प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
मोंगल.- मोंगल मूळ चिनी वळणाचे होते. म्हणजे त्यांचा रंग पिंगट, कपोलस्थी उंच, नाकें पसरट, डोळे अरुंद व लांबोळे, तोंडें मोठीं होतीं. नंतर तुर्कांच्या सहवासाचें त्यांच्यांत मिश्रण झालें आणि सरतेशेवटीं ते इराणी वळणावर गेले. त्यांचा चेह-यावर लाली येऊन तो सुंदर व फुगीर बनला. शेवटीं हिंदुस्थानांत शंभर लोहमय, चेहरे विस्तवासारखे, मान आंखूड, कातडी राठ, गाल सुरकुतलेले, नाकपुड्या केसाळ व रुंद, तोंड अजगरासारखी व अंगाला भयंकर दुर्गंध अशा त-हेचें स्वरूप त्यांनां प्राप्त झालें. सर्व तार्तार लोकांपैकीं मोंगलांत जास्त कुवत होती. विशाळ फौजा तयार करून राज्यें पादाक्रांत करणें, तेथील लोकांची कत्तल करून त्यांचें सर्वस्वापहरण करणें व सर्व मुलुख उध्वस्त करून टाकणें असा सामान्यतः त्यांचा क्रम असे. चेंगीझखान हा अशाच प्रकारचा एक तुफानी राक्षस होता. हिंदुस्थानांत आल्यावर इमारतीची बांधकाम, रस्ते, कालवे वगैरे सार्वजनिक लोकहिताचीं कामे त्यांचे हातून झालीं, पण तीं तेथील संसर्गानें व परिस्थितीच्या प्रभावामुळें झालीं, स्वयंस्फूर्तीनें नव्हे. मोंगल मूळचे अज्ञानी पण स्वभावानें चौकस होते. ते उद्दाम व गर्विष्ठ असत. घरांतील सर्व व्यवस्था बायकांवर व बाहेरची सर्व हलकी कामें नोकरांवर ते सोंपवीत. युद्ध व शिकार हीं दोन कामें मात्र स्वतः करीत. खाण्यापिण्याची चैन म्हणजे त्यांच्या सुखाचा कळस. ते नाना प्रकारची मद्यें प्राशन करीत. ते स्वभावाचे मोकळे, परंतु संशयी व रागीट आणि अंतःकरणाचे फार कठोर होते. त्यांच्या स्त्रिया व्यवस्थित व शुद्धाचरणी असत. त्यांच्यांत व्यभिचार हा अत्यंत निद्य गुन्हा समजला जात असे. त्याला चेंगिझखानानें मरणाची शिक्षा ठरविली होती.
मोंगलांच्या जुन्या मूळ धर्माचें आर्यधर्माशीं साम्य होतें. पंचमहाभूतांस ते आपल्या अन्नाचा अवशेष अर्पण करीत. प्रत्येक घरांत मूर्ति असे, तिची ते मनोभावानें पूजा करीत. ब्राह्मणासारखे त्यांच्यांत पुरोहित होते; ते ज्योतिष पहात, शकुन सांगत व ग्रहणें वर्तवीत. हिंदु योग्याप्रमाणें त्यांच्यातहि अंगाला राख फासलेले साधु असत, ते आपल्या तपाच्या व पवित्राचरणाच्या बळावर पुष्कळ चमत्कार करून दाखवीत. ते अनेक देवांची पूजा करीत. क्षत्रियांप्रमाणें त्यांस मांस आवडे. त्यांच्यांत पडदा नसे. सतीची चाल नव्हती. मेलेल्या भावाच्या बायकोशी दुसरा भाऊ लग्न करी.
नंतर याच मोगलांपैकीं कित्येक बुद्धधर्मी झाले. कित्येक ख्रिस्ती झाले व कित्येक मुसुलमान झाले. पण या धर्मातरामुळें त्यांच्यांतील मूळची धर्मनिष्ठा ढासळत गेली. मुसुलमान झाल्यानंतरच्या त्यांच्या धर्मनिष्ठेंत अरब मुसलमानांतील कडवेपणा नव्हता. धर्मसंबंधांत ते संशयी, ढिले व बेपर्वा असत. मुसुलमानी संप्रदायाचे वरील पातळ आवरण दूर केल्यास त्यांच्या अन्तर्यामी आर्य, बौद्ध, ख्रिस्ती वगैरे धर्माचें मिश्रण दिसून येतें. म्हणून कट्टे अरब मुसुलमान व सौम्य हिंदू यांच्या दरम्यानचा मोंगल हा एक निराळाच प्रकार आहे. हिंदुस्थानांतील मोंगल बादशहा धर्माच्या बाबतींत मुळींच आग्रही नव्हते. धर्मोपदेश करण्यास लागणारी जाज्वल्य धर्मश्रद्धा त्यांच्यांत नव्हती, सुधारणेचें आरोपण करण्यास त्यांच्याजवळ बीज नव्हते. धर्मस्वीकार करण्याऐवजीं मोठी खंडणी दिली कीं ते जिंकलेल्या लोकांस सोडून देत. हा थोडासा त्यांच्या अत्यंत लोभी स्वभावाचाहि परिणाम होय.