प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
मुसुलमानांतील मूळच्या जातींचें मानवशास्त्रीय स्वरूप - मुसुलमानी संप्रदायांत श्रेष्ठ प्रतांच्या अरबी लोकांचा व तसेंच मध्य आशियांतील तुर्क, मोंगल, तार्तार वगैरे धनगरी पेशाच्या लोकांचा प्रवेश होत गेल्यामुळें मुसुलमान लोकांत अनेक वंशांचें मिश्रण झालेलें आहे. व त्या वंशांचे स्वभावभेद पुढें त्यांच्या कर्तृत्वांत उतरलेले दिसतात. तुर्क, मोंगल व तार्तार लोकांनीं मुसुलमानी संप्रदाय स्वीकारून अनेक पराक्रम गाजविले; पण त्यांच्याकडून जगाच्या संस्कृतींत फारशी भर पडली नाहीं. याच तुर्कमोंगलांचा हिंदुस्थानच्या इतिहासाशीं विशेष संबंध आहे. हे लोक मूळ मध्यआशियांत राहणारे. मध्यआशियाखंड म्हणजे सर्व बाजूंनीं प्रचंड पर्वतांनीं वर उचलून धरिल्यासारखा मेजाच्या आकृतीचा एक विस्तृत प्रदेश आहे. मानवी उत्पत्तीचें मूळ ठिकाण येथेंच असावें असें कित्येक म्हणतात. पृथ्वीवरील आजपर्यंतच्या प्रचंड घडामोडी या प्रदेशांतील लोकांनीं केलेल्या आहेत. आर्य, सिथियन, हूण, यवन, शक, तुर्क, तार्तार वगैरे अनेक जातींचे लोक मूळ येथून बाहेर पसरले, आणि त्यांनीं दक्षिणेस व पश्चिमेस अनेक भरा-या मारल्या. पृथ्वीवरील मानव जातीचे जे तीन वंश समजतात त्यांपैकीं गौरवर्णी सेमाइट वंशात बाबिलोनी, असुरी, अरेमियन व अरबी हे लोक मोडतात; आणि तुर्क, मोंगल, तार्तार वगैरे मध्यआशियांतील धनगरी पेशाचे लोक पीतवर्णी वंशांत मोडतात. तुर्क, तार्तार, मोंगल, मांचू या सर्वांस सिथियन अशीहि संज्ञा आहे. मध्यआशियाच्या पश्चिम भागीं बुखारा शहरचे आसपास जे रहात, ते तुर्क होत, उत्तरभागीं सैबीरियांत रहात ते तार्तार, आणि पूर्व भागीं रहात ते मोंगल होत. मोंगल व मांचू हे बहुतेक एकच. या सर्व लोकांची वहिवाट एक ठिकाणीं स्थायिक राहण्याची नव्हती. आपले गुरांचे कळप व तंबू बरोबर घेऊन ते मनास वाटेल तिकडे भटकत जात. त्यांपैकीं मोगल हे विशेष शूर व धीट असत. मुसुलमानी संप्रदाय स्वीकारण्यापूर्वीं हे सर्व लोक बुद्धधर्मी असून तिबेटच्या लामाचे अनुयायी होते. इराणच्या प्राचीन राजांस या सर्व टोळधाडी नेहमीं जर्जर करीत असत. तुर्क व मोंगल हे तुराणी म्हणजे तुराणांत अथवा इराणच्या उत्तरेकडील व सैबीरियाच्या दक्षिणेकडील प्रदेशांत ज्यास हल्लीं तुर्कस्तान म्हणतात- त्यांत राहणारे लोक होत. त्यांपैकीं मोंगलांचें मूळ ठिकाण मोगोलिया. स्वभावानें व संस्कृतीनें मोंगल व तुर्क जवळजवळ सारखेच. दोघेहि मूळचे रानटी व धनगरी पेशाचे. मोगलांच्या शरीररचनेंत थोडें चिनी मिश्रण होतें; पण अलीकडच्या घडामोडींत मोंगलाचें मूळचें स्वरूप पार बदलून गेले आहे. दोघांचा मूळचा स्वभाव क्रूर विध्वंसक, परहिताविषयीं निष्ठुर व मानवी संस्कृतीला विरोधी असा होता.