प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

मुसुलमानी स्वा-यांच्या वेळची लोकस्थिति.- मुसुलमानांचा हिंदुस्थानांत प्रवेश झाला त्या सुमारास संस्कृति व ऐश्वर्य या दोन्ही दृष्टींनीं हिंदूंची स्थिति काय होती याची कल्पना १६ व्या प्रकरणावरून येईलच. ही स्थिति तुर्क, अफगाण वगैरे लोकांपेक्षां ब-या प्रकारची होती यांत शंका नाहीं. असें असतां मुसुलमानांस हिंदूवर विशेषतः शूर बाण्याच्या रजपूत लोकांवर जय कसा मिळाला असा प्रश्न उद्भवतो. हिंदुस्थानांत हर्षानंतर कोणी मोठा सम्राट झाला नाहीं, तर प्रांतोप्रांतीं लहान लहान स्वतंत्र राज्यें नांदूं लागलीं व आपसांत कलह व युद्धें करूं लागलीं, इत्यादि परिस्थितीचें वर्णन मागें आलें आहे (पृष्ठ ३२९ पहा). हिंदुस्थानांतील अनेक भागांत जीं रजपूत घराणीं राज्य करीत होतीं, त्यांचा बाणा शिपाईगिरीचा होता. सर्वच रजपूतांच्या अंगीं अप्रतिम शौर्यतज वसत होते. तत्कालीन पाश्चात्य सरदारांच्या (नाईटस) ठायीं ज्याप्रमाणें स्त्रीवर्गाविषयीं पूज्यबुद्धि व औदार्य वसत असे, त्याचप्रमाणें हिंदुस्थानांतील रजपूतांच्या अंगीहि ते गुण बसत होते. रजपूत राजांचा दिलदारपणा, धीरोदात्त स्वभाव व कदर यांची बरोबरी होणें नाहीं. अशा शूर बाण्याचे लोक मुसुलमानांच्या रस्त्याचें नाकें धरून बसलें असतांहि मुसुलमानांचा प्रवेश हिंदुस्थानात झाला, याला एक जबरदस्त कारण आपसांतील कलह. दुसरें कारण असें कीं, रजपूतांचा स्वभाव फार भोळा असे; कपटानें विश्वासघात करणें ते निंद्य समजत; जशास तसें वर्तन करून संकटनिवारण करण्यास जें एक प्रकारचें व्यवहारचातुर्य लागतें ते त्यांच्यांत नव्हतें. म्हणून त्यांच्यापेक्षां क्षुद्र लोकांचा कपटाच्या योगानें त्यांजवर पगडा सहज बसे.

मुसुलमानी स्वा-यांच्या काळीं रजपूतांची कशी दुर्दशा झाली होती हें रासा ग्रंथांवरून चांगलें समजतें. विशेषतः चंदभाटाच्या रासा ग्रंथावरून असें दिसून येतें कीं, निरनिराळ्या राजघराण्यांतील परस्पर वैमनस्यें, पैशाच्या लोभानें मुसुलमान शत्रूंस बातमी पोंचविणा-या राष्ट्रद्रोही लोकांचा मसुळसुळाट, रजपूत फौजांची अव्यवस्थित रचना, शत्रूंकडील बातमी मिळविण्याविषयीं आमच्या वीर पुरूषांनीं केलेली हयगय, जातिभेदाच्या व्यवस्थेमुळें एकट्या क्षत्रियांवरच पडलेला युद्धाचा सर्व बोजा, आणि इतर वर्गांच्या ठिकाणीं असलेली स्वदेशसंरक्षणाविषयीं अनास्था, इत्यादि कारणांमुळें मुसुलमानांचा रिघाव हिंदुस्थानांत झाला.