लागवड करणें वगैरे कामांत लक्ष घालीत असे. शिवाय फारसी भाषेंत कविता करण्याचा त्याला नाद असे. बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून राज्यावर आला. पण त्याला लवकरच शत्रू उत्पन्न झाले. प्रथम हुमायूननें आपला भाऊ कामरान याला इराण ते सिंधूनदीपर्यंतचा मुलूख देऊन त्याचा तंटा मिटविला. नंतर गुजराथवर स्वारी करून तेथील राजा बहादुरशाहा याचा त्यानें पराभव केला. इतक्यांत बंगाल्यांत शीरशहा नांवाच्या सुभेदारानें बंड केलें, ते मोडण्याकरितां तो तिकडे गेला. पण या सामन्यांत हुमायूनचाच पराभव झाल्यामुळें दिल्ली सोडून तो इराणांत पळून गेला, व इराणच्या बादशहाच्या आश्रयास राहिला. नंतर १५५५ मध्यें त्या बादशहाच्या सैन्याच्या मदतीनें त्यानें दिल्लीचें राज्य परत मिळविलें.