प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
गिझनीचा महमूद.- अकराव्या शतकाच्या आरंभीं मुसुलमानांनीं हिंदुस्थान जिंकण्यास गिझनीच्या महंमूदाच्या नेतृत्वाखालीं नेटानें आरंभ केला. महमूद हा तुर्की वंशांतला असून त्यानें गिझनी येथें स्वतंत्र राज्य स्थापलें होतें. या राज्यास कादिर या खलीफानें मान्यता दिली होती. रजपूत राजांनीं महंमूदास निकराचा विरोध केला. महमूदानें १००१ ते १०२६ च्या दरम्यान हिंदुस्थानावर एकंदर सतरा स्वा-या केल्या. त्यानें दूर गुजराथेवर स्वारी करून सोमनाथाचें देवालय लुटलें. तथापि फक्त पंजाबप्रांत मुसुलमानांच्या ताब्यांत राहिला. पुढें महंमूदाच्या अनुगामी राजांनीं गंगायमुना नद्यांच्या कांठचा प्रदेश जिंकला तेव्हां तेथील रजपूत राजघराणीं राजपुतान्यांतील डोंगराळ मुलुखांत जाऊन राहिलीं. तीं पुढें मोगलांच्या वेळींहि पूर्णपणें जिंकली गेली नाहींत. अद्याप कित्येक घराणीं तेथें राज्य करीत आहेत.
महंमूदाच्या स्वा-यांचे राजकीय व धार्मिक दोन्ही उद्देश होते. तो खलीफतीचा प्रतिनिधि म्हणून संप्रदाय प्रसार व अरबसंस्कृतिप्रसार करण्यास हिंदुस्थानावर स्वारी करून आला. शिवाय हिंदुस्थानांतील संपत्ति पाहून तर त्याचे डोळे दिपून गेले. त्यानें मथुरा नगरीच्या ऐश्वर्याचें पुढील प्रमाणें वर्णन केलें आहे, 'या आश्चर्यकारक शहरांत एक हजारावर इमारती आहेत व त्यांपैकीं ब-याचशा संगमरवरी दगडाच्या आहेत, त्यांची किंमत कित्येक लाख दिनार होईल. माझ्या शिपायांनां मूर्तिपूजकांच्या देवळांत पांच सोन्याच्या मूर्ति सापडल्या. त्या मूर्तींचे डोळे माणिकांचे होते त्यांची किंमत ५०,००० दिनार होती. याशिवाय रुप्याच्या मूर्ती तर शंभर सांपडल्या. ती एकेक मूर्ति एकेक उंटाच्या ओझ्याची होती.' याप्रमाणें महंमूदानें अनेक शहरांत मोठाली लूट मिळविली. बनारस शहरांत त्यानें एक हजार देवळांतल्या मूर्ती फोडल्या व एकंदर लूट चार हजार उंट भरून नेली असें म्हणतात.